सुश्री सुनिता गद्रे
विविधा
☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
इसवी सन पूर्व दोनशे ते तीनशे असा कालखंड … त्यावेळी विंध्य पर्वताच्या दक्षिणेस म्हणजेच साधारण हल्लीचा गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा भाग….त्या काळात तेथे सातवाहन वंशाचे राज्य होते. तर त्यापैकी एका सातवाहन राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही कहाणी आहे. प्रतिष्ठान( पैठण)प्रदेशात एक छोटेसे गाव होते सुप्रतिष्ठित….तेथे सोमनाथ शर्मा नावाचे एक विद्वान पंडित राहत असत. त्यांचा नातू म्हणजेच गुणाढ्य… तो लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होता.दक्षिणापथ येथे विद्या प्राप्त करून तो आपल्या गावी परतला. या प्रतिभावान विद्वान तरुणाला सातवाहन नरेशाने मंत्रिपद बहाल केले.
असेच एकदा सातवाहन राजा आपल्या राण्यांबरोबर राजमहालाशेजारी असलेल्या वापीवर (मोठी विहीर) जलक्रीडा करीत होता. एक राणी त्याने उडवलेल्या पाण्याच्या माऱ्याने त्रासुन गेली होती. ती एकदम राजाला म्हणाली,
“मोदकैस्ताडय!”
राजाने ह्या संस्कृत वाक्याचा अर्थ केला होता की मला मोदकांनी( लाडूंनी) मारा. त्यामुळे त्याने ताबडतोब खूप सगळे लाडू आणण्याचा आदेश सेविकांना दिला. हे बघून ती राणी हसली आणि म्हणाली,” राजन् येथे जलक्रीडेत लाडूंचे काय काम? मी म्हणाले होते ‘मा उदकैःताडय’ म्हणजेच माझ्यावर पाणी मारू नका… आपणास तर संस्कृत व्याकरणातील संधीचे नियम सुद्धा येत नाहीत. शिवाय आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन माझ्या वाक्याचा अर्थ पण लावू शकला नाहीत”. ती राणी संस्कृत पारंगत विदुषी होती. तिने राजाला बरेच काही ऐकवले. ते ऐकून बाकीच्या राण्या पण हसू लागल्या. राजा एकदम लज्जीत झाला. पाण्यातून चुपचाप बाहेर येऊन तो आपल्या महालात निघून गेला. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली होती. तो एकदम मौन झाला. त्याने ठरवले जर संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवता आले नाही तर तो प्राणत्याग करेल. त्या नंतर राजाने दरबारात जायचे सोडले. इतरांशी बोलणे सोडले.इतकेच काय तो त्या दिवशी जेवला नाही की झोपला नाही.
दुसऱ्या एका शर्ववर्मा नावाच्या मंत्र्यांकडून गुणढ्याला ही हकिकत समजली. राजाचा झालेला अपमान..त्याची पूर्वीपासूनच संस्कृत शिकण्याची असलेली इच्छा याबाबत सर्व समजले. त्यानंतर तो व शर्ववर्मा योग्य वेळ पाहून राजाला भेटायला गेले. दोघे राजाला बोलते करण्याचा प्रयत्न करू लागले. राजाचा उदास चेहरा पाहून शर्ववर्मा खोटे-खोटे त्याला स्वतःला पहाटेच्यावेळी पडलेले स्वप्न सांगू लागला. त्याच्या स्वप्नात आकाशातून पृथ्वीवर आलेले कमळ… त्याच्या पाकळ्यांना स्पर्श करणारा देव कुमार….त्या स्पर्शाने उमललेल्या कमळातून प्रकट झालेली साक्षात सरस्वती माता ….आणि राजाच्या मुखात शिरून तिने तेथे केलेले वास्तव्य… असे बरेच काही होते. त्याच्या या स्वप्नावर राजाचा विश्वास बसला नाही. पण तो बोलता झाला. म्हणाला,” मी मोठ्या प्रदेशाचा नरेश आहे. अपार धन संपत्ती माझ्याकडे आहे. पण विद्येशिवाय लक्ष्मीला शोभा नसते.” गुणाढ्याकडे वळून तो म्हणाला, “एखादी व्यक्ती परिश्रमपूर्वक किती दिवसात मला व्याकरणासहित संस्कृत शिकू शकेल?”
गुणाढ्य म्हणाला,” राजन्, व्याकरण म्हणजे भाषेचा आरसा… नियमित अभ्यास केला तरी व्याकरण शिकायला बारा वर्षे लागतात. पण मी तुम्हाला सहा वर्षात संपूर्ण व्याकरण शिकवेन. “गुणाढ्य कोणत्या प्रसंगामुळे राजाला शुद्ध संस्कृत शिकायची तीव्र इच्छा झाली आहे हे ताडू शकला नाही. त्याला ही जाणिव झाली नाही की राजाला महापंडित व्हायचे नाहीय तर फक्त व्यवहारात बोलताना उपयोगी पडेल इतपत संस्कृत भाषेचे व्याकरण शिकायचे आहे. शर्ववर्माच्या मनात तसाही गुणाढ्याबद्दल द्वेष होताच, त्यात ही आयती चालून आलेली संधी!….मोठ्या आत्मविश्वासाने तो म्हणाला, “महाराज मी आपल्याला सहा महिन्यात व्याकरण शिकवू शकतो. “
क्रमशः…
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈