प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ मन… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

॥श्री॥

… मन …

.. “मन करा रे प्रसन्न….

. सर्व सिद्धिचे कारण

. मोक्ष अथवा बंधन

.. सुख समाधान इच्छा ते…”

आपले जगत्गुरू तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. तुकारामांइतका सच्चा गुरू असूच शकत नाही, कारण संसारतापात होरपळून तावूनसुलाखून निघालेला त्यांच्या सारखा क्वचितच कुणी असेल. त्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येकच शब्द अनुभवाचे अमृत आहे.

या पूर्ण अभंगातून त्यांनी “मनाची” महती सांगितली आहे. ताकद ही अंगात नसते डोक्यात,

मनात असते. तुम्ही एकदा, म्हणजे तुमच्या मनाने एकदा ठरवले की, ही गोष्ट करायचीच,

तर ती पूर्णत्वाला जाते म्हणजे जाते. निश्चय मात्र मनाचा पक्का हवा. म्हणूनच दोन मल्लांमधला बारक्या मल्ल सुद्धा कुस्ती जिंकतो कारण त्याच्या मनाचे डावपेच पक्के असतात, तो ते बिलकूल विसरत नाही व संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला चीतपट करतो. कारण त्याची ताकद डोक्यात असते, तो डोक्याने कुस्ती खेळतो.

म्हणून तुकाराम म्हणतात, मनाची पूजा करा.

मन हेच सर्व सिद्धीचे कारण आहे. तुम्ही ठरवले तर ते मोक्ष देईल तुम्ही म्हणाल तर बंधनात राहील. काय करायचे ते तुम्ही ठरवा. मन सुख  देईल, समाधान देईल, तुमच्या सर्व इच्छा देखील पुरविल. फक्त काय हवे त्याची प्रतिमा मनात स्थापन करा. एकदा तुमचे ध्येय निश्चित झाले की, तुमची त्या दिशेने वाटचाल झालीच म्हणून समजा. कारण काय करायचे याची प्रतिमा तुमच्या मनात पक्की असते.

“मने मना पूजा केली.. “ वाह वा क्या बात है..

मनाने मनाची पूजा करा. मन खुश होते. आणि मग मनच तुमची इच्छा पुरविते. तुकाराम म्हणतात, अहो, मन सद् गुरू आहे. मन माऊली आहे. वाह वा… मन माऊली आहे. माऊली तर मग साऱ्या इच्छा पुरवतेच ना? मन गुरूही आहे नि शिष्यही आहे. ते आपले दास्यत्व पत्करते.

आपल्याला प्रसन्न ठेवते नि गती अथवा अधोगतीही देते. साधक, वाचक, पंडित हो ऐका.

मनासारखा दुसरा गुरू नाहीच. नाही, नाही, अहो मना सारखे दुसरे दैवत नाहीच.

पण हेच मन भगवंतासाठी आसुसलेले असतांना या मनाला वठणीवर आणायला तुकारामांना

काही कमी प्रयास पडले नाहीत? फार कष्टवले त्यांना समतोल बुद्धी येण्यासाठी. शेवटी भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, तेव्हा कुठे ते वठणीवर आले. म्हणूनच ते म्हणतात, मनाची पूजा करा. भंडाऱ्यावर त्यांना विठ्ठल पावला नि मुखातून शब्द उमटले..

“आनंदाच्या डोही आनंद तरंग

आनंदची अंग आनंदाचे….

काय सांगू झाले काहींचिया बाही…

अहो, काहीच्याकाहीच झाले हो.. मला विठाई पावली हो… अंतर्बाह्य ते आनंदात न्हाऊन निघाले.  ”पुढे चाली नाही आवडीने”..

आता मला कामच उरले नाही, मला विठाई भेटली. माझे ध्येय साध्य झाले.

एकदा तुमच्या मनाने ध्येय ठरवले की तिकडेच वाटचाल होते, मग ते कितीही कठीण असो.

म्हणूनच.. “ ऐकावे जनाचे, करावे मनाचे”

उगाच नाही सांगून गेले मोठे लोक. महत्वाचा संदेश काय आहे? मंडळी… तर मन प्रसन्न ठेवा.

कसे राहते ते? दुष्ट विचार करायचेच नाहीत ना?

जोवर तुम्ही दुसऱ्याचे वाईट चिंताल तोवर ते दुष्टच असणार? दुष्ट मनात दुष्ट विचार? मग ते कसे प्रसन्न राहील हो? हो ना? म्हणून आधी दुष्ट विचार झटकायचे? कोणाचे काय चालले आहे हे बघायचेच नाही हो! आपल्याला काय करायचे ते ठरवायचे. कुणी? आपल्या मनाने. मग ते स्वच्छ हवे ना? त्या शिवाय कसे कल्याण होणार हो? तुम्ही जो विचार करता तसेच घडते हे शास्र आहे. चांगले विचार करणाऱ्याचे कल्याणच होते.

हा माझा तर अनुभवच आहे. म्हणूनच सकारात्मक रहा असे तुकाराम सांगतात.

हो, “ निंदकाचे घर असावे शेजारी” का? त्यामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात व आपल्यात सुधारणा होतात. त्यांना खुशाल निंदा करू द्यावी, मनाला शांतच ठेवावे. उत्तरच देऊ नये.

कशाला आपली तडफड करून घ्यायची फुकटची! म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात, समतोल बुद्धिच्या माणसाला शत्रू.. मित्र, माती.. सोने सारखेच असते. ही समतोल बुद्धी येण्या साठीच मनावर ताबा मिळवता आला पाहिजे.

मग कशानेही फरक पडत नाही. आपल्याला तुकाराम होता येणार नाही मंडळी, निदान त्यांच्या पायाची धूळ होऊ या.

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments