सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
🌸 विविधा 🌸
☆ मैत्र जीवांचे — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
नात्यांची गुंफण आपल्या जन्मापासूनच सुरू होते. बाळाचं आणि आईचं नातं तर त्याही आधी आकारास येतं,पण आपण जन्म घेतो, तो कोणाचा तरी मुलगा /मुलगी म्हणून, आणि मग इतरही सगळी नाती आपोआपच जुळतात-काका, मामा, आजी-आजोबा, मावश्या, आत्या इत्यादि. या नात्यांच्या साथीने आपण लहानाचे मोठे होतो. त्यांच्या प्रेमाने, कौतुकाने फुलतो तर कधी आदर-धाकामुळे, स्वतःचा ढळणारा तोलही सांभाळतो. त्यांच्यापाशी हट्टही धरतो आणि लाडही पुरवून घेतो.
बाळपणीचे खेळगडी, शाळेतले सवंगडी, काॅलेजातले मित्र-मैत्रिणी, नोकरी-व्यवसायातला सहकारी, असा हा परिघ विस्तारतच जातो. प्रेम-विवाह असो अथवा ठरवून केलेला विवाह, जोडीदाराबरोबर वेगळेच रेशीम-बंध जुळतात आणि मग सासू-सासरे, दीर, नणंद, जाऊ इ. नात्यांचे पदरही जोडले जातात.
प्रेम आणि आपुलकीनं जोडलेली नाती आपोआपच दृढ होतात आणि आपलं भाव-विश्वही समृद्ध करतात. काही नाती मात्र आपण कर्तव्य भावनेने सांभाळतो, काही व्यवहार म्हणून तर कधी नाईलाजाने. पण आपल्या मनाची तार जुळणा-या व्यक्ती मात्र फार दुर्मिळ असतात.
अशी व्यक्ती ही ‘रक्ताची नातेवाईक’ असेलच असं नाही, पण ती आपल्याला सगळ्यात जवळची वाटते. ती मित्र-मैत्रिण, शेजारी – पाजारी, कार्यालयातील सहकारी /अधिकारी अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकते. इथे वयाचा मुद्दा गौणच ठरतो. वैचारिक साधर्म्य, समान छंद/आवड, यापेक्षाही दुस-याला समजून घेण्याची वृत्ती, विश्वासार्हता, सह-संवेदना, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. समोरच्याचं म्हणणं शांतपणे, लक्षपूर्वक ऐकणं, त्याला मोकळेपणानं बोलू देणं मग आपली प्रतिक्रिया देणं या बाबी प्रेम आणि विश्वास निर्माण करतात. काही वेळा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालते, पण नीट ऐकून घेणं , जास्त आवश्यक असतं. त्यामुळे बोलणा-याचं मन मोकळं होतं, त्याच्या मनावरचा ताण हलका होतो.
या व्यक्तिशी आपला रोज संवाद / संभाषण असेलच, असं नाही. पण मनातलं खास सांगायला मात्र ती हक्काची वाटते. आपलं यश-अपयश, सुख-दुःख, फजिती सारं तिच्याबरोबर अनुभवायला, वाटून घ्यायला, आपल्याला आवडतं. कधी ‘दे टाळी’ म्हणून आनंद साजरा करायला तर कधी खांद्यावर डोकं ठेवून, अश्रू ढाळायलाही तीच व्यक्ती हवी असते आपल्याला. आपली दुखरी नस तिला अचूक सापडते आणि तिच्या बोलण्यात स्पर्शात, आपल्याला ‘आश्वासकता’.
या व्यक्तीचं अस्तित्वच आपल्याला मानसिक आधार देतं. ती आपल्याला समजून घेईल आपलं चुकत असेल तर चूक दाखवून, ती सुधारायला मदत करेल, हा विश्वास खूप मोलाचा असतो. मी जे काही बोलेन, ते तिच्यापाशीच राहील, ही खूण-गाठ मनाशी असते, म्हणून निःसंकोचपणे सारं तिच्यासमोर मांडता येतं. अशी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणंच!
पण आजच्या या ‘आभासी’ जगात असं ‘ मैत्र’ हरवत चाललंय असं वाटतं. लहानांपासून थोरांपर्यंत, सारेच तणावयुक्त आयुष्य जगत आहेत. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत माणूस फरपटतोय, घुसमटतोय, हरवतोय, हरपतोय. कोवळ्या वयाची मुलं नैराश्यग्रस्त होऊन कधी वाईटमार्गाला जात आहेत तर कधी आयुष्याचा अनुभव घेण्याआधी जीवन संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गरज आहे ‘मैत्र जीवाचे ‘ भेटण्याची.
चला आपणही कोणासाठी तरी ‘ मैत्र जीवांचे’ होण्याचा मनापासून प्रयत्न करूया ना! जिव्हाळ्याचं बेट बनून, ढासळणा-या मनांना उभारी देण्याचा ‘ खारीचा वाटा’ तरी उचलूया!
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈