सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ राहूनच गेलेलं काही – भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
प्रिय माहेरघरास,
सप्रेम नमस्कार,
तुला आश्चर्य वाटलं ना? आज कशी काय आठवण झाली हिला? असं नक्कीच म्हणत असशील. म्हण, म्हण. तेव्हढा हक्क आहे तुला. आठवण व्हायला विसरावं लागतं. मी तुला मुळ्ळीच विसरले नाहीय. हे तुला पक्कं ठाऊकाय. हं, एक सल ऊरात आहे. तुझ्या कुशीत शिरायला, तुला ऊराऊरी भेटायला मी किती वर्षात आले नाही!
थांब, थांब, लग्गेच गट्टी फू नको हं करु. गळाभेट जरी वरचेवर होत नसली तरी मी तुझ्याशीच तर बोलत असते सारखी. आणि मी येत नाही तुझ्याकडं, आले तरी लगेचच माघारी फिरते याला तूच तर जबाबदार आहेस. तूच शिकवलंस ना, आपलं घर, आपलं काम, हेच प्रमाण. उगाचच इथं तिथं रेंगाळायच नाही. काम झालं रे झालं की घरी परत.
पण खरंच राहूनच गेलं तुझ्या अंगणात झिम्मा खेळणं. आठवतं तुला हादग्याची खिरापत, गोल फेर धरून म्हंटलेली गाणी, पाटावर काढलेला हत्ती आणि भिंतिवरच्या हदग्याच्या चित्राला घातलेल्या माळा? या माळांनी मला झाडांची ओळख करून दिली. या गाण्यांनी लय दिली, ठेका दिला. खिरापत वाटण्यात गंमत होती.
ती ओळखण्यात तर अधिकच मज्जा. हादग्याच्या विसर्जनावेळी माझा वाढदिवस. खूप साऱ्या मैत्रिणी, आईच्या हातची श्रीखंड पुरी, बटाट्याची चविष्ट भाजी असा साधासा मेन्यू. (त्याकाळातील जंगी मेन्यू. कारण बटाट्याची भाजी सणासुदीलाच केली जात असे.) नवा फ्रॉक, घर दणाणून सोडणाऱ्या आवाजात हदग्याची गाणी. पुन्हा नाही च धरला तसा मैत्रिणींसोबत फेर. अनेक वाढदिवस आले आणि गेले. पुन्हा तुझ्या कडं नाही येऊ शकले रे वाढदिवसाला हदग्याची गाणी म्हणायला.
हं, राहूनच गेली माझी भातुकली तुझ्या खिडकीत. इवली इवली चूल बोळकी, गूळ दाण्याचे लाडू, पण बरीचशी आंबटगोड चव रेंगाळत राहिलीय हं अजूनही. कालपरवापर्यंत सांभाळून ठेवलेली लेकीची भातुकली कामवालीच्या मुलीला देऊन टाकली. वाटत होतं त्या खेळाच्या रुपात बालपण आहेच माझं, माझ्या पक्व मनात.लेक म्हणाली देखील, ‘आई, माझ्या पेक्षा तूच रमलीस माझ्या खेळात.’
भरतकामाचे टाके, वीणकामाच्या सुया, गजगे, जिबलीची एक्कय दुख्खय, दोरीच्या उड्या… वय वाढलं, काळ बदलला, खेळ बदलले… मन तेच आहे.परसदार नाही राहिलं, तरी तिथल्या बंबाची ऊब तीच आहे. किती दिवस झाले ना? लग्नानंतर पहिल्या वर्षी सणवार, होसमौज होत राहिली. तुझी माझी भेट होत राहिली. मला बघून तू खूष व्हायचास. मेंदीच्या पानावर रेंगाळणारं मन प्रोढ झालं. मी आई झाले.तुझ्या ऊबदार कुशीत आईकडून आईपण शिकले. माझ्यातली आई मोठी झाली. इकडं सासरी जबाबदारी वाढत गेली. मी क्वचित कधीतरी येत असे तुझ्याकडं.
परत जाण्याची गडबड दांडगी असे.तुझ्या कुशीत शिरून, तुझ्या मांडीवर डोके ठेवून पडावं, तुझ्याशी हितगुज करावं असं वाटत होतं. पण वेळ कुठं होता?….
नंतर फारशी कधी राहिलेच नाही तुझ्या गारव्यात.माझ्या मैत्रिणी यायच्या माहेरपणाला. मी त्यात नसायचीच. कारणं काय अनेक. कधी मुलांच्या शाळा- सुट्ट्या यांच न सुटणारं सापशिडीवजा वेळापत्रक, कधी त्यांच्या आजापणाची लंगडी सबब! तर कधी माझ्या नणंदांच माहेरपण. राहून गेलंय माहेरवाशीण म्हणून आराम करणं. राहून गेलंय तुझ्या कानात सासरचं कौतुक सांगणं!! अभिमानानं सख्यांना मुलांची प्रगती सांगणं!!
आई खूपदा बोलवायची,’येत जा गं. मुलांना घेऊन.’नाही जमलं, आता वाटतं, आपणच जमवलं नाही का? आई- मावशीनं कसं जपलं त्यांचं माहेरपण? आणि आमचं आजोळ? मला का नाही जमलं? नंतर नंतर ती म्हणायची आता तुला ये म्हणणार नाही. तुला वाटलं तर ये. मी हसून मान झटकत असे… वेळ कुठं होता?..
पुढं मुलं मात्र कॉलेजच्या शिक्षणासाठी आजी आजोबांपाशी काही काळ राहिली. लेक मित्रांना घेऊन जात असे आजीकडं वरणभात चापायला.लेकीनं तर आजीची कॉफी जगप्रसिद्ध केली. रात्री त्या दोघांच्या बरोबर गप्पा मारत जेवत तेंव्हा नकळतच माझ्याच मुलांचा मला हेवा वाटत असे.आजही आजोबांच घर त्यांच्या मनात वेगळंच स्थान टिकवून आहे. तेंव्हाही मला वेळ… नव्हताच.
ती कधी बोलली नाही. बाबांच्या शेवटच्या आजारपणात तिला वाटलं नसेल का मी चार दिवस रहावं. तिला मदत करावी. थोडा शीण हलका करावा. मलाही वाटत असे, जावं चार दिवस, बाबांच्या बरोबर जुन्या आठवणीत रमावं. तशी उभ्या उभ्या एखाद्या दिवशी येत होते मी. सलगपणे चार दिवस काही राहू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत तिच्याबरोबर जागून बाबांची सेवा केली नाही मी.वेळ.. होता. नक्कीच होता.. पण..
खरंच राहूनच गेलं रे,
तुझ्या साठी वेळ देणं
तुझ्या अंगणात बागडणं
तुझ्या सुरात गाणं
तुझ्या तालात नाचणं
राहूनच गेलं
तुझ्या गळ्यात गळे घालून बेधुंद हसणं
तुझ्या कुशीत शिरून हमसून हमसून रडणं
तुझ्या कुशीत, तुझ्या सावलीत विश्रांती घेण्याच्या प्रतिक्षेत,
तुझीच दीपा
क्रमशः ….
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈