सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जे जे मनात भावे| ते ते इथे उतरावे|

मनमोकळे करून घ्यावे|आपले निसंकोच |

असं म्हणून मी पहिल्यांदा माझं मन कधी मारलं हे आठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट अट्टाहासाने पूर्ण करून घ्यायचा स्वभाव त्यामुळे हौस फिटेल हौस भागेल असं काहीसं करून मन भरून घेतल्याचा आठवलं.

असं केल्याने आज मन तृप्त आहे का? की हूरहूर आहे? हे शोधायचा प्रयत्न केला आणि कबीरांचा दोहा आठवला

गेली कामना चिंता सरली मनमुक्त असे सैराट |

ज्याला काहीच नको असतो तोच खरा सम्राट |

माझ्यासारख्या पामराला कुठेतरी माझ्यातला सम्राट जागा करायचा होता म्हणून सतत मनाची कामना पूर्ती कशी होईल हा अट्टाहास कमी व्हायला हवा हे जाणवलं आणि मन मारायची सवय लावायची असं ठरवलं.

माझ्या मनाचा ठाव घेऊ लागले.मी मनाच्या आरशात पाहू लागले. माझे विचार मांडायची ती जागाच आहे ना? मला त्यात माझं प्रतिबिंब दिसलं. माझं मन आरशासारखं चकचकीत कधी होईल? असा प्रश्न मी त्या प्रतिबिंबाला विचारला. त्याचे उत्तर मार्मिक होतं बाह्य कर्म हा मनाचा आरसा आहे. त्यासाठी सदैव प्रसन्नचित्त असले पाहिजे.

थोडक्यात काय….

मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण|

केवढा खजिना सापडला होता आज मला!!

मनाला लागली दूषणे मला त्याचा शोध घ्यायला भाग पाडू लागली ‘प्रसन्न’ या शब्दाचा गर्भितार्थ शोधण्यासाठी मी माझ्या मनाला भेटायचं ठरवलं……

आपुलाची वाद आपणासी या व्यवस्थेत असताना अचानक मी माझ्या मनात शिरले ती एका चोर वाटेने. थोडी आडवळणी असली तरी तिने मला दिशा दाखवली. थोडी गुंतागुंतीची असली तरी तिने माझ स्वागत केले. आणि मग माझं मन किती अवाढव्य आहे याचा मला अंदाज लागला.

उगाच नाही बहिणाबाईंनी मनाची व्याप्ती वर्णन करताना म्हटलयं ‘मन वढाय वढाय’

‘असं कसं मन असं कसं रे घडलं?

कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं?

अशी साशंकता त्यांनी वक्त केल्यावर मात्र मी माझ्या मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

मन हे बंद बाटलीतल्या राक्षसासारखा आहे. अफाट शक्ती असलेलं आणि बुद्धीवर ताबा नसलेलं! बुद्धीचा वापर करून ते बाटलीच्या बाहेर आलं तर ठीक… नाहीतर विस्फोट ठरलेला. बुद्धीचं तारतम्य असलेलं मन विधायक काम करत.

मन अनाकलनीय, गूढ, विविधरंगी, विविधढंगी असं आहे. हवी ती उपाधी त्याला द्यावी ते तसं दिसू लागतं. क्षणात हळवं क्षणात चौफेर उधळणारं, क्षणात एकटं, क्षणात क्रूर, क्षणात कपटी, क्षणात पवित्र…..

मन राजासारखा आहे म्हटलं तर ते तसंच रुबाबदार आणि बलदंड वाटू लागतं. मनस्वी आहे असं म्हटलं तर ते मस्तवाल वाटू लागतं. उन्मत्त आहे असं म्हटलं तर खरच ते कुणाचेही ऐकत नाही. प्रेमानं सांगितलेली गोष्ट ते साशंकतेने घेतं कोणीही कोणताही उपदेश केला तरी ते वळत नाही.

मनाचा वेगही अचाट! ते कधी तळ्यात तर कधी मळ्यात.

अचपळ मन माझे, नावरे आवरीता |

तुझं विण शिण होतो, धावरे धाव आता|

मनाचा वारू आवरायला भगवंताला पाचारण करावे लागले.

मन लोभी मन लालची मन लंपट मन चोर

मन के मतनाचे पलक पलक मनोर

असंही मनाला दूषण दिलेलं आहे.

मनाचं अस्तित्व हे माझ्या देहापासून वेगळं नाही. अशरीर असं मन अस्तित्वातच नाही त्याचा चेहरामोहरा मी पाहिलेला नसला तरीदेखील माझ्या अस्तित्वाचा धनी तोच आहे मला तो गूढ अनोळखी वाटत असला तरी माझा चेहरा हा माझ्या मनाचा आरसा आहे माझ्या जीवनात घडणाऱ्या मानसिक घटनांची मालिका म्हणजे माझं मन आहे.

माझ्या मनाचा लगाम माझ्याच हाती हवा.

कधी कधी मनाची मनमानी चालते तो मालक बनू पाहतो त्याच्यासारखे नाही वागले तर रुसत. आंधळ्या मनाबरोबर चालत राहील तर खड्डे अटळ आहे आपल्या मनाला डोळस केलं पाहिजे आपण त्यांचे गुलाम होऊन चालणार नाही कबीरांनी पुढे आपल्या दोह्यात म्हटलंच आहे.

मन के मते मत चलिये |मन जिया तिया ले जाये\

मन को ऐसा मारिये |मन टुकडा टुकडा हो जाये\

तात्पर्य काय तर माझ्या मनावर माझं नियंत्रण हवं नाहीतर माझी अवस्था अशी होईल की माझी न मी राहिले………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments