सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
नवरात्रोत्सवात ऑफिसला सुट्टी म्हणून मानसी,चित्रा,रेवती, स्वाती या मैत्रिणीं महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या. यानिमित्ताने देवळातील पूजा-आरास पाहायला मिळे. निवांतपणे लोकांमध्ये मिसळून उत्सवाच्या वातावरणाची अनुभूती घेता येई.
देवळात खूप गर्दी होती. दर्शनासाठी मोठी रांग होती.प्रत्येकीच्या हातात पूजेची थाळी होती. रेवती,स्वातीने तेलाच्या पॅक पिशव्या आणलेल्या पाहून चित्रा म्हणाली,”स्वाती तेल पण आणलेस तू ?”
स्वाती– “होय बाई.अग नोकरीसाठी आपण घराबाहेर असतो.सतत तेलवात लावून ठेवणे शक्य होत नाही. मग म्हणलं, देवाच्या दारी तरी आपला दिवा जळू दे.”
“होय ग. आपण बाहेर असताना अखंड दिवा लावणे शक्य नसते आणि ते धोक्याचेही असते. म्हणून मग देवळातील दिव्यासाठी तेल आणले.”रेवतीने तिची ती ओढली.
“ते ठीक आहे,”मानसी म्हणाली,”खूपजण असाच विचार करतात आणि इथे नको इतके तेल जमा होते.तेलाची सांड-लवंड होते, काही तेल वाया जाते,घसरडे होते याचा कुणी गांभीर्याने विचारच करत नाही.”
“हो ना,मग काहीतरी दुर्घटना घडलीकी सगळे एकदम जागे होतात,” चित्रा म्हणाली.
“म्हणूनच आम्ही पॅक पिशवी आणली,”स्वाती.
“ते अगदी छान केलत तुम्ही. पण या गोष्टीचा काही वेगळा विचार नाही का करता येणार ? ज्यांना स्वयंपाकात तेलाचे दर्शन दुर्लभच असते त्यांच्या देवापुढे कधी तेलवात लागणार आहे का ?मग अशांना हे तेल आपण नाही का देऊ शकणार ,” मानसी.
“मानसी, अगदी खरं आहे तुझं. मी पण आता अशा गरजूंना देईन,” चित्रा.
“गेली चार-पाच वर्षे अशा लोकांना मी तेलाची पिशवी देते,” मानसी.
“छान छान” सगळ्या एकदम म्हणाल्या.
“आजकाल खूप गोष्टींचा नव्याने विचार करायला पाहिजे हे यावरून लक्षात आलं बरं का आमच्या,” रेवती.
दर्शनाची रांग पुढे सरकत होती.आत जाताना थोडी रेटारेटी झाली आणि हातातल्या ओटीच्या थाळ्या वेड्यावाकड्या झाल्या. कसल्यातरी आघाताने स्वातीच्या हातातील तेलाची पिशवी फुटून ते सांडू लागले.गडबडीत खूप तेल वाया गेले. स्वातीची साडी तर पुरती खराब झाली.पण इतरांच्या साड्यांना ही तेलाचा प्रसाद मिळाला.गडबड बघून पुढे आलेल्या देवस्थानातील कुणीतरी ते तेल पुसून घेतले.या मैत्रिणी कसेबसे दर्शन घेऊन बाहेर आल्या.आता अशा अवतारात बाहेर कुठे जाणे शक्यच नव्हते. सगळ्या घरी परतल्या.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तेल पिशवी वरून साग्रसंगीत चर्चा झाली.सणवार,परंपरा,दानमहात्म्य यावर गरमागरम चर्चा झाली.जुने रितीरिवाज जपायचे पण काळानुरूप त्यात बदल करणे खूप गरजेचे आहे.दान सत्पात्री असावे.गरजूंना मदत करावी.न सोसणारे उपवास न करता उपाशी लोकांना जेवू घालावे.यावर मात्र एकमत झाले.
परंपरेच्या मुशीत घडतो संस्कृतीचा दागिना
नवा उजाळा देण्या सोडा कालबाह्य कल्पना !!
हे अधोरेखित झाले.
या चर्चेच्या वेळी मानसी गप्पच होती.कुणीतरी तिला याबद्दल विचारले.ती म्हणाली,”मी माझे मत कालच सांगितले.पण यंदा मात्र माझा चांगलाच पोपट झालाय,”
“काय झालं मानसी ,”सार्वजनिक कुतूहल.
“यंदा मी माझ्या कामवालीला तेलाची पिशवी दिली.ती खूपच खुश झाली.म्हणाली,’ वहिनी तुम्ही माझं मोठं काम केलंसा. माझी खूप दिवसाची इच्छा होती का देवीला तेल द्यावं.आता हीच पिशवी मी उद्या देवीला देईन.’
“आता बोला”.
“काय ?” सर्वांनी एकच गजर केला.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈