श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
विविधा
☆ माणुसकी…… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
माणूसकी,……….
अग कधीचा शोधतोय या कोरोनाच्या काळात मी तुला
खाजगी दवाखान्यात नी, शोधलं सरकारी दवाखान्यात.
सोनोग्राफी, स्कॅन च्या रांगेत.
व्याकुळ झालेल्या लोकांना
मिळत असलेल्या वागणुकीत
शोधतोय तुला मी
पक्षाचे झेंडे नी नावे छापलेल्या नेत्यांच्या त्या शिधा पाकिटात.
नी फोटो व प्रसिद्धीसाठी हपापलेल्या नामधारी सेवकांच्या समाज कार्यात.
शोधतोय तुला मी
औषधांचा काळा बाजार करणाऱ्या अमानवी औषधालयात.
नी पैसे भरल्यावरच मृत शरिर मिळेल म्हणणाऱ्या दवाखान्यात.
अग, कधीचा शोधतोय तुला मी.
पण तू कर्ज बाजारी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील
हास्या सारखी कुठे गायब झालीस?
अरेच्चा………………… तू तर इथेच आहेस……
दिसली तू मला त्या अँब्युलन्स च्या प्रामाणिक ड्रायव्हर मध्ये,
“डरना नहीं, कुछ नहीं होगा, मै पहुँचाता हूँ सही जगह” म्हणणाऱ्यात,
तू दिसली मला त्या परीचारिकेत
तीन दिवसापासून घरी न जाता जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या माऊलीत.
नी दिसली तू मला पैश्याच्या लोभाचे व्यसन न जडलेल्या
त्या कर्तव्यरत डॉक्टर देवात.
आपला बाप वाचत नाही माहित असताना,
शेजारी भर्ती पोरग वाचावं म्हणून धावणाऱ्या मानवात,
दिसली ग तू मला
नी दिसली पुन्हा दवाखान्यात उपाशी असताना,
आपली अर्धी शिदोरी भुकेलेल्याना वाटणाऱ्या निरागसात
तू दिसली मला गुरूद्वारा च्या
लंगर नी प्राणवायू पुरविण्याच्या निष्काम कर्म योगात
नी पाहीले ग मी तुला स्मशानात
सरणावर मृताना हळुवार ठेवणार्या
नी अग्निकर्म पार पाडणाऱ्या त्या महामानवात.
तू मात्र आता प्राणवायू सारखी
दुर्मिळ होतोय, हेच खरे
पण थांब जरा. विश्वाची सारी भिस्त तुझ्यावरच आहे….
तुझ्यावरच आहे……
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈