सुश्री संगीता कुलकर्णी
☆ विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
दवांत भिजूनी बहरली
पाने फुले
लागली डोलू लागली हसू
लागली झंकारू
गीत नवे उषेचे..!!
वा..वा..पांघरुणात शिरूर जोजविणारी पहाट…घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय. ..कोपर्यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीने गारठून गेलाय. फांदयांच्या कुशीतला कळया हळूहळू डोळे टक्क उघडून सभोवार पाहू लागल्यात…हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातून बाहेर पडला..तेवढ्यात आईने आवाज दिला. ..”अगं, संगीता आत ये, बाहेर बघं किती गारवा आहे. .!! ” हो, गं आई” मी बसलेल्या खुर्चीतूनच मागे न पाहता बोलली. ..
आधी तू आत ये नाहीतर तुला थंडीनं सर्दी खोकला व्हायचा. आईची ही प्रेमळ सुचना मानून मी वही व पेनाच्या लवाजम्यासहीत आत आले.आई ” काय मस्त वाटतय ग बाहेर ” बसल्या बसल्या मला कविता पण सुचली. .हो का? ‘बरं बाई ‘, हसून आईने उत्तर दिले. .
मी कवितेचा कागद दप्तरात भरला माझ्या बालमित्राला आकाशला दाखविण्यासाठी. ..आकाशचं घर आमच्या पासून पाच ते दहा मिनीटांच्या अंतरावर. ..आम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात अगदी शिशू वर्गापासूनच. .एकमेकांच्या खोड्या काढतच आम्ही शाळेत जायचो. .माझा आवडता विषय मराठी. .त्यात कविता, कथा, लघुकथा खूपच आवडायच्या. ..सहावीत वगैरे असेन. .शर्यतीत हरलेल्या सश्यावरची कविता मला आवडली होती. तेव्हापासूनच माझी कवितेशी गट्टी जमली….
“आई गं सांग ना गवतफूल कसं असत? ” आई, गं सांग ना..!!” माझ्या हाताला धरून माझी छोटीशी लेक अजया मला विचारीत होती. .या प्रश्नाने मी भानावर आले. .मघापासून ती विचारीत होती कवितेविषयी. ..तिच्या पुस्तकात इंदिरा संतांची “गवतफुला ” ही कविता होती. तिची छोटी छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. ..
अजया माझी छोटीशी गोंडस गोड मुलगी. तिला नव्या शब्दांविषयी, वस्तूंविषयी खूप शंका असतात. आणि तिच्या या शंकांचे निरसन करण्यात मला खूप आनंद होतो. तिला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर तिचे निरागस हास्य माझ्या मनाला खूपच सुखावते तसेच तिच्या सतत चालणार्या चिवचिवाटाने घर आनंदाने भरून जाते. .नंतर नक्की सांग हं आई, असं सांगून ती खेळायला निघून गेली.
माझे मन भूतकाळाच्या खिडकीपाशी घुटमळू लागले. .आणि आकाशने भेट दिलेले कुसुमाग्रजांचे
“प्रवासीपक्षी ” हे पुस्तक आठवले. ..
नवी दुनिया बसवताना कविता माझ्या पासून कधीच दूर गेली नाही. जशी माझी कवितेशी गट्टी जमली तशीच अजया चीही कवितेशी गट्टी जमली. ..
कविता. .तिची नाळ माझ्याशी घट्ट जोडली होती. .मंद पावलांनी अजया च्या रूपात माझ्या आयुष्यात आली आणि अंगणात आनंदाचे झाड लावले. ..
आनंदाने हुंदका बाहेर पडला आणि कागदावर शब्द उमटले. ..
दौडत जाई काळ
ठेवूनी मागे
क्षणांचे ठसे. .
पात्र. .कण न कण जसे
भरलेले भासे. .!!
एवढ्यात अजया ने हाक मारली ” आई “… या शब्दाने तंद्रीतून जागी झाली आणि कामाला लागली. ..
© सुश्री संगीता कुलकर्णी
9870451020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
khup sunder