सुश्री संगीता कुलकर्णी

लेखिका, कवयित्री, निवेदिका, मुलाखतकार

व्याख्याती म्हणून निमंत्रित

लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, ठाणे वैभव अश्या अनेक नामांकित वृत्तपत्रात लेखन प्रसिद्, आध्यात्मिक लेख ही प्रसिद्ध

कोकण मराठी साहित्य परिषद-ठाणे शाखा, आचार्य अत्रे कट्टा– ठाणे या संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यरत तसेच

कोकण मराठी साहित्य परिषद-ठाणे तर्फे लेखिका म्हणून जेष्ठ नाटककार लेखक नाट्यदिग्दर्शक नाट्यअभिनेते श्री अशोक समेळ यांच्या हस्ते सत्कार २०१९ , अनेक सन्मान

☆ विविधा ☆ मी आणि पाऊस ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पावसात मला भिजायला आवडतंच. बेभान होऊन पाऊस अंगभर गोंदवून घेण्यासाठी तर मी वेडीपिशी होते पण हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या आपल्या माणसासोबत धुँवाधार पावसात भिजण्याची माझी अनावर इच्छा प्रत्येकवेळी पूर्ण होतेच असं नाही.  माझी आणि माझीच वेडावणाऱ्या पावसाची गोष्ट…

माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस  पहिला पावसाळा मी बघितला माझ्या इवल्या नाजूक डोळ्यांनी पण दुसऱ्या पावसाळ्यात मात्रं पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेण्यापासून कुणीही रोखू शकलं नाही मला.. पावसातलं माझं  रूप बघून सगळ्यांना कोण आनंद झाला. कित्येक पावसाळे आले आणि गेले …रांगायला,चालायला लागलेली असताना कुतूहल म्हणून माझं पावसात भिजणं हळूहळू मागे पडत गेलं. पाऊस आला की ” सर आली धावून मडके गेले वाहून ” हे म्हणायला शिकलेल्या शाळकरी वयात फक्त माहीत होतं. दप्तर न भिजवता एका हाताने छत्री धरून दुसऱ्या हाताने गणवेश सावरत वाटेत आडव्या येणा-या खड्डयात थुईथुई नाचत घर गाठणं. मुसळधार पावसात कपडे, दप्तर भिजण्याची पर्वा न करता सायकल दामटवत रस्त्यावरून  बेफिकीरपणे जाण्याचं मला नेहेमीचं माझचं कौतुक वाटत राहायचं. खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून तळहातावर पाऊसथेंब झेलण्यावरचं मला बऱ्याचवेळा समाधान मानावं लागलं. मैत्रींणींसोबत मजा म्हणून पावसात भिजल्यानंतर मिळालेला आईचा ओरडा , खाल्लेला मार आणि पुढे चार दिवस गळणारं नाक मला आजही विसरता आलेलं नाहीय…

खऱ्या अर्थानं मला पाऊस आपलासा वाटला  मी स्त्री असण्याची सगळी बंधन झुगारून पाऊस रोमारोमात भरून घ्यावासा वाटला जेव्हा माझ्यात ऋतूबदल झाला तेव्हा..एक नवाचं पाऊसबहर माझ्या मुक्कामाला आला.  आणि पाऊस मला माझा

जीवलगसखा प्रियकर वाटायला लागला.  मी डोळ्यांत पाऊस आणून पावसाची वाट पाहायला लागली  आणि तो येण्याच्या नुसत्या चाहुलीनेही कावरीबावरी होऊ लागली.  पाऊस मला  खुणवायचा  हातवारे करायचा तेव्हा मी मनोमन लाजायची, खट्याळ हसायची. माझ्यातल्या  कोवळ्या वृत्ती तरारून यायच्या. मी आंतर्बाह्य पावसाळी होऊन जायची.  मग सगळी बंधनं झुगारून एका अधिर उत्कटतेने प्रत्येक भेटीवेळी त्याच्या बाहुपाशात शिरून रीती व्हायची पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने भेटणारा तो पाऊस मात्र मला अजूनही परिपूर्ण वाटत नव्हताच. चिंब भिजल्यावरही माझ्या मनाचा एक कोपरा कोरडाच  असायचा. काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहायचं….मला काहीतरी गवसलंय पण… अजून जे खूप मौलिक आहे पण ते हवं होतं. माझ्या  नजरेला कशाची तरी ओढ होती .. कुणाची तरी आस होती. . पण कशाची आस, कुणाची ओढ?

आणि मग अशाच एका मुसळधार पावसात मला तो भेटला. भर पावसात छत्री असूनही ती न उघडता हात पसरून पाऊस कवेत घेणारा.. पावसाइतकाच प्रिय वाटणारा माझा  प्रियकर.  “पाऊस ओढ”  हा आम्हां दोघांमधला सामाईक दुवा ..अजून काय हवं होतं मग..!

मला पावसाइतकीच त्याचीही ओढ वाटायला लागली. ” ये बारीश का मौसम है मितवा, ना अब दिल पे काबू है मितवा” असंच काहीसं मी  गुणगुणायला लागलेली. आभाळ भरून आलं की अंगात वारं भरल्यासारखी मी त्याला भेटायला जायची.  तेव्हा तो म्हणायचा, ” जब तू हसती है, बारीश होती है ” तेव्हा माझा उभा देह पाऊस होऊन जायचा  मला त्याच्यासोबत पावसात भिजायचं असायचं. त्याचा हात हातात घेऊन त्याला बिलगून धो धो कोसळणारा पाऊस मनात , देहात साठवून घ्यायची मी.. माझ्या ओल्या केसातून ओघळणारे पाऊसथेंब तो तळहातावर घ्यायचा आणि  पिऊन टाकायचा तेव्हा तर भर पावसात माझे भरून आलेले डोळे तो त्याच ओल्या तळहाताने पुसायचा. तेव्हा ती म्हणायची, ” आपल्या घराचं नावही आपण पाऊसच ठेवायचं.” पावसाचे काही थेंब वरच्या वर अलगद झेलून तो माझ्या ओंजळीत द्यायचा.

असे कितीतरी प्रेमपावसाळे आम्ही  अनुभवले. जगण्याचा उत्सव केला. माझ्या मनातला एक कोरडा असलेला कोपरा चिंब चिंब  भिजून गेला होता. माझ्यातल्या अपूर्णत्वाची जागा पूर्णत्वाने घेतली होती. नदी दुथडी भरून वाहत होती. मनातल्या समुद्राला भरती आली होती. “आकंठ” या शब्दांची अनुभूती मी साक्षात जगत होती. माझ्या मनात ढोलताशे वाजत राहायचे. त्याने माझ्या आत दडून बसलेला मनमोर शोधून द्यायला मदत केली होती. मी तो मनमोर प्राणपणाने जपला त्याच्यासोबतीनं.. मनमोराचे पिसारा फुलवून नाचणे हे मी आतल्या आत अनुभवत राहिली.

पण मग एक दिवस खूपच मोठा अवकाळी पाऊस आला. मी आणि माझ्या प्रियकरानं भर पावसात  पावसाच्या साक्षीनं हातात हात घेऊन रंगवलेली सगळी स्वप्नं एका क्षणात माझ्या नजरेच्या टप्प्यापासून फार दूरवर वाहून गेली.  पाऊस झेलून परतताना त्यानं मला दिलेलं आणि मी  खिडकीवर टांगून ठेवलेलं चिमणीचं घरटंही  उडून खाली पडलं. खिडकीचे गज हातात घट्ट पकडून मी  पुढचे कित्येक दिवस बाहेरच्या पावसाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत माझ्या डोळ्यातूनचं पाऊस सांडत राहिली. आणि तो पुन्हा कधीच पावसात भिजणार नसल्याचा निरोप माझ्या जवळ ठेऊन गेला.

माझं अवखळ ,अल्लडपण मागे पडलं, माझं गावं बदललं , घर बदललं घरातली माणसं बदलली  पण पाऊस मात्रं होता तसाचं राहिला माझा पहिला वहिला प्रियकर…

मला आजही त्याच्या आठवणीत नखशिखांत पावसात भिजावसं वाटतं. आता मी पावसात माझा  पाऊसवेडा प्रियकर पाहते.

माझ्या  बदललेल्या जगात मला हवाहवासा पाऊस सतत माझा पदर धरून  असतोही.  पण आता मात्रं निर्बंधांच्या साखळ्या अधिक मजबूत झालेल्या आहेत.

आकाशात काळे ढग दाटून आले की स्वतःची पावसात भिजण्याची इच्छा बाजूला ठेऊन दोरीवर वाळत घातलेले कपडे भिजू नयेत याची मला काळजी घ्यायची असते. घरात पाऊस येऊ नये म्हणून  दारं खिडक्या गच्च लावून घ्यायच्या असतात.. घ्याव्या लागतात.  घरातल्यांच्या  “अद्रकवाली चाय” च्या व   “गरमागरम कांदाभजीच्या”  फर्माईशी पुऱ्या करायच्या असतात. खिडकीतून दिसणारा पाऊस बघत बघत कपात चहा ओतताना प्रियकरासोबत पावसात भिजलेली , मनात पुन्हा पुन्हा उसळी मारून वर येणाऱ्या त्या  ” ओल्या आठवणी'”  डोळ्यांच्या तळ्यातून डोकं वर काढून बाहेर येऊ नयेत म्हणून जिवाचा आटापिटा करायचा असतो. केलेला असतो.. साडीचा पदर कमरेला खोचून पावसात भिजून आलेल्या त्याच्या ‘ “टाॕवेल दे ”, शर्ट दे'” सारख्या मागण्याही पूर्ण करायच्या असतात. शाळेतून भिजून आलेल्या मुलांची दप्तरं सुकवायची असतात.  या सगळ्या धावपळीत मला माझा पाऊस सतत खुणावत असतो, प्रेमाने हात पुढे करत असतो. मला मिठीत घेण्यासाठी आसुसलेला असतो पण मला त्याच्याकडे एक साधा कटाक्ष  टाकायलाही आताशा उसंत मिळत नाही…

माझी धांदल संपत आलेली असते. तेव्हा पाऊस वेड्यासारखा धुँवाधार बरसून निघून गेलेला असतो. खिडकीचे गज धरून पुढचा कितीतरी वेळ मी  डोळ्यातून अखंड पाऊस सांडत राहते पाठमोऱ्या पावसाकडे बघत….

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments