श्री अरविंद लिमये
विविधा
☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
कांही शब्द अगदी सहज जरी कानावर पडले तरी आपल्या मनाला होणाऱ्या त्यांच्या स्पर्शाने मनात भावनांचे तरंग उमटतात. पण एखादाच शब्द असा असतो की त्याच्या स्पर्शाने मनात उमटणारे असे भावतरंग विविधरंगी असतात. रस हा शब्द भावनांचे असे अनेक रंग स्वतःत सामावून घेतच आकाराला आलेला आहे आणि म्हणूनच तो अल्पाक्षरी असला तरी अनेक अर्थाने बहुरंगी, बहुपेडी शब्द आहे असे मला वाटते.
रस म्हणजे चव, रुचि, गोडी, आवड. रस म्हणजे औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासाही. रस म्हणजे द्रव या अर्थाने जलांश, चीक, स्त्राव,अर्क, पाक असंही बरंच कांही. एका दोन अक्षरी छोट्याशा शब्दातल्या सहज सुचणाऱ्या अर्थांच्या या विविध रंगछटा !
रसद हा ‘अन्नपदार्थ’ किंवा ‘साधन’ या अर्थाचा शब्द रस या शब्दावरुनच तयार झाला असावा असे मला वाटते ते रस या शब्दाच्या अनेक अन्न/खाद्यपदार्थांशी असलेल्या जवळीकीमुळे. रस या शब्दाचं अन्नपदार्थांशी असणारं थेट नातं ध्वनित करणारी ‘रसगुल्ला’, ‘आमरस’ ,’सुधारस’ या सारखी मिष्टान्ने आणि सामीष आहारामधला सर्वप्रिय असा कोल्हापूरी तांबडा-पांढरा ‘रस्सा’ ही कांही प्रातिनिधिक उदाहरणे ! यातील मिष्ट पदार्थ असोत वा सामिष त्यांच्याशी चव, रुचि, गोडी,आवड यासारख्या रस या शब्दाच्या अर्थांचे थेट नाते तर चटकन् जाणवणारेच.
रस या शब्दाचं मला जाणवलेलं वेगळेपण हे की त्याच्या चव ,रुचि, गोडी, आवड या अर्थांची रसनातृप्तीशी असणारी सांगड ही एक बाजू असली तरी चव, रुचि, गोडी, आवड या अर्थांचा संबंध फक्त रसनेशीच नाहीय. एखादा छंद आवडीचा असेल तर तो जोपासण्यात ‘रस’ असतो म्हणजेच ‘गोडी’ वाटते,एखाद्या कामात ‘रुचि’ असेल तर ते काम करणे कटाळवाणे म्हणजेच ‘बेचव’ वाटत नाही.जगणं असं आनंदी, तृप्त करणारं होण्यासाठी जगण्यात ‘चव’, ‘रुचि’, ‘गोडी’, ‘आवड’ या अर्थाने ‘रस’ हा असायलाच हवा. एरवी ते ‘निरस’च होईल. यामुळेच रस हा जसा जिव्हेचा विषय आहे तसाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त तो जगण्याचा विषय आहे !
रस या शब्दाच्या अर्थांमधील अशा विविध छटांमुळे या शब्दातून निर्माण झालेली रसदार, रसरशीत, रसपूर्ण, रसभरित, रसहीन, निरस, रसाळ अशी अनेक विशेषणे भाषेचे सौंदर्य खुलवणारी आहेत.
गुणग्रहण, गुणदोष विवेचन, रसास्वाद, रसविमर्श, मूल्यमापन, परीक्षण, आलोचना, समीक्षा, टीका अशा विविध अर्थछटांनी युक्त असा ‘रसग्रहण’ हा शब्द, तसेच रसज्ञ (रसिक), रसपरिपोष किंवा रसवत्ता (कवित्व), रसज्ञता (अभिरुचि), रसवंती(वाणी), रसायन (सरमिसळ, औषध), रसभंग (विरस), रसोत्कर्ष (बहर) यासारखे विविधरंगी शब्दही रस या शब्दातूनच आकाराला आलेले आलेले आहेत.
शृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत हे मनातल्या भावना व्यक्त करणारे नवरसच नाहीयेत फक्त तर जीवनाशी असं अतूट नातं असलेले जीवनरसच आहेत. ही अशी रसयुक्त विविधता नसती तर जगणं निरस, कंटाळवाणंच झालं असतं. या अर्थाने हे वैविध्यपूर्ण, अनेकरंगी रस हे आपल्या जगण्याचे मूलाधारच म्हणायला हवेत!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈