सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

वडिलांच्या बदलीचा हुकूमनामा आमची इवलीशी आयुष्ये ढवळून टाकीत असे. पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाच्या लहान शाळेत चौथीच्या वर्गातून मिरजसारख्या ठिकाणी जायचा आदेश जरा जास्तच जाचक वाटला. छानसा गणवेश, शाळेत पोहोचवायला-आणायला घरची माणसे, डबा, दप्तर, मातकामाचा वर्ग, सवंगडी या सौख्यातून उठून जाऊन मिरजेच्या शाळेत गेले, तेव्हा जीव घुसमटला.

मिरजमधला दिवाण जोशींचा भला मोठा वाडा अंधारात बुडून जाई. माडीवरच्या बाल्कनीत उभे राहिले, की शहरही अंधारात बुडल्यासारखे वाटत असे. पुण्याची आठवण येऊन जीव कासावीस होई. तिथून मिरजेचा मिरासाहेबांचा दर्गा दिसे. रात्री घुमटावरचा हिरवा दिवा पाहून अंधार अधिकच गडद होई. अशावेळी माझा सांगाती रेडिओ असे आणि रेडिओ सिलोन माझ्या सांत्वनासाठी चित्रपटसंगीताची भरगच्च शिदोरी घेऊन येत असे. रेडिओचे निवेदक मला एकेक गाण्याची अचूक माहिती पुरवीत असत. त्या वेळी जुन्या गाण्यांची अन आगामी चित्रपटांतल्या गाण्यांची बरसात होत असे.

त्या वेळी ‘फागुन’ चित्रपटातली गाणी रेडिओवर प्रचंड वाजत असत. माझ्या बालपणाने एक बोट शंकर-जयकिशनच्या हाती दिले होते – दुसरे ओ. पी. नय्यरने पकडले. ‘पिया पिया ना लागे मोरा जिया’, ‘इक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘छुन-छुन घुॅंगरू बोले’, अशी गाणी कितीदा तरी ऐकू येत. अशाच एका उदास संध्याकाळी ‘फागुन’ मधले गाणे लागले- ‘मैं सोया अखियाँ मींचे’- ‘तेरी जुल्फों के नीचे’ आशा-रफीच्या युगलगीतातल्या संथ लयीने माझे इवलेसे हृदय हलले. ‘ये कौन हँसी शरमाया, तारों को पसीना आया… ‘ त्यातल्या नर्म शृंगार, प्रणय, शब्दांतून झिरपणारी प्रेमभावना, याबद्दल माझे बालमन पूर्णपणे अनभिज्ञ होते. जुल्फें, बाहें… याबद्दल अगदी बेखबर ; पण पुणे सोडून आलेले नव्या दुनियेत एकाकी विहरणारे माझे मन त्या गाण्यातल्या शब्दसुरांकडे झेपावले. मग मी रोज विशिष्ट वेळी त्या गाण्याची वाट पाहू लागले.

अशा वेळी आणखी एका गाण्याने मला खुणावले. ‘चंपाकली’ चित्रपटातले लताचे ‘छुप गया कोई रे, दूरसे पुकारके, दर्द अनोखे हाय, दे गया प्यार के… ‘ माझ्या मनात त्या ‘दर्द’ ने हलकेच प्रवेश केला असावा आणि शब्दार्थ- भावार्थ ओलांडून ते गीत मला आणखी उदास करीत राहिले अन कधी-कधी थोपटत राहिले.

हळूहळू मिरजदेखील आपलेसे वाटू लागले. मित्र-मैत्रिणी, बाई, मास्तर, यांचे वर्तुळ जमू लागले. रेडिओ सिलोननी सुवर्णकालाच्या संगीताची टांकसाळ माझ्यासाठी खुली केली होती. अमर, देवल चित्रपटगृहांत पोस्टर्स झळकू लागताच त्यातल्या एकेका गाण्याचे तपशील माझ्या जिभेवर हजर असत आणि गाण्यांनी माझे अवघे जग भारून जाई.

एके दिवशी सामानाची बांधाबांध पुन्हा सुरु झाली. अंबाबाईचे देऊळ, मिरासाहेबांच्या दर्ग्याचा उरूस, किल्ल्यातले आत्याचे भले मोठे घर, तिच्या कानडी भाषक घरातले खमंग पुरणाचे कडबू, बसप्पा, मलप्पा चौगुलेंचे पेढे… अशा मिरजेकडे पाठ फिरवून पुण्यात आलो. पुढच्या घटनांनी आयुष्य भरून गेले. चित्रपटगीतांनी भरभरून माप पदरात टाकले. त्या गाण्यातून जीवनाचा वेध घेण्याचा छंद जडला. सळसळत्या वृक्षांतून जीवनरस मिळवावा, तसा गाण्यांचा अक्षय्य ठेवा लाभला. मिरजेत ऐकलेल्या गाण्यांचे अर्थ उमगत राहिले.

‘आज है सुनी सुनी दिलकी ये गलियां 

बन गयी कांटे मेरी खुशियो की कलियां 

हाय! याही तो मेरे दिन थे सिंगार के… ‘

… हे पुन्हापुन्हा ऐकताना मनात असोशी भरून राहायची.

‘मुस्कुराओ के जी नहीं लगता’ सारख्या गाण्यासाठी मी माझी सारी व्यवधाने दूर ठेवायची. चित्रपटाचे प्रवाह बदलले अन आपल्या जीवनाचेदेखील. कृष्णधवल चित्रपट गेले; रंगीत आले. अँग्री यंग मॅनच्या युगाचे उदयास्त झाले. तरीदेखील सुवर्णयुगाच्या चित्रपटगीतांनी खिशातली नाणी खुळखुळत राहिली. आपल्या श्रीमंतीला ओहोटी लागलीच नाही, असे वाटत राहिले. त्या श्रीमंतीला आणखी एक मोरपीस लागले.

ज्यांची नावे गाण्यापाठोपाठ निवेदक ऐकवीत राहायचा, त्यांना प्रत्यक्ष भेटायचे योग् आले. पुढे तो माझ्या कामाचा एक भाग झाला. भेटी, मुलाखती, लेखन आणि पुन्हा गाण्याच्या आनंदाची मैफल होत राहिली. बाहेरच्या अपमानाचे, उपेक्षांचे बाण परतवून लावणारा अक्षय्य भाता माझ्या जवळ होता ना ! 

एके दिवशी मुंबईतल्या संगीतप्रेमी स्नेह्याने निरोप पाठवला.. त्या संध्याकाळी आठवणी जागवायला जमलेल्यांमध्ये वयोवृद्ध कवी प्रदीप होते. संगीतकार अनिल विश्वास मीनाजींबरोबर हजर होते. मोती सागर, सितारादेवी, शायर कमर जलालाबादी होते. गप्पांची मैफल रंगात आलेली होती. शेरोशायरी, विनोद यांना बहर आला होता. ‘रोटी’ मधला सितारादेवींचा हृदयस्पर्शी रोल, ‘दूर हटो ऐ दुनियावलों’ ची छपन्न कडवी लिहून आणणारे कवी प्रदीप, अनिलदांनी ऐकवलेली फैज अहमद फैज यांची गझल.. मैफल रंगात आली होती. चहापानाच्या वेळी मी कमरसाहेबांना ‘जलती निशानी’ मधल्या लताच्या ‘रूठ के तुम तो चल दिये’ बद्दल छेडले… हे गाणे आठवते का विचारले. त्यांनी अनिलदांकडे पाहिले. म्हणाले, “कसे विसरणार? चित्रपट पहिल्याच शोनंतर कोसळला होता !” … त्या दोघांना हसू आवरेना. अनिलदांनी त्याला संगीत दिलेले होते.

हरवून गेलेल्या चित्रपटांतली अविस्मरणीय गाणी… सोन्यासारखी गाणी… तीच तर माझ्याजवळ आहेत.

‘हे माझे कुँवार डोळे-तुझ्याशी नजर मिळवताना खाली झुकले आहेत. हरले आहेत. तू माझा जन्मोजन्मीचा साथीदार आहेस ना… मग, चल, माझ्या भांगात चांदण्या भर… ‘ … अशा अर्थाची गाण्यातली ओळ चित्रपटसंगीताच्या फार मोठ्या ‘बिझिनेस’ मधून मी हलकेच गाठीशी बांधते. फार लहानपणीचा दर्ग्याच्या घुमटावरचा दिवा आठवतो. त्याला लपेटलेला अंधार आठवतो; पण त्याहीवेळी आपण उगाच उदास का झालो होतो, ते कळत नाही…

आजदेखील गाणे ऐकताना डोळे का भरतात… ? छे ! या वयात मन आवरायला शिकले पाहिजे…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments