सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ माणुसकीचे व्रत – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

व्रत म्हटले की साधारण स्रियांची व्रते डोळ्यासमोर येतात. पण पुढे जाऊन पुरूषांचीही,अगदी लहान मुलांची आभ्यासाची व्रतेही यामधे अंतर्भूत होऊ शकतात .अगदी आता सध्याच्या काळात कोणी अध्यात्माच्या माध्यमातून, मनोकायिक स्वास्थ्य ,आनंद,शांती ,समाधान प्राप्त करण्याच्या कलेच्या प्रसाराचे व्रत घेतले आहे. किती व्रते सांगावी तितकी कमीच .पण मला आज व्रतस्थ  अशा  माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या माणुसकीच्या व्रताचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो .काल व परिस्थिती अनुरुप त्यांचे व्रतही कमी लेखता येणार नाही.

माझे वडील, तात्या पूर्वीच्या बार्शी लाईट रेल्वे मार्गावरील  ‘ढोकी ‘या  स्टेशन वर ,स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते .भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा  होत होती. हैदराबाद संस्थानचा निजाम भारतीय संघराज्यात यायला तयार नव्हता. ‘ढोकी’ हे दोन्हीकडील सरहद्दीवरील स्टेशन! गावात आजूबाजूला, खेडोपाडी रझाकारांच्या धुमाकूळ चालू होता. गावागावातील पुढाऱ्यांना धमक्या येत होत्या. खूनही पडत होते. हिंदूंची ही आंदोलन चालू होती .तेही आक्रमक व्हायला लागले होते .सर्वत्र मारामाऱ्या, दंगे, जाळ पोळी  सत्र चालूच होते. गावचा पाटील, ‘ किशनदास गराडे ‘,धमकीने घाबरून साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. तेथूनही  तो सुटू शकला नाही. रझाकारांनी त्याच वेषात ओढत बाहेर आणून ठोकून काढले. खूप आरडाओरडा झाला .अखेर   खच्च. संपवला त्याला—. जाळपोळीही चालू होत्या. ‘जवळा’ नावाचे गावच्या गाव जाळून टाकले. अगदी खोपटी ही त्यातून सुटली नाहीत. मुक्या जनावरांसाठी ठेवलेल्या गंजीची जळून राख व्हायची. शेतात उगवलेली उभी  पिकच्या पिकं कापली जायला लागली. अनेकांनी आपले वैयक्तिक हेवेदावे ही यातच वापरून घेतले. हे सगळं सांगण्याच प्रयोजन काय तर अशा खडतर पण नाजूक वातावरणात , तात्या स्टेशनचे काम करीत होते एकनिष्ठेने, आणी  तणावपूर्ण परिस्थितीत,! स्टेशन सांभाळण्याच्या कर्तव्याचे व्रत घेऊन!

हे स्टेशन दोन्हीकडील लोकांना हवे असल्याने, ते सांभाळण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती .स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम हा फौजदार, रसूल आणि मोहम्मद हे हवालदार रुजू होते. तात्यांना इकडून, तिकडून सर्व नातेवाईकांकडून तारा येत होत्या. निरोप ,पत्र, चिट्ठया,—–नोकरी सोडून या. जीवावर उदार होऊन राहण्याची गरज नाही. इकडे दुसरे काहीही पाहू. सर्वांना काळजी वाटते .पण मोडल तर ते  व्रत कसलं? तात्या नोकरीशी एकनिष्ठता सोडायला तयार नव्हते. ते सतत आईला सांगायचे ‘मुलांना घेऊन तू माहेरी गणेशवाडीला ,नाहीतर सासरी जमखंडीला जा, या दंगलीत भडकलेली डोकी काय करतील सांगता येत नाही”. ती म्हणायची “आम्ही परगावी जाऊन काळजीत अर्धमेले होण्यापेक्षा सर्वांचंच  इथंच काय व्हायचे ते होऊ दे. आणि आपली गोठ्यातली  जनावरं ,कुत्री ,मांजर, हरीणी, शेळी  ही आपली मुलंच ना! त्यांचं काय करायचं? या सगळ्यांबरोबर मीही इथच राहणार.” असं म्हणून तात्यांना गप्प करायची. या मुक्या जनावरांवर दोघांचाही  खूपच प्रेम होत. त्यांच्या सेवेच जणू  व्रतच दोघांनीही घेतल होत. उतू नको, मातू नको घेतला वसा टाकू नको ही संस्कृती तिच्यावर बिंबलेली होती.

दररोज नवीन नवीन घटनांना सामोरं जावं लागत होतं. स्टेशन मध्ये   तात्या  काम करत असताना,  आप्पा पोर्टर कोणाशी तरी भांडत भांडत आत आला. तावातावाने बोलायला लागला. चिडलेल्या  रझाकारांनी  स्टेशन मध्येच त्याला कापून काढला. “मारू नका, मारू नका” तात्या सांगत होते. पण ” जास्त बोलाल तर  फुंकून  टाकू.” अस उत्तर आल. खुर्ची, टेबल ,वह्या सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडले. भयानक दृश्याला सामोरे जावे लागले. अधून मधून तात्यांना तारखांना निजामाबादला जावे लागायचे .तात्या स्टेशन मध्ये ,आई मुलांना,( छोटे उषा व प्रकाश) घेऊन घरात आणि जनावरं गोठ्यात सगळेच तणावाखाली राहात होते .इब्राहिम रसूल आणि मोहम्मद तिघेही सतत सांगत असत —

” चिंता मत करो ।जब तक हम है तब तक कोई आपका बाल भी बाका नही कर सकता”.। असं ऐकलं की थोडा धीर  यायचा.  पण तरीही पुन्हा कधीतरी मनात पाल चुकचु कायची. आपण जे अन्न खातो, तेच त्यांनाही द्यायची .अधून मधून काही ना काही देत रहायची. माणुसकी जपायची. तिघांनाही विशेषतः  इब्राहिमला  तात्यां बद्दल फार आदर होता. आपुलकी होती. कौतुकही होते. तात्यानाही, त्यांच्याबद्दल ओढ वाटायची .बाहेर घडणाऱ्या ( दोन्हीकडील) बारीक-सारीक गोष्टी तो  तात्यांना  येऊन सांगायचा.

क्रमशः ….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments