विविधा
☆ मातृदिनानिमित्त स्व आईस पत्र… ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆
ति. आई
तुझ्या त्या…. चतु:आयामी ते अनंतआयामी.. दिक्कालातीत अनादी अनंताच्या अतर्क्य, प्रवासाला निघून आज ऐहिक काल गणनेनुसार सहा वर्षे लोटली. एकेका ऐहिक क्षणाला तुम्हा दोघांच्या श्रीमंत स्मृतीची भिजलेली झालर असते. बाबा गेले तेंव्हा कदाचित दु:खाची तीव्रता तुझ्यामुळे तेवढी जाणवली नाही. तूच ते दु:ख स्वतः च्या खांद्यावर उचलून आम्हा भावंडांना जाणवू दिले नाही. पण आता तुझी उणीव ही एक निर्वात पोकळीच आहे.
आजही तुझा आम्हाला आभास होतो. मला तर असे अनेक वेळा वाटते की, कुठून तरी गाण्याची ती लकेर ऐकायला येईल! ” तू जहा,जहा चलेगा मेरा साया साथ होगा…” आणि खरंच सांगतो मी थोडा आश्वस्त होतो. ” तू कभी उदास होगा तो उदास होंगी मै भी.. नजर आवू या ना आऊ… ” ही ओळ स्मरताच मी आतून ओलाचिंब होतो…. पापण्यांना अश्रूंचा भार सोसवत नाही…
वाटतं कुठून तरी अवचित ” मिलू… मुकुंदा… मुचकुंदा.. म्हणून लाडिक हाक ऐकू येईल.. पण आभासी विश्व आणि व्यावहारिक विश्व ह्यात महत अंतर आहे नाही ? इहलोकातील क्षणभंगूर वास्तव्य हा मानवी जीवनाचा पूर्णविराम म्हणायचा कि अर्धविराम ? हाच संभ्रम मला पडतो. तुझ्या स्मृतिदिनी अनेक अनादी प्रश्नांची पुनःपुन्हा उजळणी होते. जीवन म्हणजे काय ? मृत्यूची आवश्यकता काय ? जीवनाची सार्थकता कशात ? इत्यादी सर्व अनुत्तरीत प्रश्न सभोवताल फेर धरून नाचतात.
आई… जाणिवेच्या पल्याड, त्या ज्ञात अज्ञाताच्या प्रदेशात… तुझ्या त्या अनंताच्या अनाकलनीय गूढ प्रवासात सुख, दुःख असतात कां गं ? स्मृती तरी ?
तुला स्मृती असो, नसो ! इहलोकात तुझ्या स्मृती ठायी ठायी आहेत.
ठेच लागली तरी, भिती वाटली तरी, विस्मय वाटला तरीही.. आई गं.. म्हणून आपसूकच उदगार बाहेर पडतो. आई , शिक्षणासाठी माय लेक एकाच कॉलेज मध्ये एकत्र जाण्याची उदाहरणे दुर्मिळच! पण ते उदाहरण बाबांच्या प्रेरणेने तु प्रस्तुत केले. ती तुझी ज्ञानपिपासा ! तुझे ते संस्कृत, मराठी, इंग्रजीवरील प्रभुत्व ! शब्दोच्चाराचे महत्व !! प्रसंगा प्रसंगावर समयोचित संस्कृत श्लोक उद्धृत करणारी प्रतिभा .. प्रेरक उदाहरणे, उद्बोधक प्रसंग आजही स्तिमित करून जातात..
त्या काळी.. संसार सांभाळून मराठीत एमए करणे.. हे एक समाजापुढे आदर्श असे उदाहरणच होते. आणिबाणीतील ति.बाबांच्या अटके विरूद्ध केन्द्र सरकारला ऐतिहासिक न्यायालयीन लढा देत नमवणे… एका नृशंस उन्मत्त मदांध पाशवी राजसत्तेला झुकवणे… कुठून आणलेस गं इतके धाडस ? इतके बळ..? कुठून आले हे सामर्थ्य? एक कुटुंब वत्सल स्त्री ते उन्मत्त राजसत्तेच्या कराल दाढेतून बाबांना सोडविणारी सावित्री हा प्रवास कसा तू साधला ?
मला आजही आठवून अस्वस्थ व्हायला होतं.. तू असतीस तर मला सांगूच दिले नसतेस. पण बाबा जेंव्हा मिसा ( म्हणे मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी अॅमक्ट ) अंतर्गत तुरूंगात नुकतेच गेलेले असतांना आपल्या घराच्या बाहेर रस्त्यावर अश्लाघ्य शब्दांत गलिच्छ लिहिलेले मी पहाटे पहाटे तुला तुझ्या हातांनी पुसतांना बघितले … माझ्या अंगाची तर लाही लाही होत होती. पण ” दे डोन्ट नो व्हॉट दे आर डुईंग ” असे म्हणत आपल्या क्षमाशील, उदार अंतःकरणाचा परिचय दिलास… अविश्वसनीय वाटतं सगळं. युद्धस्थ कथा रम्य..! ह्या उक्तीप्रमाणे हे सर्व स्मरतांना आज रोमांचक वाटतं … नाही ?
आई ! मध्यंतरी आपली कामठीची वास्तू बघायला जाण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकलो नाही. पण आज तिथे तर फक्त श्रीमंत आठवणी आणि श्रीमंत वास्तूचे उदास भौतिकीय भग्नावशेषच उरलेत बघ. जेथे विद्यार्थ्यांचा एकेकाळी वावर होता … तेथे श्वापद ? मन अतिशय विदीर्ण आणि विषण्ण करणारा अनुभव होता तो !
आई ! तुझे ते प्रेयस आणि श्रेयस मधील फरक सांगणारे संस्काराचे तरल बंध आम्हाला अजूनही जखडून ठेवताहेत.. तसे ते दुर्दैवाने अव्यावहारिकच असतात. आज तुझ्या आणि ति. बाबांच्या संस्काराच्या श्रीमंत शिदोरीवर आम्हा सर्वांची ऐहिक दृष्ट्या यशस्वी वाटचाल सुरू आहे.
बाबांनी केलेले रेषांचे संस्कार, तू केलेले स्वरांचे, सुरांचे, शब्दांचे, सर्जनशील अक्षर संस्कार आज उपयोगी पडताहेत. शालेय निबंध लिहितांना तू केलेल्या तुझ्या सुचना आजही लिखाण करतांना उपयोगी पडतात. आज कलेच्या विस्तीर्ण प्रांगणात मी पदार्पण केलेले आहे. आई समाजाने तू केलेल्या सृजन संस्काराची माझ्या निमित्ताने का होईना पुरेशी दखल घेतलेली आहे. माझ्यावर पुरस्कारांची, सन्मानांची अक्षरशः लयलूट होत आहे. सन्मान स्विकारतांना, मी किती निमित्तमात्र आहे हे मनोमन जाणवत राहतं.
पण फक्त हे सर्व बघायला तू हवी होतीस. बाबा असायला हवे होते.
तुला ठावूक आहे ?तुमचे केवळ अस्तित्व सुद्धा आम्हा सर्वांनाच नव्हे तर शेकडो विद्यार्थ्यांना उर्जादायी असेच होते.
आमच्या असंख्य चुका तुम्ही माफ केल्यात. आम्ही काही मागावे असे काहिच नाही.. पण तुम्ही दोघांनी थोडी घाई नसती केली तर..? मरण कल्पनेशी थांबे तर्क मानवाचा.. पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा….
तुला प्राध्यापक ग्रेस ( प्रा. माणिक गोडघाटे ) तू मराठीत एमए करतांना, नागपूरला मॉरिस कॉलेज मध्ये शिकवीत होते. त्या ग्रेसनी, ” ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता..” ही कविता माझ्यासारख्या मातृवियोगींसाठीच लिहिली असावी.
तुझ्या मांडीवर डोके ठेऊन, तुझी खरखरीत बोटे जेंव्हा माझ्या केसांतून फिरताना जो रेशमी स्पर्श होत असे तो आता पुन्हा होणे नाही. असह्य आहे हे सारे ! एक मात्र खरंच की तू गेलीस आणि आमचे शैशव, बाल्य संपले.. आम्ही पोरके झालो.
आज खरोखरच मन पिळवटून मातृभाव मनातून दाटून येतोय.. कृतज्ञता आहेच.. साश्रू नयनांनी श्रध्दांजली अर्पण करण्याखेरीज माझ्यासारखा मर्त्य मानव आणखी काय करू शकतो ?
तुझाच…
मिलू, मुकुंदा ..मुचकुंदा
© श्री मिलिंद रथकंठीवार
रेखाचित्रकार, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈