सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी!
शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी!
संतांनी वाढविला तो वाण मराठी! आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी!
अशी ही मराठी, आपली मायबोली! महाराष्ट्राची राजमान्य भाषा! गेल्या हजार वर्षात त्यात होणारी स्थित्यंतरं आपण पाहत आहोत. ज्ञानदेवांच्या काळात जी मराठी भाषा वापरली जाई, ती आज वाचताना बऱ्याच शब्दांपाशी आपल्याला अडखळायला होते. अशी ही आपली मराठी देवनागरी भाषा बाराव्या तेराव्या शतकात समृद्ध होत होती.
एकनाथांनी एकनाथी भागवत, भारुडे लिहिली, त्यामध्ये मराठी भाषेचा उपयोग झाला होता. त्यापूर्वी 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठी भाषा राजमान्य झाली. 1947 नंतर स्वतंत्र भारतात मराठी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली.
कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी प्रमाणित भाषा म्हणून पुस्तकात आपण वाचतो, वापरतो ती असते.. पण दर पाच मैलागणिक भाषा बदलते असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा देश, कोकण, खानदेश, वर्हाड या सर्व भागात बोलली जाणारी मराठी किती विविधता दाखवते ते आपण पाहतो.
महाराष्ट्रातील विविध भागात म्हणजे रत्नागिरी, सांगली, पुणे, धुळे, नागपूर या सर्व ठिकाणी थोडाफार काळ राहिले आहे, त्यामुळे तेथील मराठी भाषा अनुभवली आहे. मिरज- सांगलीच्या मराठी भाषेवर थोडा कर्नाटकातील कानडी भाषेचा टोन येतो. प्रत्येक वाक्यात ‘होय की’ ‘काय की’ या शब्दाचा उपयोग जास्त होतो.
तर कोकण पुणेरी भाषेत’ ‘होय ना, खरे ना’ असा “ना” या शब्दाचा उपयोग दिसतो. खानदेश जवळ असणाऱ्या गुजरात प्रदेशामुळे तेथील मराठी भाषेत गुजराती शब्दांचा उपयोग होतो तर नागपूरच्या वऱ्हाडी भाषेत मध्य प्रदेशातील हिंदी भाषा मिसळली जाते.. भाषेचा प्रवास हा असा चालतो. व्यवहारात बोली भाषेत मराठी जशी बोलतो तशीच लिहितो. भाषा हे माध्यम असते मानवी भावना व्यक्त करण्याचे!
ज्ञानेश्वराने भगवद्गीता संस्कृत मध्ये होती, ती सर्वसामान्यांना कळावी म्हणून त्याकाळी ती प्राकृत मराठीत लिहिली. पण आता जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करतो, तेव्हा पुष्कळ वेळा त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ कळत नाहीत .त्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात.
काळानुरूप देश, भाषा बदलत असते. भाषा आपल्याला ज्ञानामृत देते. लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच मुख्य माध्यम असल्याने, आई प्रथम जे शब्द उच्चारते तोच त्याच्या भाषेचा मुख्य स्त्रोत असतो. त्यामुळे आपण मातृभाषेला महत्त्व देतो.
मोठे झाल्यावर आपण कितीही भाषा शिकलो, इंग्रजी शिकलो, परदेशातील भाषा शिकलो तरी आपली मातृभाषा आपल्यात इतकी आत पर्यंत रुजलेली असते की, कोणतीही तीव्र भावना प्रकट करताना ओठावर मातृभाषेचे शब्द येतात. सुदैवाने आपली मराठी इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना कुठेच अडखळायला होत नाही. आपोआपच शब्द ओठावर येतात.
ओष्ठव्य, दंतव्य ,तालव्य,कंठस्थ अक्षरांचे उच्चार आहेत ते आपल्या शरीर मनाशी जणू एकरूप होऊनच येतात.. म्हणूनच मराठी मातेसमान आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या अलंकारांचे सुंदर वर्णन केलेले आहे. मराठी भाषा ही लवचिक आहे. तिचा उच्चार जसा करू तसा तिचा अर्थ बदलतो. वाक्य बोलताना त्यातील ज्या शब्दांवर आपण जोर देऊ त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो .मराठी भाषेचे अलंकार तिची शोभा वाढवतात.शार्दुलविक्रिडीत, अनुप्रास,यमक,रूपक यासारखी वृत्तं भाषेचे अलंकार आहेत. त्यांचा उपयोग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी होतो. अशी ही मराठी आपल्याला मातेसमान आहे, त्या मराठीला आपण जतन करू या, हीच आजच्या मराठी दिनासाठी शुभेच्छा!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈