श्री राजीव गजानन पुजारी
विविधा
☆ माझी मराठी… ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
मराठी भाषा ही १५०० वर्षे जूनी असून तिचा उगम संस्कृत मधून झाला. समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत गेली. मराठीचा आद्यकाल हा इ. स. १२०० च्या पूर्वीचा म्हणजे ज्ञानेश्वरीच्या लिखाणाच्याही आधीचा होय. या काळात विवेकसिंधू या साहित्यकृतीची निर्मिती झाली. यानंतरच्या काळाला यादवकाल म्हणता येईल. इ.स. १२५० ते इ. स.१३५० हा तो काळ. या काळात महाराष्ट्रावर देवागिरीच्या यादवांचे राज्य होते. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात वारकरी संप्रदायची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सर्व जातींमध्ये संत परंपरा जन्माला आली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, कान्होपात्रा यांनी भक्तीपर रचना केल्या व मराठी भाषेचे दालन भाषिक वैविध्याने समृद्ध व्हायला सुरुवात झाली. इ. स. १२९० साली ज्ञानेश्वरमाऊलींनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली. ती लिहिण्यापूर्वी माऊली म्हणतात,
‘माझा मराठीची बोलू कौतुके |
परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ||’
आणि ज्ञानेश्वरी वाचल्यावर मराठी भाषा अमृताहून गोड आहे याची सार्थ जाणीव होते. याच काळात महानुभव पंथ उदयास आला. चक्रधर स्वामी, नागदेव यांनी मराठी वाङमयात मोलाची भर घातली. त्यानंतर येतो बहामनी काळ. हा काळ इ. स.१३५० ते इ. स. १६०० असा मानता येईल. सरकारी भाषा फारसी झाल्याने, मराठी भाषेत अनेक फारसी शब्द घुसले. या मुसलमानी आक्रमणाच्या धामधूमीच्या काळातही मराठी भाषेत चांगल्या साहित्याची भर पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी यांनी मराठी भाषेत भक्तीपर काव्यांची भर घातली. यानंतर येतो शिवकाल. तो साधारण इ.स.१६०० ते इ. स.१७०० असा सांगता येईल. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली होती. शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांना राज्यव्यवहार कोष बनवितांना फारसी ऐवजी संस्कृत शब्दयोजना करण्यास सांगितले. याच काळात मराठीस राज्य मान्यतेसोबत संत तुकाराम, संत रामदास यांचेमुळे लोकमान्यताही मिळू लागली. यानंतर येतो पेशवेकाल. हा इ. स.१७०० ते इ. स. १८२० असा सांगता येईल. या काळात मोरोपंतांनी ग्रंथ रचना केली. कवी श्रीधर यांनी आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात मराठी भाषा रुजविली. याच काळात शृंगार व वीर रसांना वाङमयात स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा यांची निर्मिती झाली. वाङमय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. वामन पंडित, रामजोशी, होनाजी बाळा हे या काळातील महत्वाचे कवी होत. या नंतरचा काळ आंग्लकाळ म्हणता येईल. हा इ. स. १८२० ते इ. स.१९४७ पर्यंतचा मानता येईल. याच काळात कथा व कादंबरी लेखनाची बीजे रोवली गेली. नियतकालिके छपाईच्या सुरुवातीचा हा काळ. त्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष वेगाने होत गेला. १९४७ ते १९८० हा काळ सर्वदृष्टीने मराठीच्या उत्कर्षाचा काळ म्हणता येईल. विजय तेंडुलकरांच्या नाटकांनी मराठीला वास्तववादी बनविले. छबीलदास चळवळ या काळात जोरात होती. दलित साहित्याचा उदयही याच काळातला. सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्या साहित्य व समीक्षांचा दबदबा या काळात होता. मध्यम वर्गीयांसाठी पु.ल., व.पु. होते. प्रस्थापिताला समांतर असे श्री. पु. भागवतांचे ‘सत्यकथा’ व वाङमयीन क्षेत्रातील गॉसिपचे व्यासपीठ ‘ललित’ याच काळातील. याच काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ ही काळाच्या पुढची नाटके येऊन गेली. थोडक्यात म्हणजे इ.स.१२०० च्या सुमारास सुरु झालेली मराठी भाषेची प्रगती इ.स. १९८० पर्यंत चरम सीमेला पोहोचली. समजातील सर्व विषय कवेत घेणारी अशी ही मराठी भारतीय भाषा भगिनींमध्ये मुकुटमणी आहे.
मराठीत पु. ल. देशपांडे, चि. वि. जोशी यांनी लिहिलेले विनोदी लिखाण आहे, ज्ञानदेव, तुकारामादि संतांनी लिहिलेले भक्तीरसाने ओथंबलेले संत वाङ्मय आहे, ना.सी.फडके आदिंनी लिहिलेले शृंगारिक वाङ्मय आहे, लावणीसारखा शृंगारिक काव्यप्रकार आहे, आचार्य अत्रे लिखित ‘झेंडूची फुले’ सारखे विडंबनात्मक साहित्य आहे, वि.स.वाळिंबे सारख्यांनी लिहिलेले चरित्रग्रंथ आहेत, नारळीकर, बाळ फोंडके लिखित वैज्ञानिक कथा आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ सारखे वीर रसाने युक्त ग्रंथ आहेत, पोवाडे आहेत, अनंत कणेकर, पु. ल. देशपांडे सारख्यानी लिहिलेली उत्तमोत्तम प्रवासवर्णने आहेत, ग. दि. मा. लिखित ‘गीत रामायण’ म्हणजे नवरसांचे संमेलनच जणू!! यातील प्रत्येक काव्य वेगळ्या रसात आहे. मराठीत बाबुराव अर्नाळकर लिखित गुप्तहेरकथा व भयकथा आहेत, नारायण धारप लिखित गूढकथा आहेत, साने गुरुजींची शामची आई म्हणजे मराठीचे अमूल्य रत्नच जणू! रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध म्हणजे निवृत्ती व प्रवृत्ती यांचे सुयोग्य संमिलनच आहे. त्यांनीच लिहिलेल्या मनाच्या श्लोकांत मानसशास्त्राची मूलभूत तत्वे सामावलेली आहेत. मराठीत इतर भाषांतून अनुवादिलेल्या उत्तमोत्तम कलाकृती आहेत. मराठी नाटक म्हणजे मराठी भाषेतील रत्नालंकार होत. अगदी राम गणेश गडकरींचा ‘एकच प्याला’ ते विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ पर्यंत मराठी नाटकांचा एक विस्तृत पटच आहे. हे सर्व बघितल्यावर मराठी ही एक अभिजात भाषा आहे याची खात्री पटते.
मातृभाषेची गोडी शालेय वयापासून लावणे हे पालक व शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळ ते साधारण १९८० पर्यंत मराठी शाळांची स्थिती ‘चांगली’ म्हणावी अशी होती. पालक मुलांना मराठी शाळांत पाठवत. घरी देखील मराठी बोलले जाई. पण १९८० नंतर हळूहळू सर्व बदलत गेले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. पालक मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे प्रतिष्ठेचे मानू लागले. जागतिकरणानंतर स्थिती आणखी बिघडली. खेडोपाडी व घराघरात पाश्चात्य संस्कृतीबरोबरच पाश्चात्य भाषेनेही सर्रास प्रवेश केला. ‘माझ्या मुलाला /मुलीला मराठी बोलता येत नाही’ असं सांगणं यात पालकांना प्रतिष्ठा वाटू लागली. अशा परिस्थितीत मराठीचे भवितव्य काय?
मला तर वाटतं मराठीचे भवितव्य उज्वलच आहे. याचे महत्वाचे कारण ‘नवीन शैक्षणिक धोरण’. यात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे.अगदी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण देखील मातृभाषेतून देण्यात यावे असे सरकारचे धोरण आहे. विज्ञानातील मूलभूत संकल्पना मातृभाषेतून चांगल्या समजतात हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक विध्यार्थी मराठीकडे वळतील व मराठीला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. यासाठी आपलीही कांही जबाबदारी आहे. अगदी आपल्या राज्यातही परभाषी व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून बोलतो. असे न करता आपण आवर्जून मराठीतूनच बोलले पाहिजे. मराठीतून बोलण्यात न्यूनगंड बाळगण्यासारखे अजिबात नाही. जेव्हा पत्रकार परिषद होते तेंव्हा आपले नेते प्रथम मराठीतून बोलतात, पण जेंव्हा एकदा पत्रकार ‘हिंदीमे बोलिये’ असे म्हणतो, तेंव्हा आपले नेते परत तीच वक्तव्ये हिंदीत करतात. हे आवर्जून टाळायला हवे. नेत्यांनी पत्रकाराला ठणकवायला हवं कि, मी हिंदीत वगैरे अजिबात बोलणार नाही, तूच मराठीत बोल. अशा छोटया छोटया गोष्टी आपण करत गेलो कि, आपोआपच मराठीला इतर लोकंही सन्मानाने वागवायला लागतील.
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
ईमेल – [email protected] मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈