श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ मराठी साहित्यातील अजरामर पत्रे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
माझीा मुलगी पुण्यात शिक्षणासाठी राहायची, तेव्हा दर आठवड्याला तिचे मला एक पत्र यायचे.मुलगा शिकायला होता, तेव्हा तोही पत्र पाठवायचा. त्यांच्या पत्रांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू. त्यातील काही सुंदर पत्रे आजही आम्ही जपून ठेवली आहेत. पत्राच्या सुरुवातीला लिहिलेले ‘ प्रिय दादा, किंवा प्रिय आई ‘ हे शब्द अंगावर मोरपीस फिरल्यासारखे जादू करायचे. आणि शेवट ‘ तुमची लाडकी, तुमचा लाडका ‘ यासारख्या हृदयस्पर्शी शब्दांचा असायचा. दुसरे नवीन पत्र येईपर्यंत आधीचे पत्र दोनतीन वेळा तरी वाचून झालेले असायचे. आताशा पत्र लिहिणे हा भाग कालबाह्य होत चालला असला तरी एक काळ असा होता, की ज्यावेळी पत्रांच्या माध्यमातूनच एकमेकांशी संवाद साधला जायचा. दूर अंतरावर असणाऱ्या आपल्या प्रिय जनांशी संवाद साधण्याचे ते एक प्रभावी माध्यम होते.
आजही आपल्यापैकी काहींनी आपल्या वडिलांनी आपल्याला लिहिलेलं पत्र , भावाने लिहिलेलं पत्र वा अन्य कोणी लिहिलेलं पत्र आठवण म्हणून जपून ठेवलं असेल. ही पत्रं म्हणजे एक अनमोल ठेवा असतो. कधी त्या माणसांची आठवण आली, तर ती पत्रं पुन्हा वाचावी. त्यासारखा दुसरा आनंद नाही.
जी ए कुलकर्णी या प्रख्यात कथालेखकाने आपल्या प्रिय वाचकांना लिहिलेली पत्रे काही वाचकांनी तर प्राणापलीकडे जपून ठेवली. त्याही पुढे जाऊन काहींनी ती पत्रं चंदनाच्या पेटीत ठेवली. त्या पत्रांना जीएंच्या आठवणींचा मधुर सुगंध आहे.
जीएंची पत्रे प्रदीर्घ असत. जीएंनी त्या काळात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सुद्धा पत्रे लिहिली. जीएंनी श्री. पु. भागवत, सुनीता देशपांडे इ ना लिहिलेली पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. तो आपल्यासारख्या वाचकांसाठी एक अनमोल ठेवाच आहे. अशाच महान साहित्यिक, विचारवंतांच्या पत्रांचा संग्रह ह वि मोटे यांनी करून तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. व. पु. काळे यांची पत्रे सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी जपून ठेवली आहेत. वपुंची आगळीवेगळी भाषाशैली, आपले विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची पत्रे कधीही वाचली तर नुकतीच लिहिल्यासारखी ताजी वाटतात.
पत्रलेखनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मुलांना काही गोष्टी सांगितल्या, हितगुज केले. पं नेहरूंनी तुरुंगात असताना इंदिरा गांधींना पत्रे लिहून भवतालच्या जगाची माहिती दिली. सुधारणा, राजकारण, इतिहास, धर्म इ बद्दल माहिती दिली. साने गुरुजींनी सुद्धा आपल्या छोट्या पुतणीला म्हणजे सुधाला पत्रे लिहून खूप गोष्टी समजावल्या आहेत. ती पत्रे ‘ साने गुरुजींची सुंदर पत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.
तर लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्या समाजसुधारकाने पत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग समाजसुधारणेसाठी केला. ‘ प्रभाकर ‘ या साप्ताहिकातून त्यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, परंपरा, धर्म जातीभेद, स्त्रीजीवन इ विषयांवर त्यांनी तब्बल १०८ पत्रे लिहिलीत. ही पत्रे ‘ शतपत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.
आज ही सगळी माहिती एवढ्याकरिता सांगितली की या पत्रांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. ज्यांना अभिजात मराठी वाचायचे आहे, मराठीचा अभ्यास करायचा आहे, मराठीवर प्रभुत्व मिळवायचे आहे अशांनी जरूर ही पत्रे वाचावी. किमान ही पुस्तके चाळावी .
वर उल्लेखिलेली प्रसिद्ध पत्रे आहेत तसेच चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना लिहिलेले पत्रसुद्धा प्रसिद्ध आहे. पण ते वेगळ्या कारणासाठी. योगी चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कळल्यावर एकदा त्यांच्या मनात आले की आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे. पण सुरुवात कशी करावी हेच त्यांना उमजेना. ज्ञानेश्वरांना आशीर्वाद लिहावा, तर ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे. आणि नमस्कार लिहावा तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान. म्हणून काहीच न लिहिता त्यांनी ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठवले.
खरं तर चांगदेव मोठे योगी, ज्ञानी आणि चौदाशे वर्षे वय असलेले. पण अध्यात्ममार्गात अहंकार सर्वात मोठा शत्रू असतो. सिद्धीच्या मागे लागल्यामुळे चांगदेवांमध्ये अहंकार शिरला. आणि ब्रह्मज्ञानापासून ते वंचित राहिले. म्हणून छोटी मुक्ताई म्हणाली, ‘ चांगदेव अजून पत्रासारखे कोरेच राहिले.’ आपणही हे सगळे समजून घेणार नसू तर आपणही तसेच कोरे राहू. ‘ मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया. ‘ अशी आपली गत नको व्हायला.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈