सौ शालिनी जोशी
विविधा
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई… ☆ सौ शालिनी जोशी ☆
संत बहिणाबाईंचा जन्म वेरूळ जवळील देवगाव येथे. आई-वडील, जानकी व आवजी कुलकर्णी यांनी वयाच्या केवळ पाचव्या वर्षी पाठक आडनावाच्या एका तीस वर्षाच्या बिजवराशी बहिणाबाईंचा विवाह करून दिला. पण मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज आई-वडिलांना फेडणे शक्य झाले नाही. म्हणून जावयासह सारे कुटुंब घर सोडून प्रवासाला बाहेर पडले. पंढरपूर, शिंगणापूर करत कोल्हापूरला आले. एका ब्राह्मणांने त्यांना आश्रय दिला. बहिणाबाईंचे वय केवळ आठ वर्षाचे होते. पण त्यांना ईश्वराची अनावर ओढ होती. येथे जयरामस्वामी वडगावकरांची कीर्तने त्यांनी ऐकली. त्यातील तुकारामांच्या अभंगांनी त्या भारावल्या. सतत मुखात अभंग आणि तुकारामांचे ध्यान. ‘पती हाच परमेश्वर’ मानण्याचा तो काळ होता. बहिणाबाईच्या कर्मठ पतीला ते मानवले नाही. हात, पाय बांधून गोठ्यात टाकण्यापर्यंतच्या छळाला सामोरे जावे लागले. पण संसाराकडे तटस्थ भावनेने बघण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. करावं वाटतं ते करता येत नव्हतं. जे करावे लागत होतं ते आवडत नव्हतं. अशा कोंडीत त्या सापडल्या. तरीही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड त्यांनी घातली. परमार्थाचा आनंद घेतला.
स्त्रियेचे शरीर पराधीन देह l न चाले उपाय विरक्तीचा l
शरीराचे भोग वाटतात वैरी l माझी कोण करी चिंता आता ll
अशी व्यथा त्या अभंगातून व्यक्त करतात.
बहिणाबाईंची निष्ठा पाहुनी संत तुकारामानी त्याना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यावेळी त्या अठरा वर्षांच्या होत्या. त्यांचे जीवन बदलून गेले. ‘प्रपंच परमार्थ चालवि समान l तिनेच गगन झेलियेले l’ असे आपले जीवन त्यांनी आपण अभंगातून उलगडले. हळूहळू बहिणाबाईंचा लौकिक पसरू लागला. लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. पण एका ब्राह्मण स्त्रीने शूद्र जातीच्या तुकारामाचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. नवराही संतापला. पण बहिणाबाई तुकारामांच्या अधिकार संपन्न शिष्या झाल्या. ‘मत्स जसा जळावाचूनि चडफडी lतैसी आवडली तुकोबाची l’अशा प्रकारची तगमग त्यांची तुकोबांविषयी असे. ‘स्वप्नामाजी कृपा केली पूर्ण’ अशी बहिणाबाईंची साक्ष आहे.
ब्रह्मज्ञांनी, भक्तीभाव व वैराग्याने त्या युक्त होत्या. नवऱ्याच्या संतापाला त्यांनी प्रतिक्रिया दिली.
‘भ्रताराची सेवा तोचि आता देव l भ्रतार स्वयमेव परब्रह्म ll
भ्रतार तो रवि मी प्रभा तयाची l वियोग त्याची केवी घडे ll
भ्रतारदर्शनाविण जाय दिस l तरी तेची राशी पातकांच्या ll
पुढे हळूहळू पतीचा स्वभाव बदलला.
काही दिवस त्या देहूला राहिल्या होत्या. तुकारामांची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तेथे असताना त्यांना दोन मुले झाली एक मुलगा व एक मुलगी. स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मण कोण या विषयावर त्यांनी आपले सडेतोड विचार तत्कालीन सनातनी ब्राह्मणांना सांगितले. ‘ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण’ असे ठामपणे सांगितले. त्यांनी साधारण ७३२ अभंग लिहिले.
वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीतील संतांच्या कार्याचे रूपकात्मक वर्णन करून संतांची माहिती लोकांवर बिंबवली. ती प्रसिद्ध रचना,
संत कृपा झाली इमारत फळा आली l
ज्ञानदेवे रचीला पाया उभारिले देवालया l
नामा तयाचा किंकर तेणे विस्तारले आवार l
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत l
तुका झालासे कळस भजन करा सावकाश l
बहिणी फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा l
त्यांचे अभंग अलंकारिक, रसपूर्ण, शांतरसाचे अधिक्य असलेले असे आहेत.
असे सांगतात की त्यांना आपल्या पूर्वीच्या १२ जन्मांचे स्मरण होते. चालू जन्म हा तेरावा होता. हे जन्म मरण्यापूर्वी त्यांनी अभंगातून आपल्या मुलाला सांगितले. ‘घट फुटल्यावरी l नभ नभाचे अंतरी l’ हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या. (१७००साली) शिरूर येथे त्यांचे समाधी आहे.
अशा या बहिणाबाई स्त्रियांना सुधारण्याचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतीज्योत !
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈