श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिना अखेरचे पान – 12 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काळ अव्याहतपणे चालतच असतो. त्याची पाऊले वाजत नाहीत. पण चाल मात्र जाणवत असते. कालचा दिवस संपून आजचा दिवस उजाडला की काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. या अक्राळविक्राळ काळाला कवेत घेण्यासाठी माणसाने कालगणना सुरू केली. बारा महिन्यांचे एक वर्ष बनवले आणि काळाची मोजदाद सुरू झाली. एक महिना म्हणजे काळाचे जणू एक पाऊलच. अशी अकरा पावले चालून झाली की काळ बारावे पाऊल टाकतो शेवटच्या महिन्यात आणि वर्ष संपत आल्याची जाणीव होते. हा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना, म्हणजेच काही दिवस कार्तिकाचे आणि काही दिवस मार्गशीर्षाचे !
दसरा दिवाळी सारखे आनंददायी सण होऊन गेलेले असतात. एकंदरीतच सणांची गडबड संपत आलेली असते. पण सुगीचे दिवस मात्र सुरू झालेले असतात. साखर कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणा- या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर यांनी रस्ते ताब्यात घेतलेले असतात. त्यातच ऊस पळवणा-या बाल गोपालांच्या टोळ्या आपल्याच नादात असतात. बाजारातही वेगवेगळ्या फळांची रेलचेल असते. हवेतला गारवा वाढू लागलेला असतो. मागच्या वर्षीची थंडी, यंदाची थंडी अशा थंडीच्या गप्पा मारण्यासाठी मात्र शेकोटीची आवश्यकता वाटत असते. हुरडा पार्टी रंगात आलेल्या असतात.उबदार कपड्यांना आणि गोधडी, वाकळ यांना बरे दिवस आलेले असतात. झाडांची पाने गळून ती मात्र ओकीबोकी दिसू लागतात. अशा या गोठवणार-या थंडीत दूर कुठेतरी भजनाचे स्वर ऐकू येतात आणि लक्षात येते, अरे, दत्तजयंती आली वाटते. खेड्यापासून शहरापर्यंत श्रद्धेने साजरी होणारी दत्त जयंती एक नवा उत्साह निर्माण करते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या नियमांची जाणीव करून देते. याच मार्गशिर्ष महिन्यात श्रीदत्तगुरूंचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचाही जन्मदिन असतो. शिवाय भगवान पार्श्वनाथ आणि गुरू गोविंदसिंह यांचा जन्मदिवसही याच महिन्यातील.
मार्गशिर्ष शुद्ध एकादशी या दिवशी गीता जयंती असते.
त्या दरम्यानच येतो तो नाताळचा सण. येशू ख्रिस्ताचा प्रकटदिन. प्रार्थनामंदिरे आणि परिसर सुशोभित झालेला असतो. छोट्या छोट्या झोपड्या, येशूचा जन्म सोहळा हे सगळे देखावे लक्ष वेधून घेत असतात. बच्चे मंडळीचे लक्ष असते ते मात्र सांताक्लाॅजकडून मिळणा-या गिफ्टवर.
असा हा डिसेंबर किंवा मार्गशिर्ष महिना विविध धर्मातील भक्तांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.
याशिवाय थोर गणिती श्रीनिवास रामानुजन्, पू.साने गुरुजी आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारे मोहम्मद रफ़ी यांचा जन्मही याच महिन्यात झाला आहे.
सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महपरिनिर्वाण दिन. कोल्हापूरच्या छत्रपती ताराराणी, भारतीय संस्कृत कोशाचे जनक पं. महादेवशास्त्री जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचा स्मृतिदिन याच महिन्यात असतो. याच मार्गशिर्ष महिन्यात मोरया गोसावी, श्री
गोंदवलेकर महाराज आणि संत गाडगेबाबा या संतांची अवतार समाप्ती झाली.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी डिसेंबर महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही स्मरण वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते. एक डिसेंबर हा एडस् निर्मुलन दिन आणि तीन डिसेंबर हा अपंग दिन म्हणून जागतिक स्तरावर पाळला जातो. चार डिसेंबर हा भारतीय नौदल दिन आहे. पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आठ डिसेंबर 1985ला सार्क परिषदेची स्थापना झाली. दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन आहे. 1946 साली अकरा डिसेंबरला युनिसेफची स्थापना झाली. बारा डिसेंबर हा दिवस हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ स्वदेशी दिन म्हणून पाळला जातो. सतरा डिसेंबर पेन्शनर्स डे आहे. 1961 साली एकोणीस डिसेंबरला दीव,दमण आणि गोवा यांना स्वातंत्र्य मिळाले व हे प्रदेश भारताचा अविभाज्य भाग बनले. तेवीस डिसेंबर हा किसान दिन व चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. 1945 साली सत्तावीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना झाली. तीस डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीग ची स्थापना झाली होती. एकतीस डिसेंबर हा दिवस परिवार एकता दिन म्हणून साजरा केला जातो.
मार्गशिर्ष म्हणजे धनुर्मास. मार्गशिर्ष म्हणजे सूर्याच्या उत्तरायणाचा मास. याच मासात असते शाकंभरी नवरात्र. मार्गशिर्ष म्हणजे शिशिर ऋतूचे आगमन. काही वेळेला डिसेंबरच्या शेवटी शेवटी मार्गशिर्ष संपून पौषमासाची सुरुवातही झालेली असते.
अशा विविध घटनांची नोंद घेत सण, उत्सव साजरे होत असतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू होते. गत वर्षाचा हिशोब मनात मांडत असतानाच आपण सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. आंतरराष्ट्रीय नवे वर्ष सुरू होत असते. आपणही त्यात सामील होत असतो. नव्या वर्षाचे संकल्प मनात सुरू झालेले असतात. ते सिद्धीस नेणे आपल्याच हातात असते. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांचा सुंदर मेळ घालून आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी सरत्या गेल्या वर्षाला बाय बाय करत नव्या वर्षात पाऊल टाकायचे आणि नवी आव्हाने स्वीकारायची. काळाचा हात धरून त्याच्या पावलाबरोबर चालायचे हे तर ठरलेलंच. महिनाअखेरचं पान म्हणता म्हणता वर्षाअखेरच पान आलं. चला स्वागत करूया नव्या वर्षाचं. नव वर्षाच्या शुभेच्छा देत चला एक नवा प्रवास सुरू करूया !
कॅलेंडरची बारा पाने
पाहता पाहता संपून गेली
किती कटू-गोड आठवणी
मनामध्ये साठवून गेली
नवे दिवस येत राहतील
नवे किरण घेऊन येतील
नवे क्षण फुलत राहतील
नवी स्वप्ने घेऊन येतील
नवे जुने सारे काही
बरोबर घेऊन जायचे आहे
फूल सहज फुलावे तसे
जीवन हे फुलवायचे आहे.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छानच