श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ये रे पत्रा … ये रे पत्रा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

परवा एकदा कपाट आवरायला घेतलं. कपाट आवरणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं काम असलं, तरी ते वेळखाऊ आणि जिकीरीचं काम असल्याने नेहमी पुढे पुढेच ढकललं जातं. त्या दिवशी मात्र मी नेटाने बसलेच. कपाट आवरून झालं आणि मी माझी आवडती गोष्ट पुढ्यात घेऊन बसले. ती म्हणजे माझा पत्रांचा बॉक्स. माझी शाळेपासूनची पत्रे मी त्यात जपून ठेवली आहेत आणि जेव्हा जेव्हा म्हणून मी कपाट आवरते, तेव्हा तेव्हा मी ती काढून, वेळ असेल तशी वाचत बसते. त्या दिवशी बॉक्स पुढे घेऊन मी फतकल मारून बसलेच.

सर्वात वरचं पत्र होतं सखा कलालांचं. या पत्राचं मला विशेष अप्रूप होतं, ते अशासाठी की अलिकडे अशी पत्रेच येईनाशी झालीत. सध्या टपाल येतं, ते फक्त वर्गणी संपली, किंवा मिळाली, किंवा मग कार्यक्रमाचं निमंत्रण, मिटींगची सूचना यासारखी. हे पत्र तसं नव्हतं. खूप दिवसांनी माझी कथा आवडल्याचं खुषीपत्र होतं ते. ‘समकालीन भारतीय साहित्यामध्ये माझ्या आलेल्या कथेचा हिन्दी अनुवाद वाचून त्यांनी लिहीलं होतं, युनिफॉर्म कथा वाचली. आवडली. मराठी लेखिकेची कथा हिन्दी भाषेत वाचण्याचा आनंद काही औरच असतो.’ पुढे त्यांनी आवर्जून लिहीलं होतं, ‘तुमच्या नावलौकिकाची कथा अशीच सर्वदूर विस्तारत जावो.’ असं पत्र कुणाचंही असतं, तरी आनंदच झाला असता, पण सखा कलाल म्हणजे नावाजलेले ग्रामीण कथाकार. त्यामुळे त्यांच्यासारख्या दर्दी माणसाकडून मिळालेली दाद मोलाची वाटली.

हे कौतुक – पत्र घरच्यांना दाखवलं. त्यांच्याबरोबर पुन्हा वाचलं. मैत्रिणींना दाखवलं. तितक्या तितक्या वेळा त्या पत्रवाचनातून आनंद होत गेला. या पत्रामुळे मला झालेल्या आनंदात घरच्यांना, मैत्रिणींना सहभागी करून घेता आलं. फोनचं तसं नाही. बोलणार्‍याशी प्रत्यक्ष संवाद होतो, हे खरे. पण तो आपल्यापुरता असतो. त्यात इतरांना सहभागी करून घेता येत नाही आणि पत्रवाचनासारखा पुन:प्रत्ययाचा आनंदही घेता येत नाही.

अलीकडच्या गतिमान युगात पत्रलेखनाला खूप ओहोटी लागली आहे. घराघरातून दूरध्वनीची यंत्रे बसली. आणि दूरवरून विनाविलंब संबंधितांशी संपर्क साधता येऊ लागला. ते माध्यम सोयीचं वाटलं. त्यामुळे अल्पावधीतच त्याचा प्रसारही झाला. आज-काल कथा, कविता, लेख आवडल्याची खुशी पत्रे नाही. खुशी फोन येतात.

मला अगदी लहानपणापासून पत्रलेखनची आवड आहे. त्याला आलेली उत्तरे मी जपून ठेवली आहेत. अगदी शाळेत असल्यापासूनची…. ती पत्रे पुन्हा पुन्हा काढून वाचण्याचा मला छंदच आहे.

माझे कथा-लेख ८०-८२पासून छापून येऊ लागले. त्या काळात दूरदर्शन आणि दूरध्वनी  घराघरात फारसा बोकाळला नव्हता. अर्थात मनोरंजन आणि माहितीसाठी वाचनावरच भिस्त असायची. त्यावेळी लोक, कथा-लेख वाचत आणि जे आवडेल, ते लेखकाला खुशीपत्र पाठवून कळवत. मला माझ्या लेखनाबद्दल अनेक खुशीपत्रे आलेली आहेत आणि अजूनही ती माझ्याजवळ आहेत. त्यात सर्वात देखणं पत्र आहे व. पु. काळे यांचं. दोनच ओळींचं पत्र. पण मांडणी इतकी सुरेख की पत्र म्हणजे एक रेखाचित्र वाटावं.

औपचारिक खुषीपत्रे सोडली, तर इतर जी नातेवाईक, स्नेहीमंडळींची पत्रे असतात, ती  वाचताना, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आठवतात. त्यामुळेच अलीकडे पत्रलेखन कमी होत चाललय, नव्हे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, यामुळे मन विषण्ण होतं. त्या दिवशी सखा कलालांचं असं अचानक आलेलं पत्र वाचलं आणि वळवाच्या पावसासारखं मन शांतवून, सुगंधित करून गेलं. मनात पुन्हा पुन्हा येत राहीलं,

‘ये रे पत्रा.. ये रे पत्रा …’

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments