श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ भाई… भाग – 3 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
*तुझी माझी जोडी जमली रे*
‘भाई’वरच्या लेखाला
‘स्मृतीगंध’ फेसबुक पेजवर
३००+ लाईक
५०+ कमेंटस
६०+ शेअर
एवढी *Good news* तरी कुणाला *congratulations* करावस वाटलं नाही, छ्या .
अरे एवढा निराश होऊ नकोस
कोण?
मी तुझा ‘भाई ‘
भाई तुम्ही? नमस्कार , नमस्कार
हो हो ! अरे तुझा तो लेख फिरत फिरत सुनीता पर्यत पोहोचला. तिने दाखवला म्हणून तुला भेटायला आलो.
भाई आज सिनेमा पण पाहिला ?
हो हो, ते आलंच लक्षात आमच्या तो वरचा ?डायलाॅग ऐकूनच
भाई, खुपच सुरेख सिनेमा. अगदी पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत
‘*आनंदाचे डोही आनंद तरंग’* अशी अवस्था.तुमचे बाबा म्हणायचे ना ‘ *पुरुषोत्तम केवळ आनंद देण्यासाठी आला आहे*’ याचा प्रत्यय प्रत्तेक प्रसंगात खास जाणवत होता आणि ठामपणे ते म्हणाले ‘ *माझं भविष्य चुकणार नाही* ‘ म्हणून
भाई , भविष्य/ पत्रिका हा पण एक आपला आवडता विषय. महाराष्ट्राचा कुंडली संग्रहात *पान नंबर १८० वर ३७९ नंबराची कुंडली आहे प्रसिध्द लेखक, नाटककार, कवी, संगीतकार पु.ल. देशपांडे यांची*
असं का? वा, वा
भाई, फर्गुसन च्या सरांनी तुम्हाला ‘ *धनुर्धारीत* ‘ तुमच्या आलेल्या विनोदी लेखाचे कौतुक केले आणि मला खुप आनंद झाला
का हो तुम्हाला का?
अहो भाई, आमचा पण “धनूर्धारी ” म्हणून धनू राशीवाल्यांचा Whatsapp ग्रुप आहे. काहीबाही लिहीत असतो मी त्यावर
उत्तमच म्हणायचे.
भाई, सिनेमात तुम्हाला तुमच्या बाबांनी ” नाथ हा माझा” हे बालगंधर्वाचे गाणे पेटीवर वाजवायला सांगितले. ते पाहून मी ही थेट आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात पोहोचलो.
कुठली शाळा?
ते बघा म्हणजे… सिनेमात तुम्ही विलिंग्डन काॅलेजचा उल्लेख केलाय ना, त्याच *सांगलीतील सिटी हायस्कूल शाळा*. त्यावेळी आमच्या ‘निलांबरी’ ला ‘वद जाऊ कुणाला शरण ग’ या नाट्यसंगीताला पेटीवर साथ केली होती.
अरे वा, म्हणजे पेटी पण वाजवता का?
हो हो भाई
आणखी काय करता?
काही बाल नाट्यात जसे गाणारा मुलुख, गोपाळदादा, कामं केली आहेत आणि भाई, संस्कृत नाटकात आमच्या प्रसाद, सुनील बरोबर सम्राट अशोक राजाच्या सेवकाचे काम केले होते.
काय वाक्य होती?
नाही फक्त संस्कृत मधे सम्राट अशोकाची ‘हं हं’ असं म्हणत बाजू घ्यायची
छान, छान.
कविता, गाणी याबद्दल काही
भाई गाणं म्हणण्याचा एकदाच प्रयत्न केला मागच्यावर्षी कंपनीत कल्चरल कार्यक्रम झाला तेंव्हा.
“हीच आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही प्रार्थना म्हणली. *पण जमलं नाही नीट*
अच्छा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला जमत पण नाहीत तर.
भाई, चारोळ्यांचा मात्र नुसता पाऊस पाडतो. तो सिनेमात तुम्ही रत्नागिरीला असताना पडतो तसा.
चांगलय की मग
भाई, बेळगावला असतानाचा तुमचा एक प्रसंग आहे सिनेमात. त्यात सुनिता बाईंशी बोलताना तुम्ही म्हणता, पुण्याची मजा नाही. भाई सेम फिलींग. २-३ महिन्यातून एकदा तरी पुण्याला गेल्या शिवाय चैनच पडत नाही बघा. *आता पण एक मित्र बोलावतोय. बघू कसं जंमतय ते*.
भाई, तुम्ही जसं सुनिताबाईंना घाबरायचा असं दाखवलंय ना तसा तो पण बायकोला घाबरतो. मित्रांची मैफल जमली की चालला बायको बोलवतीय, रागवेल इ इ कारणे देऊन
अरे वा, अगदी मैफलीत पर्यंतच्या ब-याच गोष्टी जुळत आहेत की आपल्यात.
भाई, गोविंदराव टेंबे, कवी गोविंदग्रज तुमचे आदर्श
तसा माझा एक मित्र गोंद्या माझा आदर्श. ?
हो का? गोविंद, गोविंद ??
भाई सिनेमातील वसंतराव देशपांडे, कुमारगंधर्व, भीमसेन जोशी यांची *जुगलबंदी* काय रंगलीय आणि साथीला साक्षात भाई. मैफल संपलेली नाही भाई आत्ता फक्त मध्यांतर झालयं आणी मध्यांतरानंतर परत केंव्हा मैफल चालू होईल याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतोय भाई.
भाई, त्या आधी एक राहिलं सांगायचं गदिमांच्या गाण्याच्या एका कडव्याला तुम्ही दिलेली चाल.
*पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे*
भाई, भाई ऐकतात ना?
अहो काय चाललय तुमचं, संध्याकाळ झाली उठा आता. आणि काय बडबडत आहात, पावसाची रिमझिम. तोंडावर पाणी मारलयं ! उठत नव्हता म्हणून. आणि काय मेलं एक तो
‘भाई’ वरचा लेख व्हायरल झाला तर भाई, भाई करत सुटलेत.??♂
भाई, ८ तारखेनंतर भेटू आमची सुनिता हाक मारतीय बहुतेक
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
छान, वेगळी लेखनशैली!