सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत — संक्रमण. संक्रांतीचा सण हा निसर्गाचा उत्सव आहे .भारत हा कृषिप्रधान देश असल्याने निसर्गाशी, शेतीशी निगडित असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,म्हणजे संक्रमण करतो, तो दिवस 14 जानेवारी. सूर्य भ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी, दर 80 वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. व 15 जानेवारीला संक्रांत येते. यानंतर दिवसाचा काळ मोठा, आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. धार्मिक हिंदू लोक उत्तरायणात मृत्यू यावा, असा जप करतात. मृत्यूलाही थांबवून धरणारे पितामह भीष्म हे उत्तम उदाहरण आहे.

संपूर्ण देशभर या सणाला महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटक आणि केरळ मध्ये संक्रांति ,उडुपी भागात संक्रमण, तर काही ठिकाणी, यादिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली, म्हणून त्यास उत्तरायणी असेही म्हणतात .तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते, म्हणून कापणीचा सण, असेही म्हणतात .तेलगू त्याला पेंडा पाडुंगा , बुंदेलखंडात सकृत, उत्तरप्रदेश बिहार मध्ये, खिचडी करून सूर्याला अर्पण करून, दानही  दिले जाते, म्हणून या दिवसाला खिचडी असेच  म्हणण्याची प्रथा आहे. गंगासागर मध्ये या दिवशी खूप मोठा मेळावा भरवला जातो. हिमाचल हरियाणामध्ये मगही आणि पंजाब मध्ये लोव्ही म्हणतात. मध्यप्रदेशात सक्रस, जम्मूमध्ये उत्तरैन, काश्मीर घाटी मध्ये    शिशुर संक्रांती, आसाम मध्ये भोगाली बिहू, तर ओरिसामध्ये आदिवासी या दिवशी पासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळ मध्ये तर हा उत्सव  ७–14 –21           किंवा  40 दिवसांचाही करून, संक्रांति दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये  दान घालून गुप्त दान देण्याची पद्धत आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे, पतंग उडविण्यासाठी मैदानात किंवा गच्चीत जावे लागते. आणि आपोआपच  सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही  जोडलेले आहे. त्यादृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.

सूर्याचा ( पृथ्वीचा ) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला धुंधुरमास किंवा धनुर्मास म्हणतात.( 13 डिसेंबर ते 1३ जानेवारी). मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. याबाबत पुराणातही एक कथा सांगितली आहे. या काळात एखाद्या दिवशी तरी पाहाटे स्वयंपाक करून, उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

आपल्याकडे संक्रांत हा तीन दिवसाचा उत्सव साजरा करतात. भोगी, संक्रांत ,आणि किंक्रांत.

भोगी दिवशी  सुगडाच्या (सुघटचा अपभ्रंश  सुगड असा असावा ). पूजेचे महत्व असते. मातीची नवीन गाडगी, ( घट) कोणी दोन, कोणी पाच अशी आणून, त्यापैकी एका मध्ये अगदी छोटी बोळकी ,(ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात). घालतात. ऋतूप्रमाणे शेतातून आलेले गाजर, घेवडा, शेंगा, सोलाणा, ऊस, बोर, तिळगुळ, असे जिन्नस त्यामध्ये भरून, ती देवापुढे ठेवून , त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ ,शेंगा, पातीचा कांदा ,मुगाची डाळ, तांदूळ, लोणी, वस्त्र, विड्याचे पान, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर अगदी स्नानासाठी शिकेकाई, खोबरेल तेल असे सर्व ठेवून ते  वाण स्नानापूर्वी एखाद्या सुवासिनीला  देण्याची पद्धत आहे .या दिवशीच्या स्वयंपाकात  तीळ लावून  बाजरीच्या भाकरी राळ्याचा भात किंवा खिचडी आणि वरील सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी  (या भाजीला लेकुरवाळी असे नाव आहे.) भरपूर लोणी, दही असा हा आरोग्यदायी घाट असतो.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments