श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ??
हॅलो सर तुम्ही पत्रिका बघता का? असा एखाद्या मुलीचा फोन येणे (आजकाल व्हाटसप मेसेज), किंवा सर तुम्ही पत्रिका जुळवून देता का? (न जुळणारी पत्रिका) असे फोन यायला लागले की ओळखायचे “संत प्रेम बाबा दिवस” ( १४/२) लवकरच येत आहे.
माझ्या जोतिषाच्या अभ्यासात ‘ग्रहांकित ‘प्रेम’ प्रकरणांची ‘प्रमेय’ मला अनेक गोष्टी शिकवून गेली. माझी सगळ्यात जास्त भकिते जी बरोबर आली आहेत ती ‘ प्रेम ‘ – प्रकरणाबाबतच. ( लगेच हुरळून जाऊन माझा नंबर घेऊ नका, पुढे वाचा. भाकिते बरोबरच आली यात शंकाच नाही पण ती भकिते प्रेमभंग होईल / अपेक्षित मुलाशी -मुलीशी लग्न होणार नाही अशीच होती. आणि ती एकूण एक बरोबर आली. बाकी संपर्क करायला हरकत नाही, तुमची मर्ज्जी ? )
शास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानशास्त्राचा ही अभ्यास असणे जोतिषाला गरजेचे असते असे सांगितले जाते. याची प्रचिती ग्रहांकित ‘प्रेम प्रकरणात’ नक्की येते. म्हणजे अगदी हातात पत्रिका नसताना ही समोरचा जातक जे बोलतो त्यावरून हे ‘प्रेमप्रकरण’ आहे हे लगेच लक्षात येते. त्याचवेळी शुक्र – मंगल रुलींग मध्ये असला किंवा त्यावेळी पंचमात चंद्र वगैरे असला की या गोष्टीची १०० % खात्री समजावी. याची सुरवातीलाच दोन उदाहरणे दिली आहेत.
नुसत्या पत्रिकेचा विचार करता पत्रिकेतील पंचम स्थानाचे ( प्रेमप्रकरण ), सप्तम स्थानाशी ( विवाह) सूत जुळले की प्रियकर/ प्रेयसी ‘पंचम’दांची ‘ सप्त’ सुरांतील गाणी आळवायला सुरवात करून सप्त-पदीच्या अपेक्षापूर्ती साठी झटू लागतात. खरं म्हणजे पाचव्या पासून सप्तम स्थान फक्त २ पाय-या दूर पण पत्रिकेतील ‘ मंगल, राहू ‘ सारख्या व्हिलनशी सामना करून जे तिथं पोहोचतात ते प्रियकर/प्रेयसी चे नवरा/बायको होतात. जे पोहचू शकत नाहीत ते अपेक्षाभंगाचे दु:ख कायम ठेऊन राहतात. टँरो कार्डेस मध्ये “२ ऑफ कप्स” ( आनंदी जोडपं असं चित्र असलेलं कार्ड ) हे कार्ड मला पंचम ते सप्तम स्थान या दोन पाय-या यशस्वी पणे पार करणा-यांच प्रतीक वाटत. तर “३ ऑफ स्वाँर्ड” हे कार्ड प्रेमभंग झालाय हे स्पष्ट सांगतं
जेव्हा जेव्हा प्रेमभंग हा शब्द ऐकतो तेव्हा तेंव्हा वपुंचं हे लेखन आठवते //
प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र-मैत्रिणींनो माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीनं जे सांगितलं, ते सुत्र हे –
संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो. तासंतास चालणारा. केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण, ही मोठा राग आळवून झाल्यानंतर ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी; पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं, की काही काही स्वर वर्ज्यच असतात. त्याला काय करणार? – म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट नसतो, वगळायचा असतो, तर एक राग उभा करायचा असतो, त्यासाठी आपण तो खुषीनं विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यावयाच्या नसतात. त्यांना गाता – गाता, वाजवता फक्त चुकवायचं असतं
हे सूत्र तुम्हाला पेललं, तर संसाराची तुमची मैफल, रागदारीप्रमाणे बहरेल.
//
‘प्रेम ‘ म्हणलं की पाडगावकरांची ही एक कविता हटकून आठवते. हीच कविता “ग्रहांकित प्रेमाला” अनुसरून अशी लिहावीशी वाटली
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’ अगदी सेम नसतं
काय म्हणता?
या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे
फसल्या तर फ सु दे
तरीसुध्दा
तरीसुध्दा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं
पंचमातील शुक्रकडून
प्रेम करता येतं
सप्तमातील राहू कडून
‘अंतरजातीय” होता येतं
घरचा विरोध पत्करून
गुरुजींना धरता येतं
पत्रिका न पाहता ही’
पळून जाता येतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’अगदी सेम नसतं
//
१४ फेब्रुवारी या ‘ संत प्रेमबाबा दिनाच्या ‘ निमित्याने सदर लेखन संत प्रेम बाबांना प्रेम पूर्वक समर्पीत ?
(ग्रहांकित ‘ प्रेमी ) अमोल ?
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com