सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
मुलांना कसे वाढवावे?
((पालकांनी घरात शिक्षकांबद्दल अनुद्गार काढू नयेत. त्याचा परिणाम म्हणून मुलांच्या मनात त्यांच्याविषयी अढी बसते.) इथून पुढे —
मुलांना मैदानी खेळांमध्ये भाग घ्यायला जरूर पाठवावे .त्यामध्ये यश- अपयश हे ठरलेलेच असते. त्यामुळे यशाच्या आनंदाबरोबर अपयशही पचविण्याची सवय होते. यश- अपयशाच्या पलीकडे जाऊन ,भविष्यकाळ कसा घडवता येतो, याची उदाहरणे त्यांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवायला हवीत. अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, नारायण मूर्ती, अंबानी, अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर ,हे काही एका क्षणात मोठे झालेले नाहीत .त्यांची जिद्द, आत्मविश्वास ,प्रयत्नांची पराकाष्ठा, शिस्त, आदर्शाचा अंगीकार आणि आत्मपरीक्षण मुलांच्या समोर, शाळेत व घरात दाखवायला हवे. मुलांच्या हित- अहिताच्या गोष्टींची समजुतीच्या शब्दात त्यांना जाणीव करून द्यायला हवी .’कसे जगावे,’ याबाबत व्यायाम, प्राणायाम, ध्यान ,भाषणे यांच्या माध्यमातून भरणाऱ्या शिबिरांना त्यांना जरूर पाठवावे .त्यातून खूप फरक पडतो ,असा माझा अनुभव आहे. व्यायामाबरोबर आहार शक्य तितका शाकाहारी व सात्विक देण्याची जबाबदारी पालकांची आहे असे मला वाटते. शक्यतो बाहेरचे आणि जंक फूड खाणे योग्य नाही. दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत. पण स्लो पॉइझनिंग सुरू होते. घरात ताणतणाव वाटल्यास, घरात स्वास्थ्यसंगीतही लावावे.
मुलांना वाढवत असताना घर, शाळा याबरोबरच बाहेरच्या समाजातही ती वाढत असतात. एखाद्या मुलाचा पाय घसरला असे वाटत असेल तर ,इतरांनी ती गोष्ट पालकांना सांगायला हवी व त्याबद्दल पालकांनी राग मानू नये. तरुण पिढीला सर्वांनी मिळून घडवायला हवे .ब्ल्यू व्हेल, सारख्या चोकिंग गेम , हफिंग, डस्टिंग ,एबीसी स्क्रँचिंग अशा सगळ्या गेम्सवर सरकारकडून बंदी आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे अडचणीत असलेल्या मुलांना सामाजिक पाठबळ देऊन, ‘समाज आणि मुलांचे वाद सामंजस्याने मिटविणारी व्यासपीठे’ व्हायला हवीत. अध्यात्मिक विचारधारेतून त्यांच्यामध्ये उत्साह व महत्त्वाकांक्षा निर्माण केली पाहिजे. “नीरक्षीरविवेक आत्मनात्मान “.
मनुष्यजन्म ही परमेश्वराची महान देणगी आहे. आयुष्य हे जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास आहे .तो प्रवास वाटेत गाडीतून उडी न मारता, सर्वांसोबत आनंदाने ,उत्साहाने, खेळीमेळीने असा करावा. ‘आनंद ‘ हा इप्सित स्टेशन पर्यंत गोळा करत रहावा . गेलेला काळ परत मिळत नाही. आलेल्या अडचणींचा स्वीकार करून, त्यांना पुढे जायला प्रवृत्त करायला हवे. लहानपणापासून मुलं खरोखरीच आदर्श विचारधारेत वाढली तर ती म्हणत रहातील,—-
“आज जाणिले,आम्ही जन्मलो राजहंस की होण्यासाठी,
आज जाणिले, या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी.”
——आणि हेच पद ती मुलं मित्रांमध्ये पसरवतील.
शेवटी सांगावसं वाटतं की, खरोखरीच पाल्यांच्या बाबतीत पालक काळजीत पडलेले आहेत. प्रत्येकालाच आपली मुलं सद्गुणी, सद्वर्तनी, स्मार्ट व्हायला हवीत असं वाटत असतं. स्वतः पाल्य, पालक ,शाळा आणि समाज सगळ्यांनी जर या बाबतीत जागरूकता दाखवली तर, सुदृढ
व्यक्तिमत्व असलेली तरुण पिढी ,जी राष्ट्राचा आधार आहे ,ती राष्ट्रोद्धारक होईल यात शंका नाही. हीच पिढी भारताला महासत्ता बनविणार आहे. ही गोष्ट एकट्या दुकट्याने करण्याची नाही, तर सर्वांनी मिळून, सर्वांच्या मुलांसाठी हातभार लावायला हवा, असे आवर्जून म्हणावेसे वाटते..
ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्विषावहै
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈