श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिनाअखेरचे पान -1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
महिनाअखेरचे पान
बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला आणि आज तर जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस ! इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा पहिला महिना असला तरी भारतीय कालगणनेप्रमाणे या महिन्यात सुरूवातीला मार्गशीर्ष महिन्याचे काही दिवस येतात व अमावस्येनंतर पौष महिन्याचे दिवस येतात.कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे प्रत्येक महिन्यातच असे काही दिवस येत असतात.पण आपण मात्र या दोन्ही पद्धती विचारात घेऊन त्यांना आपलेसे केले आहे.एकीकडे आपल्या कालगणनेप्रमाणे आपण आपले सण,उत्सव,परंपरा जतन करत आलो आहोत तर दुसरीकडे जागतिक कालगणनेला स्विकारून त्यातील नोंदीनुसारही आपण सर्वांबरोबर वाटचाल करत आहोत.
नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव संपतो ना संपतो तोच आणखी एक गोड संदेश आपल्या कानावर येतो.तो म्हणजे ‘गोड गोड बोला’.संक्रांतीच्या सणाला लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच एकमेकांना ‘ तिळगूळ घ्या,गोड बोला ‘ असा आपुलकीचा संदेश देत तिळगूळ आणि तिळाच्या वड्या वाटून आनंद,स्नेह,प्रेमच वाटत असतात.लहान मुलांचा उत्साह पाहून आपणही लहान होऊन जातो आणि ‘ग्गो ग्गो बोला’ म्हणत त्यांच्याबरोबर लहान होऊन जातो. संक्रांतीचा आदला दिवस भोगी व पुढचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या या दिवसांत तिळ आणि गूळ यांच महत्व सांगणारा हा सण आपल्या पूर्वजांच्या आरोग्यविषयक दक्षतेचे प्रतिक आहे.आपल्या प्रत्येक सणामागील विज्ञान आपण समजून घेतले तरच या परंपरा,सण जतन करता येतील.
या पारंपारिक सणाव्यतिरिक्त अन्य काही महत्वाच्या घटना या जानेवारी महिन्यात घडून जातात.त्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत.याच महिन्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊसाहेब ,स्वामी विवेकानंद आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते.सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन हा दिवस बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवादिन म्हणून साजरा होतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी,भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथि याच महिन्यात असते.या सर्वच थोर विभूतींचे स्मरण या निमित्ताने केले जाते.
या महिन्यातीतल आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे 26जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन!याच दिवशी 1950 साली आपण प्रजासत्ताक राज्यपद्धती स्विकारली व लोकशाहीच्या मार्गाने आपला राजकिय व सामाजिक प्रवास सुरू झाला.
असा हा वर्षाचा पहिला महिना आज संपत आहे आणि उद्यापासून काळाचा प्रवेश पुढील महिन्यात होत आहे.भेटू पुढच्या महिनाअखेरीला. तोपर्यंत गोड गोड बोला…
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈