श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काळाच्या पुढे चार पावलं असावं असं म्हणतात.पण बघता बघता काळाचीच चार काय,पाचवही पाऊल टाकून झालं आणि उद्या सहाव पाऊल पडेल.हे पाचवं पाऊल म्हणजेच वर्षाचा पाचवा महिना. तापवणाराही आणि सुखावणाराही! मे महिना! मे म्हणजे वैशाख वणवा. मे महिन्याची अखेर म्हणजे ज्येष्ठाची चाहूल.संपूर्ण महिना जसा चटके देणारा तसाच सुट्टीच्या मोठ्या कालखंडामुळे विद्यार्थी वर्गाला आनंद देणारा.लहान मुलांना मामाच्या गावाला घेऊन जाणारा,शिबिरांच्या निमित्ताने अभ्यासाव्यतिरिक्त नवीन काहीतरी शिकायला वेळ देणारा,मनसोक्त खेळू देणारा,लग्न समारंभातून सर्व आप्तेष्टांना भेटवणारा,थंडगार पेयांनी तहान भागवणारा आणि रसराज आंब्याच्या रसात बुडून जाताना फणसातील ग-यांचा वास घमघमवणारा मे महिना तो हाच.यामुळेच की काय,वणव्यासारखा पेटणारा सूर्य असूनही, त्याची दाहकता सोसूनही दरवर्षी आतुरतेने वाट बघायला लावणारा हा महिना, मे महिना! वैशाखातून ज्येष्ठाकडे नेणारा महिना.ग्रीष्मातील धारा विसरून मान्सूनच्या वा-यांचे स्वागत करायला उत्सुक असणारा महिना !
मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा दिवस म्हणजे एक मे.याच दिवशी 1960 साठ साली भाषावार प्रांत रचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.मराठी भाषा राजभाषा झाली. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा महिना आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.
एक मे हा दिवस कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.
तीन मे 1991 साली विंडहोक येथे पत्रकारांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यात पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सादर करण्यात आला. त्यानंतर 1992 पासून तीन मे हा दिवस वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर पाच मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे.याच दिवशी 1895 साली पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड ‘हे प्रकाशित झाले होते.
युद्धातील जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी जीन हेनरी ड्यूनेट यांनी मोहिम सुरू केली.ती संघटना म्हणजे रेड क्राॅस सोसायटी.म्हणून जीन यांचा जन्मदिवस आठ मे हा दिवस रेड क्राॅस दिन म्हणून साजरा केला जातो.
आई हे दैवत आहे हे आपणा भारतीयांना तर माहित आहेच.पण हे महत्व लक्षात घेऊन आईचा सन्मान करण्यासाठी 1914 पासून आंतरराष्ट्रीय मातृ दिन झाला आहे नऊ मे हा दिवस. आईप्रमाणेच ममता देणा-या आणि सेवाधर्म पाळणा-या परिचारिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारा मे हा जागतिक परिचारिका दिन आहे.कारण आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा तो जन्मदिवस आहे.
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीयांची भावना आहे.शांतता,विचार आणि भावनांच्या देवाणघेवाणीची जाणीव निर्माण व्हावी या कल्पनेतून 1994पासून युनो कडून पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.तसेच अठरा मे हा दिवस जागतिक वस्तू संग्रहालय दिन आहे.1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली.तो दिवस होता एकवीस मे.त्यामुळे एकवीस मे हा दिवस जागतिक दहशतवादविरोधी दिन म्हणून पाळला जातो.एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे.
गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तो तीस मे 1987 ला.त्यामुळे तीस मे हा गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.
1998साली अकरा मे ला पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी झाली.त्यानंतर 1992 पासून अकरा मे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस या नावाने ओळखला जातो.
असे विविध दिन या मे महिन्यात येत असतात.याच मे मध्ये म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असते बुद्ध पौर्णिमा.बसवेश्वर जयंती,आद्य शंकराचार्य जयंती,छ.संभाजी महाराज जयंती,स्वा.सावरकर जयंती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती ही याच महिन्यात असते.तसेच छ.शाहू महाराज,पं.नेहरू,राजीव गांधी यांचे स्मृतीदिन याच महिन्याताल.
शिवाय मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद याच मे मध्ये साजरा होतो.
असा हा मे किंवा वैशाख सरता सरता पावसाच्या आगमनाच्या बातम्या सुरू होतात आणि क्वचित मान्सूनपूर्व सरीही पडून जातात.सुखद गारव्याची जाणीव, येणा-या पावसाची पुनःपुन्हा आठवण करून देते.शेतक-यासह सगळेच आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात.कारण नवजीवन प्राप्त करून देणारा,’जीवन’ घेऊन येणारा वर्षाऋतू येणार असतो,आपल्या तनामनाला न्हाऊ घालायला,वसुंधरेला फुलवायला !तो येईपर्यंत फक्त एवढंच म्हणायचं,’ये रे घना, ये रे घना….
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
28मे रोजी गेली काही वर्षे
मासिक पाळी दिन menstrual higiene day साजरा केला जातो.
माझ्या माहितीप्रमाणे २०१८ पासून…