सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
(पौगंडावस्थेतील मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे चांगले किंवा वाईट लक्षात न घेता कोणत्यातरी आकर्षणाच्या मागे धावायला लागते, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे.) —– इथून पुढे—-
मुलांना वाढवत असताना त्यांच्या वयाचा विचार करता, अगदी लहानपणापासून ते सात आठ वर्षापर्यंतची ,आणि नऊ दहा वर्षापासून ते टीनएज पर्यंतची ,व पुढची मुलं असा विचार करावा लागेल .अगदी लहान असताना मुलं अनुकरणातून शिकत असतात. बिंब जसे असेल तसेच प्रतिबिंब पडणार. त्यामुळे पालकांनी आपल्यापासून सुरुवात करावी. त्यांना संस्कार वर्गाला पाठवावं. ज्यायोगे त्यांच्या वर्तणुकीत फरक पडतो .मूल थोडे मोठे झाले की, शाळेत जायला लागते. घरी आल्यानंतर घरात कोणीतरी असले की त्याला आनंद होतो. शाळेत घडणाऱ्या गोष्टी सांगायला त्याला कोणीतरी हवं असतं. त्याला आधार हवा असतो. त्यामुळे त्याला प्रेमाचा ओलावा मिळतो. ऊब मिळते. एक उपाय मला आवर्जून सांगावासा वाटतो की, वृद्धाश्रम आणि बालवाड्या जवळ-जवळ असाव्यात. त्यांना एकमेकात मिसळून द्यावे. ज्यायोगे, वृद्धांना बोधपर ,प्रेरणादायी अशा गोष्टी मुलांना सांगता येतील. मुलांनाही आजी-आजोबा, आणि वृद्धांना नातवंडांचा सहवास मिळेल. मुलं थोडी मोठी झाली की, स्वतःचे स्वतः काही प्रमाणात निर्णय घ्यायला लागतात. त्यांना ते तसे घेऊ द्यावेत. चूक होणे स्वाभाविक आहे .पण अशा वेळी सतत चुकीचा पुनरुच्चार न करता,
चुकीची दुरुस्ती करून सांगावी. “तुला काय येतय? तो बघ किती हुशार आहे”. असं म्हणून आपल्या मुलाची सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करू नये. त्यांना आश्वासक अशा सहवासाची, प्रेमाची गरज असते .बऱ्याच वेळा आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो असं मला वाटतं .चूक स्वीकारणं, चूक सुधारणं आणि चुकायचं टाळणं हे त्यांना पटवलं पाहिजे. भूतकाळातील चुका, त्यासाठीच्या शिक्षा या भविष्यकाळातल्या यशाच्या पायऱ्याही बनू शकतात. मुलं पौगंडावस्थेत आली की, संवेदनशील बनतात. त्यांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व घडत असतं. त्यांना कोणी अपमान केलेला आवडत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे त्यांनी करावी ,अशी पालकांनी अपेक्षा बाळगणं योग्य नाही. त्याच्या कुवतीप्रमाणे अपेक्षा बाळगाव्यात. नाहीतर “श्यामची मम्मी” नाटकातील श्यामची अवस्था पहावी लागेल. जे पालक मुलांना चुकांमधून शिकण्याची हिम्मत देतात, चुका दुरुस्त करून सांगतात ,तेच पालक मुलांसमोर आदर्श ठरतात. अभ्यास करताना, त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून, विचारविनिमय करून, प्रोत्साहन दिलं तर, ती एक पाऊल नक्कीच पुढे टाकतील. या वयात मुलांना विरुद्धलिंगी आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार किंवा अतिरेक होत नाही ना, इकडे लक्ष द्यायला हवे. त्यांचे मित्र मंडळ कसे आहे? मुलाचं वागणं कसं आहे? याकडेही लक्ष द्यायला हवं .आजच्या विज्ञान युगात मुलांसोबतचा संवाद हरवत चाललाय. पालकांनी कौटुंबिक सुसंवाद आणि मित्रत्वाचं नातं जपायला हवं. सामाजिक प्रतिष्ठेपायी मुलांनी अमुकच व्हायला हवं, असं त्यांच्यावर दडपण आणलं आणि अपेक्षाभंग झाला तर सर्वांनाच निराशाजनक समस्यांना तोंड द्यायची वेळ येते.
मुलांचा जवळ-जवळ अर्धा दिवस शाळेत जातो. त्यामुळे ती बऱ्यापैकी शाळेत घडतच असतात .वाढत असतात. अधून मधून पालकांनी शिक्षकांकडे पाल्याबाबत चौकशी करावी. शिक्षकांनीही शुद्ध चारित्र्य ठेवायला हवे. तर-तम भाव न ठेवता, मुलांना समान वागणूक द्यायला हवी .शिक्षणात विद्यार्थ्याचा कल कुणीकडे आहे, हे शिक्षकांनी पालक सभा घेऊन सांगावे. पालकांनी घरात शिक्षकांबद्दल अनुद्गार काढू नयेत. त्याचा परिणाम म्हणून मुलांच्या मनात त्यांच्याविषयी अढी बसते.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈