☆ विविधा : मला भावलेला गणेश … ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

 

परवाच संकष्टी झाली गणपतीची आरती आणि नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणू लागलो ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि…… त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी असं म्हणून झालं आणि माझ्या मनात गणेश तत्वा बद्दल विचार सुरू झाले. गणपती, गणेश, गजानन, विनायक, अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली रत्नजडित किरीट घातलेली तुंदिल तनु असलेली जवळ उंदीर घेतलेली अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का?

मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रूप असतात. एक डोळ्याला दिसणार किंवा व्यक्त रूप आणि दुसर डोळ्याला न दिसणारे सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेलं गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं असं आहे.” गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे मोजमाप करणे वगैरे. ब्रम्ह हे अनंत अपरिमित आहे. या ब्रम्हातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलाच एक अगदी छोटा भाग आपलं जग. जग हे अनंता पासून सांता पर्यंत व अपरिमितापासून परिमिता पर्यंत येत तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होत. ही  मोजमाप करणारी शक्ती गणित तज्ञांचा गणित तज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते जसं चिकू आंबा फणस यातील प्रत्येकाचं पान ,फुल, फळ निरनिराळ असत. आंब्याच्या झाडाला लिंबू किंवा चिकू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई चमेली ही फुलं लागत नाहीत. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच  ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी ,अनावृष्टी, साथीचे  आजार अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्राता तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायु आकाश अशा पंचमहा तत्वांनी बनलेले आहे. ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरण अर्ध्या आकाश तत्वात पुरलेली चारही तत्वे प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता (त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम). ती शक्ती म्हणजेच गणेश.

ही सृष्टी ओमकारातून जन्माला आली व प्रत्येक गोष्ट ओ मच आहे असे मांडुक्य उपनिषदात सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व ,आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाळा किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्ही मधील गाठ हे पृथ्वीतत्त्व, तेथून निघणारी रेषा हे वायू तत्व ,वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके, मन आणि बुद्धी .आणि त्यावरील टिंब हे चैतन्य.  आणि हे  सगळं सगळं ज्याच्या मध्ये सामावलं आहे ते आकाश तत्व. .अशीही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा वस्तूचा सगळ्यात लहान घटक म्हणजे अणू. अणू केंद्रकात प्रोटॉन भोवती न्यूट्रॉन फिरत असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यापर्यंत गणना करून देतो ती शक्ती म्हणजेच गणेश .कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.

निर्मिती करणारा ब्रम्हा, सातत्य राखणारा विष्णू, आणि विलय करणारा तो महेश या सर्व शक्ती म्हणजेच गणेश आपण तरी काय करतो? पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने कौतुकाने त्याची पूजा करतो. उत्सव करतो आणि विसर्जन म्हणजे पृथ्वी तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे पर्वत बेटे यांची  उत्पत्ती होते. स्थैर्य येते आणि आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म! आणि या या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश. या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे एक फार मोठे रहस्य आहे. हे गूढ आहे.  उलगडणे ही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय विज्ञानमय असा गणेश च असतो. गणेश उत्सव सुरू झाला आहे.. सर्व शक्तीच्या प्रतीकांची पार्थिव गणेशाची पूजा करीत असताना निसर्गाचा समतोल राखून त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा खऱ्या या अर्थाने पूजा होईल आणि गणेश प्रसन्न होईल.

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
खूप रंजक वैचारिक लेख.