सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ मी एक असमंजस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
या पूर्वी माझा डोळसपणा व माझा कानसेन पणा आपण वाचला आहे. आज तर मला माझ्या समजुती की गैरसमजुती ? शहाणपणा की मूर्खपणा ? यातच गोंधळ होऊ लागला आहे. आणि मी सामान्य नसावी असे वाटू लागले आहे. हे असे वाटण्याची कारणे पण सांगते. मलाच माझ्यावर शंका येऊ लागली आहे.
तर काही दिवसांतील अनुभव सांगते. मी अनेक वर्षे सकाळी लवकर चालायला जात असते म्हणजे आपले मॉर्निंग वॉक. तर यात विशेष काय? सगळेच जातात ना ? असे मला वाटते. पण चालायला आल्यावर छान निसर्ग ( असेल तर ) बघावा. गवतावर चालावे, फुलांचा,गवताचा,झाडांचा मंद सुगंध भरून घ्यावा. स्वतःशी मस्त संवाद करावा. काही काळ फोन,इतर साधने यांना विश्रांती द्यावी. अशी माझी समजूत आहे. म्हणून मी फोन शक्यतो घरी ठेवते. पण यात रमणारी मी मूर्ख ठरते. कारण बघावे त्यांच्या कानात निरनिराळी बटणे ( आपले हेडफोन्स ) दिसतात. एकदा तर चांगलीच गंमत झाली. माझ्या शेजारून चालणारी मुलगी अचानक माझ्याशी बोलू लागली. मला तेच हवे असते. मी कुठेतरी वाचले होते, दोन माणसे एकमेकांशी बोलत आहेत हे सर्वात सुंदर दृश्य आहे. मी तर माणूस वेडी. ती बोलत आहे हे बघितल्यावर मी पण बोलू लागले. आणि थोड्याच वेळात ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. कारण ती त्या बटण सदृश्य हेडफोन मधून अनेक कि.मी. जवळ असलेल्या व्यक्तीशी बोलत होती. आणि मी तिच्याशी. मग माझ्या विषयी तिचे गैरसमज होणारच. अजून एक गंमत अनुभवास येते. बरीच मंडळी जाता येता झाडाची पाने तोडतात व काही अंतरावर टाकून देतात. हे बघून मला मात्र वाईट वाटते. असे वाटते त्या झाडांनी तुमचे काय बिघडवले आहे? तसे सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक विचित्र नजरेने बघतात. काही मंडळी तर गवतावर बसतात. आणि हाताने त्याच जागेवरचे गवत उपटतात. बरेचदा आपण हे करत आहोत हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. मी लक्षात आणून दिले की तेच विचीत्रपणे बघणे अनुभवते.
माझा अजून एक मूर्खपणा सांगते. त्याच मॉर्निंग वॉक वरून परतत असताना मला एक वेगळाच छंद जडला आहे. ज्यांचे नळ चालू आहेत व पाणी वाया जात आहे ते बंद करायचे. ज्यांच्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वहात आहेत त्यांना त्यांच्या घरात जाऊन सांगायचे व वाहणारे पाणी बंद करायला लावायचे. आणि रस्त्यावर वाहणाऱ्या नद्या बंद करायच्या म्हणजेच रस्ते स्वच्छ करणे थांबवायचे. आहे ना वेडेपणा? कारण आम्ही बिल भरतो, आमचा नळ आहे तुम्हाला काय करायचे आहे? अशी मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. तरी मी काही सुधारत नाही. याच पाण्या बाबत आमचा वेडेपणा सांगते. तर आम्ही काय करतो ते सांगते म्हणजे तुम्हाला पण पटेल. आम्ही डाळ,तांदूळ,भाज्या धुतलेले पाणी एका छोट्या बादलीत घेतो आणि ते कुंड्यातील झाडांना घालतो. कपडे धुतलेले पाणी सडा टाकायला वापरतो. कपडे पिळलेले पाणी संडास,बाथरुम धुवायला वापरतो.पाणी प्यायला देताना शक्यतो अर्धा ग्लास देतो. लागले तर पुन्हा देता येते. आणि तरीही उरलेच तर एका भांड्यात साठवतो. ते कुठेही वापरता येते. गाड्या नळीने न धुता अशा साठवलेल्या पाण्यातून धुणे/पुसणे करतो. पण पक्ष्यांना मात्र एका मोठ्या भांड्यात आवर्जून पाणी ठेवतो.
आहे ना वेडेपणा?
हीच गोष्ट लाईटची घराबाहेरील लाईट रात्र रात्र चालू असतात. बरे हे काम करायला रस्त्यावरील सरकारी दिवे चालू असतात. काहींच्या घरात संडास, बाथरुम यातील लाईट चोवीस तास चालू असतात. आपल्याला खटकले आणि विनंती करून सांगितले तरी उत्तर तेच मिळते. आम्ही बिल भरतो. आमच्या घरात किंवा बाहेर लाईट ठेवतो. तुम्हाला काय करायचे आहे? आम्ही मात्र प्रत्येकाच्या हाताला व मनाला सवय लावून घेतली आहे, ज्या खोलीतील काम होईल त्या खोलीतील लाईट बंद करायचे. आहे ना वेडेपणा?
एक असाच वेडेपणा नुकताच अनुभवला. मतदान करण्यासाठी सुट्टी मिळाली होती. शनिवार रविवार याला जोडून सुट्टी होती. म्हणजे उत्तम योग. आणि त्याचा फायदा उच्च विद्या विभूषित हुशार लोकांनी घेतला. मस्त जोडून रजा घेऊन छान थंड हवेची ठिकाणे गाठली की. आणि आमच्या वयाची काही मूर्ख माणसे ७/८ तास प्रवास करुन मतदानासाठी पोहोचली. आणि आमच्या सारखे कर्मचारी तर ऊन,तहान सगळे विसरून,स्वतःला होणारे त्रास विसरुन मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. आहे ना मूर्खपणा?
असे बरेच वेडेपण आहे. जाता जाता अजून एक वेडेपणा सांगते. हल्ली मस्त रात्री केक कापून मोठ्या आवाजात गोंधळ करुन Happy Birthday साजरा करतात. केक तोंडाला फासतात. आम्ही मात्र वाढदिवस सकाळी साजरा करतो. सुवासिक अंघोळ घालतो. गोडाचे जेवण करतो. औक्षण करतो. देवळात जाऊन आशीर्वाद घेतो. एखाद्या संस्थेत त्या दिवशी जेवणाचा होणारा खर्च देतो. आहे ना वेडेपणा?
इतरांचे उच्च आवाजातील संगीत, डीजेचे व अपरात्री फटाक्यांचे आवाज ऐकणारे आम्ही. स्वतःच्या घरात कुलर लावताना त्याचा आवाज इतरांना त्रास देईल का? हा विचार करून आपला फॅन लावून झोपणारे आम्ही. आहोत ना वेडे?
तर मंडळी असे वेडेपणाचे बरेच किस्से आहेत. नमुना म्हणून काही सांगितले. आणि आपल्याच मंडळींचा सल्ला घ्यावे वाटले. म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈