सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ महिषासूरमर्दिनी.. ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
झेंडूच्या फुलांच्या पायघड्यांवरून अलगदशी शारदीय नवरात्रीची मंगलमय सुरुवात झाली.तसा सगळीकडेच उत्साह नुसता ओसंडून राहिला आहे.नवरात्र म्हणजे नऊ दिवस, नऊ रात्रीचा आदिशक्ती आदिमातेच्या उपासनेचा दरवर्षी येणारा उत्सव..!
अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना होते म्हणजे देवीच्या नवरात्रीची सुरुवात होते.या आदिशक्तिला आपली संस्कृती स्त्रीरुपात पहाते. आपण तिची श्रध्देने पूजा-अर्चा करतो.तिला आई,माता,माय-माऊली संबोधतो.
आपल्या परिवारालाच नाही तर अवघ्या जगताला प्रसन्न करणारी ती जगदंबा जगतजननी आहे.आपल्या पुराणातील कथांमध्ये देवी आणि असुरीशक्ति यांचे द्वंव्द वर्णन केले आहे.त्यातील एक कथा प्रसिद्ध आहे महिषासूर या असुरांच्या राजाने उन्मत्तपणे पृथ्वीवर तर धमाकूळ घातला होताच पण देवतांनाही जिंकून
घेतले व स्वर्गावर राज्य करण्याची तयारी केली.तेव्हा ब्रम्हां,विष्णु,शंकर यांनी आपल्या तेजातून एक आदिशक्ती निर्माण केली.तिने नऊ दिवस नऊ रात्र महिषासूराशी युध्द करुन त्याचा वध केला.म्हणजे आसुरीशक्ती नष्ट केली.
प्रत्येक माणसामध्ये चांगली-वाईट प्रवृत्ती असतेच.त्यातील वाईट प्रवृत्ती म्हणजे आपल्या मनांवर ,बुध्दीवर असलेले महिषासूराचे वर्चस्व, साम्राज्य.. ते नष्ट व्हावे,आपणास सदैव सद्बुध्दी लाभावी यासाठी कलश-घट यांची पूजा म्हणजे आपल्याच देहातील आत्म्याची पूजा करुन, अखंड ‘दीप’ लावून आत्मतेज मिळवावे.,ही कल्पनाच किती सुंदर वाटते.
यासाठी श्रध्दा,भक्ती आणि आंतरिक अशी परमेश्वराची ओढ असावी लागते.केवळ कर्मकांड असून चालत नाही.नवरात्रात जागरण म्हणजे देवीचा जागर,पूजापाठ,आरती,ही महत्वाची असली तरी देवीची उपासना करणे हा मुख्य उद्देश आहे.मग देवी कोणत्याही रुपात असो.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती या तीन महाशक्ती यांची उपासना करुन आपण आपल्या षड्रिपूंवर विजय मिळावा, अवगुणांचा -हास व्हावा,संकटांना,वाईट प्रवृत्तींना सामोर जाण्याची क्षमता प्राप्त व्हावी यासाठी या आदिशक्तिला शरण जातो.तिला जोगवा मागतो.’ गोंधळाला ये ‘..अशी आपुलकीची साद घालतो.
सगळीकडे भ्रष्टाचार, अत्त्याचार, हिंसाचार, व्देष,नैसर्गिक आपत्ती,रोगराई पसरली असेल अशावेळी आत्मतेज वाढवून, दुर्जनांचा नाश करुन,प्रतिकूल परिस्थितीतही आपल्याला तारुन नेणाऱ्या आदिमातेला -शक्तीला
मनांपासून प्रार्थना करुयात..
‘हे महिषासूरमर्दिनी…’
आई तुझ्या पदाचा..
देई सर्व काल संग..।
दावी तुझ्या कृपेचे..
तेजोमयी तरंग..।।
या मनांपासून दिलेल्या सादाला ती
जगत् जननी नक्कीच धांवून येईल.
तिच्या चरणाशी दुजाभाव नसतोच.
सगळी तिचीच लेकरे!मग वाईट गोष्टींतून केवळ वर्तमान काळच नव्हे तर आपला भविष्यकाळही कायमचा मुक्त होईल…अन् खऱ्या अर्थाने विजयोत्सव साजरा करण्याचा,विजयपताका फडकविण्याचा ‘दसरा ‘ उजाडेल.!
‘सोनियाचा दिवस’ म्हणून सोने लुटतांना आगळाच आनंद लुटता येईल…!
© सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे .३८
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈