सौ शालिनी जोशी
विविधा
☆ माघ—महाशिवरात्र… ☆ सौ शालिनी जोशी ☆
विश्वच ज्याचे नृत्यालय
लिला करी उत्पत्तिलय
नटराज शोभे नाव
तोच शिव शंकर महादेव॥
भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र दिवस म्हणजे माघ वद्य चतुर्दशी. या दिवशी शिव म्हणजे महादेव यांची भक्ती भावाने पूजा व उपासना करतात. शिवलीलामृत, शिवमहिम्न, रुद्र अशा ग्रंथांचे पारायण करतात. मूर्तीला अभिषेक करतात. बेल व धोत्र्याचे फुल वाहतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी व इतर शिवमंदिरात जत्रा भरतात. या पूजेमागे काही कथा सांगितल्या जातात.
त्यातील एक पौराणिक कथा-
समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून विष बाहेर निघाले. पृथ्वीचा नाश करू पाहणारे ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह झाला. देह काळा पडला. वैद्यानी रात्रभर जागरणाचा उपाय सांगितला. तेव्हा सर्व देवानी रात्रभर जागरण व नृत्य केले. शंकराने तांडव नृत्य केले. म्हणून आजही महाशिवरात्रीच्या रात्री जागर केला जातो. म्हणून ही चतुर्दशीची रात्र महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते.
अशीच आणखी एक पौराणिक कथा-
एक पारधी सावज शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला तरी त्याला शिकार मिळाली नाही. एक हरीण पाणी पिण्यासाठी आले. पारधी बाण सोडणार इतक्यात ते हरीण म्हणाले,’ मी माझ्या कुटुंबीयांना भेटून त्यांचा निरोप घेऊन येतो’.पारधी ‘हो’ म्हणाला. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. व झाडाखाली शिवपिंड होती. पारध्याने सहज नकळत किंवा सावज स्पष्ट दिसावे म्हणून बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली. ती पाने शिवपिंडी वरती पडली. नकळत का होईना पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आले. त्याच्या बरोबर त्याचे कुटुंबही आले. प्रत्येक जण ‘मला मार, मला मार’ असे पारध्याला विनवू लागला. ते पाहून पारध्याच्या मनात त्यांच्या विषयी दया उत्पन्न झाली .प्राणी असूनही हरणे आपले कर्तव्य विसरत नाहीत. मी ही माझ्या मानवता धर्म, दया धर्म पाळला पाहिजे. त्यांने त्या सर्वांना जीवदान दिले. हे पाहून शिवशंकर सर्वांवर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना कृपा प्रसाद दिला. त्या हरणाला मृगनक्षत्र आणि पारध्याला व्याध म्हणून आकाशात नेहमी करता स्थान दिले.तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशीच शिवाची कृपा सर्वांवर व्हावी म्हणून ही शिवाची उपासना .
शिवपार्वतीच्या विवाहाचा हा दिवस असेही म्हणतात. भगवान शिव हे आदि गुरु त्यांच्या पासून योग परंपरा निर्माण झाली. योग विज्ञान उगंम पावले .हजार वर्षे ध्यान केल्यावर ते स्थिर बनले, तो हा महाशिवरात्रीचा दिवस. म्हणून योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून बघतात.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈