सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ मतदान..काही आठवणी..भाग – १ – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मतदानाचे वारे वाहू लागले की या काही आठवणी हमखास येतातच. तसे आम्ही शिक्षक खूप भाग्यवान! कारण आम्हाला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे भाग्य सेवानिवृत्ती नंतरच मिळते. पूर्वी मतदान करण्याचे वय २१ होते. आणि बहुतेक शिक्षकांचे जॉब १८ किंवा १९ व्या वर्षी सुरू झालेले असतात. मी तर प्रथम मतदान अधिकारी म्हणून काम केले आणि नंतर मतदानाचे वय झाले. मग पोस्टल मतदान करावे लागे.

सुरुवातीच्या काळात संपूर्ण शाळेतील सगळे शिक्षक,शिपाई एकाच केंद्रावर असायचे. पण नंतर बरेच बदल झाले. आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी नेमले जाऊ लागले. आणि आपली नेमणूक कोणत्या ठिकाणी असेल हे घरातील मंडळींना पण समजायचे नाही. एखाद्या गाडीत बसवून कामाच्या ठिकाणी नेले जायचे. तिथे गेल्यावरच कळायचे आपल्याला दोन दिवस इथे काम करायचे आहे. बरेचदा अती संवेदशील भागात काम करावे लागायचे. त्यातील एक आठवण…. आत्ता हसू येते. पण त्या वेळी जीवाचे पाणी होणे म्हणजे काय,किंवा पाचावर धारण बसणे या सारखे सगळे वाक्प्रचार व म्हणी आठवल्या होत्या.

असेच एका ठिकाणी नेऊन सोडले. कोणत्या भागात जायचे कोणालाच माहित नव्हते. दोन दिवस तर काम करायचे,कुठे कायमचे रहायचे आहे? या विचारात गेलो. प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारून काम करायचे अशी शिकवण. हे सतत लक्षात ठेवून गेलो. हळूच कोणीतरी म्हणाले अती संवेदनशील भाग आहे काळजी घ्या. एकंदर पोलिसांच्या जास्त असलेल्या गाड्या बघून हे लक्षात येऊन थोडी धाकधूक होतीच. पण कोणी काही न बोलता कामाला सुरुवात केली. आपापल्या जागी आसनस्थ झालो. आणि मतदान सुरू झाले. रांगा तर खूप मोठमोठ्या होत्या. अक्षरशः जागेवरून हलता पण येत नव्हते. साधारण तीन तास शांततेत पार पडले.आणि हळूहळू भीती कमी झाली.

तेवढ्यात आम्ही काम करत असलेल्या केंद्राच्या पत्र्यावर कोणीतरी उड्या मारत आहे असे जाणवले. मुले पतंग वगैरे काढत असतील असे वाटले. पण तितक्यात त्या पत्र्यातून हातात तलवार घेऊन धप्पकन उडी मारून एक व्यक्ती प्रगट झाली. आणि कोण रांगेत थांबवतो? बघतोच त्याच्याकडे… मला प्रथम मतदान करु द्या. असा आरडा ओरडा सुरु केला.  सगळे हादरून गेले. आणि त्याचा हा अवतार बघून आमचे वरिष्ठ अधिकारी अतिशय चपळतेने बाहेर पडले. ते बाहेर का गेले हे अद्याप कोडेच आहे. आणि शिपाई त्या रुमच्या बाहेर… मग आमचे कौशल्य कामी आले. पटकन दोन बोटे तोंडात घातली आणि शिट्टी मारली ( कधी नव्हे ती वेळेवर वाजली ) सगळे बघतच राहिले. पण ती शिट्टी ऐकून आमचे शिपाई व दोन हवालदार देवासारखे पटकन दाखल झाले आणि त्या तलवार धारी व्यक्तीला बाहेर नेले. आणि आम्ही सुटलो. आणि आता त्या आठवणीने हसत सुटतो.

ही वार्ता बाहेर गेल्यावर लगेच स्थानिक लोक तत्परतेने आले आणि काही काळजी करु नका असा धीर व पाणी,चहा देऊन गेले. त्यानंतर अधून मधून येऊन आमची विचारपूस करुन जात होते. एकच वेळी दोन अनुभव येत होते. अशा दोलायमान परिस्थितीत मतदान

संपे पर्यंत जीव मुठीत धरून काम केले. आणि रात्री नऊ नंतर आम्हाला पोलीस बंदोबस्तात तेथून बाहेर काढले.

एक अनुभव तर फार चटका लावणारा आहे. आपल्या केंद्रा  वरील टीमची शेवटच्या प्रशिक्षणाला ओळख होते. आणि एकमेकांचे नंबर घेतले जातात. असेच एका ट्रेनिंगच्या वेळी ओळखी झाल्या. आम्ही आपापल्या घरी निघालो. निम्म्या रस्त्यात आल्यावर आमच्या टीम मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. फोन घेतला तर एक अनोळखी व्यक्ती बोलत होती. आणि त्या व्यक्तीने धक्का दायक बातमी सांगितली. “हा फोन ज्यांचा आहे,त्यांचा आत्ता अपघात झाला आहे व जागेवर मृत्यू झाला आहे. डायल नंबर मध्ये तुमचा शेवटचा नंबर होता म्हणून तुम्हाला फोन केला आहे.” आम्हाला तर त्यांची काहीच माहिती नव्हती. फक्त ऑफिस माहिती होते. मग तिकडून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा नंबर घेऊन त्यांना कळवले.

असे अनेक भले बुरे अनुभव येतात. नवीन ओळखी होतात.

अशा प्रत्येक वेळच्या निरनिराळ्या आठवणी निवडणूक तयारी सुरू झाली की मनात दाटून येतात. आता मात्र मुक्तपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आनंद घेते. आता तर केंद्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी सेल्फी पॉइंट्स ठेवतात. मग काय छान कृत्रिम महिरपीत उभे रहायचे आणि शाई लावलेले बोट ( या फोटोत ते महत्वाचे असते ) समोर धरुन सेल्फी ( दुसऱ्याने काढलेला) घ्यायचा आणि फेसबुक,whatsapp आणि इतर मीडियावर पोस्टून टाकायचे. आणि आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत मिरवायचे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments