श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ माईक… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

तो असतो लहान, मोठा, दृश्य, अदृश्य कसाही. त्याची स्पीकरशी जोडी असते. एकाविणा दुसरा कुचकामी ठरतो. माईक असतो खूप इमानदार. एकदा का दोस्ती जमली की कधीच अंतर न देणारा. नाहीतर सादरकर्त्याला दोस्ती विसरायला लावणारा.

काहींना तो खूप आवडतो तर काहीजण त्याला घाबरतात. इतके की त्याच्यापुढे जायला नको म्हणून हलतच नाहीत. खरी त्यांची भीती असते ती पुढे जमलेल्या लोकांची. त्यांच्याही पेक्षा आपल काही चुकलं तर आपल्याला हसणार तरी नाहीत ना याची. 

त्याचा खरा आणि रोज वापर करतात शाळेतील पी. टी. चे सर. एस.टी. स्टँडवरील कंट्रोलर ,रेडिओवरील निवेदक तसेच प्रार्थना सांगायला उभे करतात ती मुले, मुली , सगळीकडचे नट, नट्या , व्याख्याते आणि राजकारणी भाऊ. त्यांना तर माईकशिवाय चैनच पडत नाही. काहीजण ” आज या ठिकाणी…. ” करत मुख्य वक्ते येईपर्येंत टाइम पास करणारे असतात.  मुख्य वक्ते आले की ते त्याचा ताबाच घेतात. इकडेतिकडे पहात वातावरण निर्मिती करतात आणि मग कमीतकमी पाऊण तास ते दोन, अडीच तास चांगलीच फोडाफोडी करतात. 

कशाला हे एवढे बोलतात वाटले तरी तेही साधे, सोपे नसते. श्रोत्यांना खिळवून ठेवणे फार अवघड असते. जरा जरी तो ताबा सुटला की प्रेक्षक हलायला म्हणजे प्रथम चुळबुळ व नंतर जागा सोडू लागतात. बरं जाणाऱ्यांंना काहिही करून थांबवता येत नाही. 

त्याच्याशी ओळख प्रथम तुम्ही काही भाषण, गोष्ट, गाणे सादर करण्यासाठी ” जा, जा, घाबरू नकोस, मी आहे इथे ” असे कोणी सांगत सांगत असताना,  त्याच्या समोर उभे राहता बालवर्गात  होते. कधी त्यातून करंट येतो का असे वाटते. तसे काही नसते हे समजले की पुढची स्टेज येते. आपलाच आवाज मोठा होऊन समोरून ऐकू येतो. तो पहिला शब्द, ऐकला,  आणि त्यावर आपणच  खूष झालो की संपले. आपले म्हणणे पुढचे लोक ऐकून घेत आहेत हे समजले की स्फूरण येते आणि तुम्ही पुढे पुढे जाऊ लागता. ” हा सारखाच माईक पुढे असतोय ” असाही मुलांचा स्वर ऐकू येतो. तिकडे पहायचे नसते. थांबायचे तर अजिबात नाही. 

एकदा माईकची भीती गेली तो आवडू लागला की सगळीकडे बोलण्याची संधी मिळू लागते. निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या कामी अशा बोलणार्‍यांना, पुकारणार्‍यांना चांगला भाव मिळू शकतो. 

मोठया सभांच्या वेळी हॅलो माईक टेस्टिंग वन, टू, थ्री, फोर म्हणण्याची पद्धत होती. आता हॅलो माईक चेक हॅलो एवढेच म्हणतात. कार्यक्रमात अनेक माईक जोडण्यासाठी , आवाज कमी जास्त करण्यासाठी मोठा बोर्ड घेऊन साउंड ऑपरेट करणारे दादा असतात. त्यांना साउंड इंजिनिअरही म्हणतात. टेलिफोन खात्यात बी. कॉम. वगैरे झालेल्यांनासुद्धा तसलेच काही तांत्रीक काम करतात म्हणून इंजिनिअर म्हणतात तसेच हे असावे. 

माईकचे अनेक प्रकार असतात. त्यातही बरीच क्रांती झाली आहे.

पुर्वी खूप मोठे जड माईक असायचे. नाटकात पुढे स्टँड माईक, हँगिंग माईक लागायचे. पात्राचा रंगमंच्याच्या कोणत्याही ठिकाणचा आवाज शेवटच्या प्रेक्षकापर्येंत पोचावा लागतो. नाहीतर लोक ” आवाज, आवाज ” असे आवाज काढायला लागतात. आता प्रत्येक पात्राला वेगळा कॉलर माईक असतो. त्यामुळे अगदी बारीक आवाजही सहज पोचतो. 

मोठे क्लास, कॉलेजचे भरलेले वर्ग, वर्कशॉप यासाठीही कॉलर माईक वापरले जातात. तेंव्हा आठवण होते, माईकचा शोध लागण्यापुर्वी कित्येक अंकांची संगीत नाटके मातब्बर नट गाजवत होते त्यांची. पल्लेदार वाक्ये, थोडा लाऊड अभिनय आणि खणखणीत स्वर. 

एके ठिकाणी छोटे भजनी मंडळ. होते. आठवड्यातील एखाद्या वारी ते कोणा भक्ताच्या घरी भजन करायचे. म्हणणारे सात आठ लोक, थोडे ऐकणारे आणि घरातले. सर्व वाद्ये आणि मंडळीचे आवाज सहज ऐकू जात. तरीही माईक, स्पीकर सगळे लावायचे. विचारले, ” अहो, एवढेच लोक असता माईक कशाला,? ” तर म्हणाले ” बाजूच्या लोकांना ऐकू जावे भजन म्हणून ” 

एकेकाना माईक ची इतकी सवय झालेली असते की तो हातात आल्याशिवाय करमत नाही. गाणे म्हणताना, अगदी कराओके सुद्धा, माईक असला की बरे वाटते. त्यांच्या किमती तशा फार नसल्याने प्रत्येक घरात एखादा तरी माईक असतोच. 

आपला आवाज, आपले म्हणणे आपले गाणे, जरा मोठ्याने दुरवर पोचले की बरे वाटते. त्यामुळे ते सुधारण्याची शक्यताही वाढते. न पेक्षा ” आता बास ” असे अभिप्रायही देणारे मित्र असतातच. 

लेखक : श्री मुकुंद दात्ये

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments