श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ मराठी भाषा दिन ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
“मराठी भाषा दिन” ?
मंडळी, नमस्कार ??
‘मराठी भाषा दिन’ अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर जन्मदिवसाचे निमित्य साधून एका शाळेत घडलेल्या एका कार्यक्रमाबद्दल तुम्ही आता वाचणार आहात
२७ फेब्रुवारीला जरी हा दिवस असला तरी शाळेने काही दिवस आधीच हा कार्यक्रम साजरा केला. शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवे ध्वज, पताका यांनी शाळा सुशोभित करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेश द्वारावरच ‘ सुस्वागतम ‘ असे छान फुलांच्या नक्षीकामात लिहिले होते. अनेकांना हा शब्द नवीन होता. लागलीच गुगल भाषांतराद्वारे अनेकांनी त्याचा अर्थ ‘ वेल कम ‘ असा आहे हे जाणून घेतले. शाळेत आज राष्ट्रगीत झाल्यांनतर ज्ञानेश्वर गुरुजींनी पहिला तास सुरु केला. आज आपण मराठी भाषा रुजेल यासाठी काय करावे ? यावर चर्चा करू असे म्हणाले. प्रत्येकाने आपले मत सांगा ( कृपया आज तरी मराठीतच ) असे सांगताच एकेक जण बोलू लागले. त्यातील काही विचार
१) सकल मराठी जनांनी कमीत कमी एकमेकांशी मराठीत बोलावे.
२)महाराष्ट्रात आम्हाला
‘मराठी भाषा दिन’ साजरा करावा लागतोय…..हे आमचेच दुर्दैव…अशा दिनाच्या शुभेच्छा द्यावं लागण म्हणजे तर अजूनच. वाईट…
तरीही मी आजच्या दिवशी अशी सदिच्छा व्यक्त करतो की…निदान ह्या निमित्ताने तरी समस्त मराठी लोक एकमेकांशी मराठी बोलतील, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत देतील. आणी हे करताना अजिबात लाज वाटणार नाही
जय मराठी ?
वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थ्यानेे अशी ☝?प्रतिक्रिया देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला ????
यानंतर शाळेपासून शाळेच्या खेळाच्या मैदानापर्यत ‘मराठी अनुदिनी दिंडी’ निघाली, शाळेभोवतीच्या सहा गल्ल्यातून जाऊन मैदानावर तिचा शेवट होणार होता. वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचा चित्र रथ यावेळी मुलांनी सादर केला. यात प्रामुख्याने भाव खाऊन गेलेले संकेतस्थळ ठरले
माझे टुकार ई-चार ?
(या अनुदिनीचा पत्ता तर सगळ्यांना अगदी तोंडपाठ होता)
शाळेच्या मैदानावर तंत्रशिक्षण खात्यातर्फे प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीवर ‘ मराठी टंकलेखन ‘ बसवून देण्यात होते. तेथेच स्वयंसेवक मराठीत ॐ, क्ष, ज्ञ, त्र. श्र, इ व्यंजन कशी टाकायची याचे प्रात्यक्षिक देत होते
आजच्या दिवसाचे औचित्य साधून शाळेत मुलांसाठी ‘ पंगती जेवण ‘ हा विशेष कार्यक्रम ठरवला होता. काय अप्पा वरचा विनोद ‘ पूर्वी लोक एकाजागी बसायचे आणि वाढपी सगळीकडे फिरत जेवण वाढायचे ‘ याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आणि पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला ?
जेवणानंतर वर्गातील आणखी एका हुशार मुलाने खूप पूर्वीच्या दूरदर्शन वर होऊन गेलेल्या ‘ प्रतिभा आणि प्रतिमा ‘ या कार्यक्रमाचे संकलन सादर केले. हाही कार्यक्रम विशेष भाव खाऊन गेला.
यानंतर एकत्रित ‘ मराठी वृत्तपत्र ‘ वाचन हा कार्यक्रम पार पडला. तरुण भारत, नवसंदेश, केसरी, पुण्य नगरी यांच्या काही जुन्या आवृत्या मुलांना वाचावयास दिल्या. चित्रपटाच्या जहिराती, क्रीडा विश्व, मनोरंजन, कोडी, राजकारणाविषयी बातम्या हे सगळे ‘ काय अप्पा ‘ पूर्वी ही अस्तित्वात होते हे पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सगळ्यात मजा मुलांना आली ती म्हणजे पहिल्या पानावरची बातमी संपताना खालील कंसात लिहिलेले अधिक वृत्त पान ५ वर. आणी मग पुढचा वृत्तांत परत ५ वर जाऊन वाचणे.. तसेच काहीही क्रमशः लेख ही त्यांनी पाहिले, एकंदर हे सदर ही खूप छान रंगले.
एवढ्यातच ‘wake up wake up, its brand new day’ असा मोबाईल मधे गजर झाला आणि सनी झोपेतून उठला. शाळेत वेळेवर जाण्यासाठी तो लगेच आवरु लागला.
पण आज पडलेले हे ‘ मराठीचे स्वप्न ‘ त्याला खूप आवडले होते
(संग्रहित) अमोल ?
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com