सौ. वंदना अशोक हुळबत्ते
विविधा
☆ माॅर्निग वाॅक ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
लेकाची बारावीची परीक्षा संपली.सुधाने मोकळा श्वास घेतला.तिला एकदम महिला परिषदेत ऐकलेल्या व्याख्यानाची आठवण झाली.चाळीशीनंतर महिलांनी आपल्या प्रकृतीबद्दल जागरुक रहायला हवं.तिने मनाशी ठरवले उद्या पासून माॅर्निग वाॅकला जायचे.
सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी घराबाहेर पडली.अजून काळोख होता.थोडासा गारवाही जाणवत होता.खूप प्रसन्न वाटले.चार पावले चालली, तेवढ्यात कुत्र्याची कळवळ ऐकू आली.चार- पाच कुत्री एकमेकावर भुंकत होती.जसजसा आवाज जवळ येऊ लागला,तसे सुधाचे पाय लटपटायला लागले.आता ती कुत्री आपल्याच अंगावर आली तर या विचाराने सुधा जागीच थांबली.
मनात आले,आल्या पावली घरी परत जावे.पण घरी जायचा अवकाश , घरातील सगळे हसतील,मी फिरणार म्हणजे हे दोन दिवसाचे नाटक होणार हे समजून आधी तोंडसुख घेतले होते. मी आता घरी परत गेले तर दिवसभर चर्चला विषय.त्यापेक्षा इथंच थांबलेले बरं.पाचएक मिनिटांनी कुत्री बाजूला झाली.तसा सुधाने सुटकेचा श्वास घेतला. पुढे चालू लागली.चार पावले जाते न जाते तोच एका घरातून एक व्यक्ती आपल्या कुत्र्या सोबत बाहेर आली.कंबरे एवढा मोठा कुत्रा होता. जीभ बाहेर काढून दाखवत होता. जरा निरखून पाहिल्यावर दिसले,त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता.तो पट्टा मालकाने धरला होता.आपल्या या कुत्र्यापासून भिती नाही असे म्हणून कपाळावरचा घाम पुसला. पुढे चालु लागली.तो समोरून दोन कुत्री येताना दिसली.अंतर जरा जास्त होते म्हणून तिने स्वत: ला सावरतचं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालायला सुरुवात केली. सकाळी बबसकाळी किती कुत्री असतात रस्त्यात.कसे बरं चालावं? कोण कसे यांना पकडत नाही? किती हा त्रास? मुलेबाळे कशी चालणार या रस्त्यावर?
मोकाट कुत्र्यांचे काही तरी केलेच पाहिजे, असे विचार सुरू असतानाच समोरून येणाऱ्या कुत्र्यानी अचानक वेग घेतला.ती धावत आपल्याच दिशेने येतात असे तिला वाटले.तिने चालण्याचा वेग वाढवला. तशी ती कुत्री अजून जोरात पळत वेगात जवळ येताना दिसली.
आता सर्वांगाला घाम फुटला,पाय लटपटायला लागले.तेवढ्यात दोन शाळकरी मुले त्या कुत्र्यांजवळून बिनधास्त गेली.आता आपण काय करावे? कुठे बसावे? असे वाटू लागले.रस्त्यात चोहोबाजूला पाहिले. बसण्यासारखे काहीच नव्हते.पुन्हा स्तब्ध झाली.
दोन कुत्री समोरच्या मालकाबरोबर चाललेल्या कुत्र्यावर भुंकत होती.ते कुत्रे ही जोरात भुंकू लागले.क्षणभर सुधाला वाटले,ही कुत्री एकमेकांशी बोलत असावीत.आम्ही कसे स्वतंत्र आहोत.हवं तसे हवं तेव्हा कुठे ही फिरतो.लोकांना घाबरवतो, आम्ही मुक्त जगतो.तू मात्र मालकाच्या तालावर जागतोस.त्यांनी फिरायला बाहेर काढले तर फिरणार नाही तर दिवसभर घरात एका जागी बांधून पडणार.मालकांनी दिलं तर खाणार, फिरायला नेहले तर फिरणार,त्याच्या घराची राखण करणार.तोड ते बंधन.हो मुक्त.चल आमच्या बरोबर….हे काय सूचतय मला?या विचाराने तिला हसू आले.
कुत्रा जास्त पायात येताना त्या कुत्र्याच्या मालकाने त्या कुत्र्याला हुसकावून लावले.तशी कुत्री पायात शेपटी घालून लांब निघून गेली.तो मालकही आपल्या कुत्र्या सोबत दुसऱ्या गल्लीत वळला. सुधा भानावर आली.आपला बराच वेळ रस्त्यातच गेला.आता भरभर चालले पाहिजे असे म्हणत ती एका ग्राऊंडजवळ आली.लोखंडी फाटकातून आत पाऊल टाकणार तेवढ्यात समोरून एक कुत्रे आले आणि उडी मारून गेले.हे इतकं अचानक झाले तिला काही कळलेच नाही.भितीने हृदयाचे ठोके मात्र वाढले.फाटकाच्या आधाराने काही क्षण उभारली आणि चालू लागली.तोच दोन कुत्र्यांची पिल्ले जवळून पळत गेली.आज काय कुत्रे डे आहे का?
सकाळपासून सगळीकडे सगळी कुत्री माझ्याच मागे का? काय घोडे मारले मी त्यांचे? या विचारात चालत असताना तिला जाणवले तिची ओढणी कुणी तरी मागून ओढत आहे.तिला पुढे चालता येईना.मागून कुत्री भुंकत आहेत.असा भास झाला.तिची ओढणी कुत्र्यांने तोंडांत धरली आहे असे जाणवले.जवळ जवळ मोठ्याने ती किंचाळली.माॅर्निग वाॅक करणारे लोक थांबले.ते धावतच सुधा जवळ आले.आपल्या काय होतय हे कळायच्या आता तिला भोवळ आली.एकाने तोंडावर पाणी मारले.” मॅडम काय झाले?बरं वाटतंय का?”
आपल्या भोवती माणसांचा गराडा पाहून तिला काय झाले ते कळलेच नाही.
” काय झाले मला?”
” अहो आता तुम्ही किंचाळलात?भोवळ आली तुम्हाला.आम्ही विचारतोय तुम्हाला काय झाले?”
“मला…मी…मला…कुत्रे…कुठाय ?”
” कुत्री… ती काय तिकडे लांब खेळत आहेत.”
तिने पाहीले तर खरंच कुत्री लांब होती.तिने आपली ओढणी बघितली.
” आता माझी ओढणी कुत्र्यांनी पकडली होती ना?”
” नाही.तुमची ओढणी त्या झुडपात अडकली होती.मी काढली.”
हे ऐकून सुधा चांगली ओशाळली.सावरत उठली.इकडे तिकडे न बघता तिने तडक घर गाठले. पुन्हा कधी ही माॅर्निग वाॅकला न येण्याच्या दृढ निश्चयाने.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈