सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

मागण्या आणि मागण्या ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही गोष्टी करायला खूप सहज सोप्या असतात तर काहीं गोष्टी ह्या करण्यासाठी खूप अवघड असतात. ह्या काही गोष्टींमधील एक गोष्ट म्हणजे “मागण्या”. मागण्या करणं खूप सोप्प पण मागण्या पूर्ण करणं हे जरा अवघड काम. खरंतर मागण्या करणं आणि मागण्या पूर्ण करणं ह्या वाक्याममधे फक्त एका शब्दाचा फरक, पण अर्थाने मात्र दोन शेवटची टोकं.

आपलं सगळ्यांचंच लहानपण, हे मोठ्यांनी जे शिकविलं ते  आज्ञाधारक पणे शिकायचं , नुसतचं शिकायचं नाही तर ते आपल्याला आचरणातपण आणावचं लागायचं,ह्यात गेलयं.सरसकट सगळ्या भावंडांमध्ये एखादा अपवाद वगळता बाकी सगळे मुकाट्याने पटो की न पटो पण सांगितलेले निमूटपणे स्विकारायचे.एखाद्यामध्ये मात्र थोडीफार हिंमत,  धमक असायची मग ते भावंड जरा बंडखोरी करुन  हवं ते मिळविण्यासाठी आपली बाजू हिरीरीने मांडायचे .थोडफार फडफडल्याने कधी त्या बंडखोर व्यक्ती च्या मनासारखं व्हायचं तर कधी मात्र नजरेच्या धाकाच्या जोरावर वा चौदाव्या रत्नाचा प्रसाद देऊन मोठी वडील माणसं त्या प्रश्नाचा,त्या समस्येचा निकाल लावतं.

ह्या सगळ्या समस्येच मूळ म्हणजे “मागण्या”हेच असायचं.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या भूमिकेतून अगदी योग्यच असतो.आमच्या लहानपणी आजुबाजूचे,परिसरातील,

नात्यातील,परिचीत आणि मैत्रातील बहुतेक सगळ्या कुटूंबांची एकूणच आर्थिक परिस्थिती,जीवनमान,स्तर हे अगदी थोड्याफार फरकाने पण सारखचं होतं.त्यामुळे एकूणच सर्वांचा राहणीमानाचा दर्जा हा जवळपास सारखाच होता. त्यामुळे परस्परांत दरी,विषमता ह्याची धग कधी फारशी जाणवलीच नाही.

मग अशा वेळी मागण्या वा डिमांड पुरविल्या गेल्या नाहीत तर अचानक आपल्याला डावलल्या गेल्याचं फील यायचं,उगाचच फक्त आपल्यावर अन्याय झालायं असा गैरसमज मनात ठाण मांडून बसायचा.वास्तविक पाहता आईवडील, पालक वा वडीलधारी मंडळी त्यांच्या जागी अगदी योग्यच असायची.तेव्हा आम्ही मागण्या करायचो,बंडखोरी करायचो पण आमच्या अल्लड, अजाणत्या वयातचं बरं का.जसजसं वयं वाढलं,परिपक्वता वाढली तसतसं अडचणीच्या काळात, आणीबाणीच्या काळात किंवा एखादं रोगराई सारखं अचानक अस्मानी संकट अंगावर येऊन पडल्यास मोठ्यांना, पालकांना वेठीस धरू नये एवढी जाण,समज तश्या फारशी पाचपोच नसलेल्या वयातही कोठून आणि कशी आली ते आमचं आम्हालाही कळलं नाही.

महिना अखेरचे दिवस हे पालकांचे सत्वपरीक्षेचे दिवस असतात हे अनुभवाने आम्हांला पाठ झालं होतं.खरचं जेथे घर चालवितांना एवढ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं,परिवारातील सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते तेथे कोणीही सत्तेवर असलं तरी सत्तेवर असलेल्या कोणाही साठी अगदी सत्वपरीक्षेचाच काळ असतो हे पण खरं.

पालकांच्या अडचणीच्या काळात,प्रमुख आलेल्या आपत्तीकडे कानाडोळा करुन त्यांच्या मागे मागण्यांच तुणतुणं वाजवून त्यांना पिडू नये,बेजार करु नये ही जाण,हा शहाणपणा आम्ही लहान असलो तरी सगळ्यांजवळ होता.जी समज लहानवयात येऊ शकते ती समज, ते शहाणपण निव्वळ सत्तेसाठी , एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मोठ्यांजवळ नसावं ह्यांच खरचं वैषम्य वाटतं.

अगदी आपण करीत असलेल्या मागण्या आपल्या दृष्टीने खरोखरच योग्य आहेत हे शंभर टक्के आम्हाला कळलेले असले तरीही आम्ही लहान असूनही

परिस्थितीचा,पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचो,त्या पोशिंद्यांचा विचार करायचो आणि आता परिस्थिती कोणती,संकटाची तीव्रता किती हे सगळं कळूनही निव्वळ दुराग्रह, अट्टाहास ह्याला प्राधान्य देऊन,स्वतःतील”मी”ला खतपाणी घालतं,कुरवाळत बसणं खरोखरच योग्य आहे का, ह्याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

शेवटी काय तर पालक असो वा सरकार त्यांच्याकडे आपल्याला काही मागण्या करायच्या असल्यासं त्या मागण्यांसाठी  आपण वेळकाळ पहाणं खूप गरजेच आहे जरी आपल्या मागण्या अगदी रास्त असतील तरी.सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात पालकांना तसेच जे जगावर अस्मानी महामारीचे संकट आले असतांना ते आरक्षण वगैरे मागणे हे योग्य आहे का हे प्रत्येकाने  आपल्या सदसद्विवेकबुद्धी ला विचारुन बघावे.आपले खरे उत्तर आपल्याला आपले मनचं देईल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments