श्री प्रमोद वामन वर्तक
🌸 विविधा 🌸
😅 म्हण बदलायची वेळ आली ? 🌧️🤣 श्री प्रमोद वामन वर्तक
“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे ! या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !
हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी. त्यामुळे होत काय, खरखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !
मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का ! सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी डोक्यावर पांघरूण घेऊन झोपी गेलो !
जाता जाता सुज्ञ वाचकांना एक इशारा – कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत ! कारण हा निसर्ग कोप नक्कीच नाही !
© प्रमोद वामन वर्तक
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈