सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ विविधा ☆ बदलता दृष्टीकोन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
ऐका सख्यांनो, ‘तिची’ कहाणी. ‘ती’ तुमचीच एक सखी. तिची कहाणी पण संसार, मुलं-बाळं, जिवलग, निसर्ग, कुटुंबाचे हीत, परमार्थ, व्रत,त्याग,साफल्य या भोवतीच फिरणारी.
तिचे माहेर छोट्याशा गावातले. घरी धार्मिक,अध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक अशा सर्व विचारांचा मेळ. सर्व देवधर्म, पूजाअर्चा, परंपरा श्रद्धेने जपणारे आई-वडील. इतरांच्या मदतीला धावणारे, सर्वांच्या उपयोगी पडणारे, गावाचा आधारस्तंभ होते. धार्मिक व्रतवैकल्यांबरोबर सामाजिक व्रताचा वसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला. वारीची परंपरा, त्यातले मर्म समजले.
लग्नानंतर ती मोठ्या शहरात, मोठ्या गोतावळ्यात गेली. तिथले वातावरणही पूर्ण श्रद्धाळू, धार्मिक. तिच्या सासूबाई त्या काळाप्रमाणे कमी शिकलेल्या, सण-वार,परंपरांच्या धबडग्यातल्याच.पण तरीही अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या. असंख्य पुस्तकांच्या वाचनाने विचारात, आचारात काळानुरूप बदल केलेल्या. जुन्या कालबाह्य गोष्टी त्यांनीच सोडून दिलेल्या होत्या. त्यामुळे सुनांना त्यांनी कसलीच बंधने कधी घातली नाहीत. ती घरात सर्वात लहान. त्यामुळे सासूबाई नंतर कुळधर्म मोठ्या घरी सुरू झाले. सर्वांनी आपापल्या घरी करण्याऐवजी एका घरी करताना सर्वांनी एकमेकांकडे जाणे, या निमित्ताने नाती जपणे हे तिने कटाक्षाने पाळले. घरामध्ये, नातलगांमध्ये मिळून-मिसळून, सर्वांना धरून राहण्याचे व्रत ती अखंडपणे जपते आहे. या व्रतवैकल्यांचा अंतिम उद्देशच सर्वांचे हित,कल्याण हा आहे. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे खरे आहे.
तिने पुढच्या पिढीला श्रद्धा जपायला शिकवले आहे. प्रथेचे अवडंबर न करता काळानुसार जे शक्य आहे ते मनोभावे करा. माणसातला, स्वत:च्या मनातला देव जपा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. तो सदैव पाठराखण करतो हेच मनी बिंबवले आहे.
सण उत्सव, व्रतवैकल्ये हवीत. नियम, बंधने, संयम अवश्य हवा. पण या सर्वांसाठी निसर्गाला हानी पोहोचवू नये असे तिचे ठाम मत आहे. फुलं- पानं, फांद्या हव्यात म्हणून झाडांना ओरबाडायचे, निर्माल्य नदीत सोडायच्या निमित्ताने सगळा कचरा, घातक रंगांच्या प्लॅस्टरच्या मूर्ती पाण्यात सोडून जलप्रदूषण करायचे, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करायचे ही कसली आलीय श्रद्धा ? यामुळे उत्सवांच्या मूळ उद्देशालाच दूर सारले जाते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्सवाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला हवे असे तिला वाटते.
या सणावारांना ऋतू बदलानुसार योग्य खाद्य पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. ही गोष्ट आहारशास्त्राशी निगडित आहे. ती निश्चितपणे पाळावी. चातुर्मासाच्या निमित्ताने अनेक नेम धरले जातात. जे आरोग्यास योग्य ते अवश्य करावे. पण या जोडीला आणखी काही नवीन नेम धरता येतील. जास्ती समाजाभिमुख होऊन काही वेगळे संकल्प करावेत असे तिला वाटते.
असे उपक्रम म्हणजे — हॉस्पिटलमधील अॅडमिट पेशंटना भेटणे.एखादे फूल, फळ देऊन ‘लवकर बरे व्हा’ सांगत मानसिक उभारी देणे.
अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील लोकांना भेटणे.त्यांना चांगली गाणी, गोष्टी ऐकवून मनमोकळ्या गप्पा मारणे.
शाळा-शाळांतील मुलांना चांगली गाणी, गोष्टी, कथा ऐकवणे. त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे.
घराबाहेर पडू न शकणार्या ज्येष्ठांना आवर्जून जाऊन भेटणे.
दर आठवड्याला एका नातेवाईकाला जाऊन निवांतपणे भेटणे.जवळीक वाढवणे.
सर्वांनी मिळून देऊळ, बागा अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे.
झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवणे. यासारख्या कितीतरी उपयोगी गोष्टी करता येतील.
“मनी वसो रामनाम, हात करो पुण्यकर्म” हेच तर ब्रीद असावे. पुढच्या पिढीला पण अशा विचारांची दीक्षा देऊन त्यांना या कामात सहभागी करून घ्यायला हवे. ज्याला ज्या मार्गाने जमते त्या मार्गाने त्याने समाजसेवा करावी.
तिने समाजसेवेचा वसा आई-वडिलांकडून घेतला आहे. तो ती वेगवेगळ्या मार्गाने अमलात आणते. आपण ‘समाजाचे देणे’ लागतो ते फेडायचा ती यथाशक्ती प्रयत्न करते. शेवटी समाज म्हणजे कोण? तुम्ही आम्हीच ना! म्हणून या चांगल्या कामांची स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे तिचे मत आहे.
तिला ‘खुलभर दुधाची’ कहाणी फार आवडते. प्रत्येकाने आपल्या श्रद्धा जपत उत्सवाच्या निमित्ताने थोडा थोडा हातभार लावला तर समाज प्रबोधन, समाजरक्षण, पर्यावरण रक्षण यांचा हा गोवर्धन निश्चितपणे उचलला जाईल.
तेव्हा मैत्रिणींनो आनंदात समाधानात सण साजरे करूयात.धन्यवाद.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈