सौ. अमृता देशपांडे

☆  विविधा ☆ महात्मा गांधींचा खादीचा वसा ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

खादी म्हणजे हातांनी विणलेले,  हातांनी तयार केलेले धागे व त्या धाग्यांपासून विणलेले कापड. (hand made, hand spun) टकळी किंवा चरख्यावर सूत कातले जाई, त्याला सूतकताई म्हणत.भारतातील खेड्यातून राहाणा-या गरीब जनतेला आर्थिक दौर्बल्यातून बाहेर काढण्यासाठी महात्मा गांधींनी 1918 मध्ये खादीची चळवळ सुरु केली. हातमागावर वस्त्र तयार करणे व विणणे या कार्यक्रमातून स्वावलंबन व स्व-शासन या दोन मूल्यांवर आधारित गुणांना त्यांनी उचलून धरले.या वस्त्रोद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कपाशीचे पीक हे भारतातील खेड्यांत उत्पन्न केले जाईल.प्रत्येक जण या उत्पादनाच्या व कताईच्या कामात गुंतून राहील.प्रत्येक स्त्री पुरुष त्यांच्या आवश्यकतेनुसार व किमान गरजेइतकेतरी सूत कातून वस्त्र उत्पादन करेल असे चळवळी चे स्वरूप व ध्येय होते. स्वातंत्र्य पूर्व काळात किंवा नंतरही भारताच्या अनेक भागात शेतकरी वर्गाला वर्षभराच्या उपजीविकेसाठी सुद्धा पुरेसं काम नव्हतं. पाऊस पाण्याच्या दुष्काळामुळे वर्षाचे जवळ जवळ सहा महिने विना काम, विना उद्योग जायचे.

सर्वसामान्य लोक  आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मानसिक दृष्ट्या हताश व निराश झाले होते. अशा वेळी वस्त्रोद्योग हा ठोस रामबाण उपाय ठरला.कुणालाही शिकता येईल, कुणालाही करता येईल असा उद्योग. जो अतिशय कमी खर्चात व किमान मुद्दल गुंतवणुकीत करता येईल असा व्यवसाय.   त्याकाळी कच्चा माल भारतातून इंग्लंडला निर्यात केला जाई आणि तिथे उत्पादित केलेले कापड भारतात आयात केले जाई. पण ते भारतातील जनतेला परवडण्यासारखे नसे. मुख्यतः भारतातील जनता काम व त्यापासून मिळणारा लाभ या दोन्ही पासून वंचित रहात असे. परदेशी मालावर अवलंबून न रहाता आपल्या देशातील कच्च्या मालापासून देशातच कापड तयार करण्याचा खादीचा व्यवसाय हा स्वावलंबनाचा पहिला धडा महात्मा गांधींनी घालून दिला.  इंग्रजांचा भारतावरील हक्क झुगारून देण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल.

खादी उत्पादनामागे एक आर्थिक विचारही आहे. तो विचार ‘ Mass Production नको Production by Masses हवे, असा होता. मोठ्या यंत्रांच्या केंद्रित अर्थ व्यवस्थेमध्ये अनेक लोक बेकार तर होतातच, शिवाय मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन त्याच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात.  हे सर्व टाळण्यासाठी भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात विकेंद्रित अर्थव्यवसाय फायद्याचा ठरेल.

खादीच्या चळवळीमागे आणखी एक विचार होता. त्या काळी छोट्या,  बारीकसारीक कामे करणा-यांना कमी लेखले जाई. समाजातील उच्च-नीचतेच्या दरीवरती सेतू बांधण्याचं स्वप्न या खादीच्या चळवळीतून गांधींनी पाहिलं होतं. देशातील प्रत्येकाने मग तो उच्चपदस्थ असो वा कमी, श्रीमंत असो वा गरीब,  स्त्री-पुरूष प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास सूतकताईला द्यावा व खादी निर्मितीला हातभार लावावा,  जेणेकरून गरिबांची सेवा व गरजवंताला मदत होईल. समाजातील दोन भिन्न वर्ग एका सूत्राने बांधले जातील. गांधीजींची ही खादीची चळवळ फक्त राजकीय नव्हती तर त्यामागे सामाजिक,  सांस्कृतिक व आर्थिक कारणे होती. 1934-35 साली एका व्यक्तीच्या स्वावलंबनातून सुरू केलेली ही चळवळ संपूर्णं खेडे, संपूर्ण गाव स्वावलंबी बनवण्याइतकी विस्तारित करण्यात आली. 1920 नंतर संपूर्णं देशभरात स्वयंसेवकांची असंख्य शिबिरे भरवून ही चळवळ देशव्यापी केली गेली.

परिश्रम, स्वावलंबन, परस्परांतील भेदाभेद विसरून एकत्रित काम करणे, परदेशी वस्तू, परदेशी कापड न वापरता,  आपल्या देशात तयार होणारे वस्त्र, वस्तू वापरून आपल्या गरीब बांधवांना मदत करणे, या गुणांची ओळख करून देताना विस्मरणात गेलेल्या आपल्या संस्कृतीतील  तत्वांचा पाठपुरावा महात्माजींनी केला. खादी ही विशिष्ट काळापुरती मर्यादित चळवळ न राहता तो जीवनाचा स्वभावधर्म होईल इतका पगडा तरूण मनावर बिंबवण्याचे काम या चळवळीने केले. पारतंत्र्याला झुगारून स्वदेशीच्या अभिमानाचं स्फुल्लिंग महात्मा गांधीनी मनामनात चेतवलं.

गांधीजी म्हणत, ” गांधी या नावाचा विसर पडला तरी चालेल पण गरिबांना आधार असलेल्या या चरख्याचा व त्यामागच्या विचारांचा देशाला कधी विसर न पडो.” ते पुढे म्हणत, ” समर्पणाला व त्यागाला आंतरिक व बाह्य शुद्धतेचे पाठबळ  असेल तेव्हाच ते परिणामकारक होते.  शुद्ध त्याग हा दृढ विश्वास राखून प्रसन्न चित्ताने केलेला असतो.  मत्सर, दुर्भावना किंवा शत्रूबुद्धी यांचा पुसटसा सुद्धा स्पर्श नसतो.”

खादी हा कापडाचा तुकडा नाही तर तो ताठ मानेने आयुष्य जगण्याचा मार्ग आहे हा मंत्र त्यांनी दिला.

हा मंत्र आत्मसात करून स्वतः चरख्यावर सूत कातून स्वतःची वस्रे म्हणजे हातरूमाल, साडी, ब्लाऊज, अंथरूण पांघरुण,  टॉवेल ( पंचा), झोळी,  शर्ट,  पायजमा वापरणारी माणसे अजून हा घेतलेला वसा जोपासत आहेत.

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments