विविधा
☘️ मधुमास ☘️ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
दारातली मंजि-यांनी डवरलेली तुळस, कळ्यांनी पानोपानी लगडलेली सायली ,मोगरा ,एकाआड एक कळ्यांचा गुच्छ फुलवणारा निशिगंध, सगळी झाड वेली उन्हाची तगमग कमी होताच त्यांना पाणी देताना तरारून आली . त्यांचा मंद सुगंध वाऱ्यावर तरंगत आला अन्, मन प्रसन्न झाले.
वसंताच्या आगमनाने खरं तर सृजनाचा सोहळा सुरू झालाय. दारातला कडूनिंब आपली नवी नवेली पालवी हलवत वाऱ्यावर मस्त झुलतोय. त्याच्या पिवळसर पांढऱ्या इटुकल्या फुलांनी क्षणातच सगळीकडे थोडीफार पखरण केली त्याचा सुवासही आगळाच…! अंगणातली छोटीशी हिरवाई निरखताना वाटतं अरे ही तर चैत्रपालवी..! नव्या वर्षाच्या नव्या ऋतूची म्हणजे बहरा तल्या वसंताची गुढी आपण उभारतो. त्याच्या स्वागतासाठी आंबाही मोहराची मस्त सुगंधाची लयलूट करत असतो. चैत्रपालवी ने अवघा आसमंत नव उन्मेषाने झळाळून वाऱ्यावर डोलतो. पर्णहीन उघडा बोडका गुलमोहर, पळस लाल भडक केशरी फुलांनी अंगोपांगी बहरून उन्हाचं छत्र डोक्यावर घेऊन उभा राहतो. शिशिराची फुलं पाना आडून सुंदर पिसारा फुलवत सुगंध चौफेर पसरवतात. होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्याच्या सुरुवातीची अशी विविध रंगांची, गंधाची अन् रसाचीही उधळण करून ग्रीष्माचा दाह मनमोहक करण्याची निसर्गाची किमया मनाला स्पर्शून जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव वर्षाची गुढी उभारताना आपण नव्या नवलाईने, नव्या उमेदीने अन नव्या चैतन्याने नववर्षाला सामोर जातो ते यामुळेच!.
चैत्र महिन्यात फुलातून, फळातून मधुरस नुसता पाझरत असतो. कदाचित यामुळेच चैत्राला मधुमास असही म्हणतात. वर्षाचा हा प्रथम मास म्हणजे सर्वांना आनंद देणारा उत्सवप्रिय लोकांना सण,उत्सव साजरे करण्यासाठी कारणे देणारा, प्रोत्साहन देणारा असा आहे. या महिन्यातील एक पूजा उत्सव म्हणजे गौरी. शंकराचा दोलोत्सव. काही ठिकाणी यावेळी गौरी शंकराचा विवाह सोहळा ही करतात. माझ्या माहेरी हा उत्सव पूजा आहे .नंतरच लग्नाच्या तिथी, मुहूर्त असतात. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरीची तीज .अक्षय तृतीय पर्यंत हा दोलोत्सव असतो. गौरी म्हणजे साक्षात वनदेवी! तिला वसंत गौर ही म्हणतात. हळूहळू उन्हाळा वाढू लागतो आणि पाना आड दडलेल्या बाळ कैऱ्या बाळसं धरू लागतात. वाऱ्याबरोबर फांद्यांच्या झोक्यावर झोके घेऊ लागतात. त्याच बरोबर आंबट गोड पन्हं उन्हाची तगमग कमी करत, कैरीची वाटली डाळ पन्ह गौरीच्या दोलोत्सवाची, हळदी कुंकवाची लज्जत वाढवतात . त्याबरोबरच कलिंगडाची, काकडीची रसदार फोड हवीच असते. सुवासिनींची ओल्या हरभऱ्याची ओटी, त्यांची खमंग उसळ आणि थंडगार उसाचा रस याचा आस्वाद आगळाच..
श्रीराम दोलोत्सव, श्री हनुमान जयंती ही याच महिन्यात येतात. फाल्गुन ,चैत्र, वैशाख हे तीन महिने वसंत ऋतु असतो. पण चैत्र महिन्यात त्याचा सन्मान अधिक होतो असं वाटतं. कारण मनाला उल्हसित करणारे सण उत्सव सोहळे याचा आनंद या महिन्यात आपण जास्त घेतो.
रसदार फळं ,गंधमय फुलं, हिरवीगार चैत्रपालवी अशा बेसुमार रंगांनी नटलेला प्रखर उन्हाने अंग भाजेल असा, पण तरीही अत्यंत शितल सुखकारक अशा वाऱ्याने तनामनाला सुखविणारा, दृष्टीला भ्रांत करणारा चैत्रमास — मधुमास मनाला नेहमीच भुरळ घालतो एवढं खरं…!
© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड- पुणे.
मोबा. ९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈