☆ विविधा ☆ रांगोळी ☆ सौ.दीपा पुजारी ☆
आजकाल सकाळी लवकर ऊठून सडासंमार्जन करणं कालबाह्य झालय. माझ्या मनात मात्र माझी लहानपणीची सकाळ अजूनही रोज भूपाळी गाते. सकाळी जाग यायची तिच मुळी आकाशवाणीच्या संगीतानं. दात घासण्यासाठी मागच्या बाजूला असलेल्या फरशी कडं जावं लागे. तिथं भला मोठा तांब्याचा बंब पेटवलेला असे. तो एक छानशी ऊब देई. मला घाई असे ती घराच्या पुढील दारात जाण्याची. आई किंवा काकू दारात रांगोळी काढत असत. मी गडबडीनं पाटी-पेन्सिल घेऊन धावे. रांगोळी चे ठिपके पाटीवर काढून ते जोडण्या चा प्रयत्न करे.
भल्या सकाळी रांगोळीच्या निमित्तानं घरच्या बायकांना मोकळेपणा मिळे.अंगण स्वच्छ करताना व्यायाम होई तो वेगळाच. घराचा एंट्रन्स स्वच्छ सुंदर प्रसन्न साजिरा दिसे. आणि आपला कलाविष्कार दाखवायला गृहिणीला, मुलींना संधी मिळे.
सडारांगोळी आज कालबाह्य झाली आहे. तरीही काही विशिष्ट प्रसंगी ती काढली जाते. पारंपरिक रांगोळी कमी प्रमाणात दिसून येत असली तरी अजूनही तीची नजाकत सांभाळून ठेवलेली दिसते. रांगोळी मोठी, डौलदार, रंगीबेरंगी झाली. फक्त घराच्या दारासमोर, देवघरापुरती ती मर्यादीत राहिली नाही. ही कला स्त्री पुरूष सगळ्यांनीच आत्मसात केलेली दिसते. तिची शान वाढलेली दिसते. तरीही अंगणात सडासंमार्जन करुन दारासमोर सुबक साधी अनेक ठिपके जोडून काढलेली रांगोळी जास्त भावते. मला तरी ते गृहिणीचं घरातल्या सर्व लहानमोठ्या माणसांना जोडण्याचं कसबच सांगतेय असं वाटतं. घरातील वेगवेगळया विचारांच्या,स्वभावाच्या आणि वयाच्या घटकांना एकत्र सांधून ठेवण्याची तारेवरची कसरत तिलाच करावी लागते.या सगळ्या घटकांना घट्ट बांधायला जाडजूड दोर वापरुन नाही हो चालत. नाजूक, मनभावन भावबंधांची गुंफण विणून अतिशय कौशल्यानं ही वीण वीणावी लागते. अगदी रांगोळीच्या बारीक रेघे सारखीच असते ही भावबंधांची गुंफण! ठिपके जोडण्यात एव्हढीशी चूक रांगोळीचा तोल ढळू द्यायला पुरेशी असे. नाती टिकवणं, त्यात मोकळेपणा निर्माण करणं आणि ती बळकट करणं हे सगळं लिलया करण्यासाठी रांगोळीतील सौंदर्य समजलं पाहिजे. ठिपके फार जवळ जवळ काढून ही नाही चालणार. आणि लांबलांब ही मांडून नाही चालणार. रेघांच्या जाडी इतकच ठिपक्यांचे अंतरही महत्त्वाचं. ठिपके खूप जवळ आले तर अपघात होण्याची भिती. फारच लांब गेले तर दोर तुटण्याची भिती!! म्हणूनच रांगोळी मला Hygiene, Space, Relationship, Creativity अशा अनेक ठिपक्यांना सांधणारी संस्कृतीचा वारसा वाटते.केवळ भारतातच दिसणार्या या परंपरेचा मला अभिमान वाटतो.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
फोन.नं ९६६५६६९१४८
email :[email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈