सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ माधव ज्युलियन : स्मृतिदिनानिमित्त 🌼 “माधव ज्युलियन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
वाचनाची गोडी लागल्यामुळे मराठी मधील अनेक उत्तमोत्तम साहित्य वाचनात आले ह्याचा आनंद हा आहेच, परंतू वेळेअभावी म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे मराठी सोडून इतर भाषांमधील साहित्याचा फारसा आस्वाद घेता आला नाही ह्याचं शल्य अजुनही मनात हे आहेच. असो
मराठी वाचतांना ऐतिहासिक, पौराणिक कथा, कादंबऱ्या, कविता ह्यांचे वाचन झपाटल्यागत सूरु झाले आणि मग ही गोडी वाढता वाढता वाढतच गेलीं. कविता वाचत असताना काही कविता हया मनात आणि हृदयात कायमच्या विराजमान झाल्यात त्या कवितांपैकी एक कविता, “प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई”. प्रथम ही कविता माधव ज्युलियन ह्याची आहे हे कळल्यावर हे कवी महाशय आधी अमराठी असेच वाटले आणि पुढे त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यावर मग माझे अज्ञान दूर झाले.
माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन ह्यांचा जन्म 21 जानेवारी बडोद्याला झाला होता. हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा. जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.
पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखन पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. शिक्षणानंतर इ. स. 1918 ते इ. स. 1924 या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ. स. 1925 ते इ. स. 1939 या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने 1डिसेंबर 1938 रोजी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी. लिट. होती.
29 नोव्हेंबर 1939 साली ह्यांचे निधन झाले तरीही साहित्य रूपाने ते अजूनही आपल्यात आहेतच. प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी, ह्या कवितेने तर त्यांना अजरामर केले. त्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈