सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नुकतीच आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. एक आख्यायिका सांगतात की, या दिवशी रात्री लक्ष्मीदेवी ‘को-जागर्ती ‘ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’ असे विचारते. या दिवशी देवीचा कृपाशीर्वाद मिळतो. समृद्धी येते असे म्हणतात.

हेच कॅन्सरच्या आजाराच्या बाबतीतही म्हणता येईल. को-जागर्ती असे विचारणारी देवी जो “जागृत “आहे त्याला निश्चित प्रसन्न होते आणि त्याला आरोग्य धन मिळते. आरोग्यम् धनसंपदा ! हे तर आपल्याला ठाऊकच आहे.

आज ७ नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन (National Cancer Awareness Day ) आहे.  या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली आहे.

आज-काल प्रगत तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारांवर सुलभ आणि प्रभावी उपचार करता येऊ लागलेले आहेत. कॅन्सरसारख्या आजाराचा विचार केला की,एक काळ असा होता की ‘कॅन्सर म्हणजे मृत्यू ‘ असेच जणू समीकरण झालेले होते.

पण आज प्रगत, प्रभावी उपचारांनी क्रांती घडविलेली आहे. कॅन्सर रोग पूर्णपणे बरा होणे आजकाल शक्य झाले आहे.  यामध्ये हा आजार सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षात येणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. या आजारावर प्रतिबंधात्मक औषधोपचार नाहीत.  पण,

Early detection is prevention .

असं नक्की म्हणता येईल. म्हणून प्रतिबंधात्मक चाचण्या (प्रिव्हेंटिव्ह चेकअप )खूप महत्वाच्या ठरतात.

महिलांमध्ये कॅन्सर बाबत जागृतीचे काम करताना बऱ्याच वेळा या दुखण्याबद्दलची भीती,तपासणी टाळण्याची वृत्ती, स्वतःच्या स्वास्थ्या बाबतची उदासीनता यांचा अनुभव येतो. हे औदासिन्य,भीती किती ? तर या आजाराची माहिती देणार्‍या व्याख्यानाला येण्याची सुद्धा अनेकांची तयारी नसते .

घरातल्या गृहिणी घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारींची लगेच काळजी घेऊन उपचार करून घेतात. पण स्वतः मात्र बारीकसारीक तक्रारी अंगावरच काढतात आणि आजार वाढला की दवाखाना गाठतात. पण काही आजारांच्या बाबतीत बराच उशीर झालेला असू शकतो. शिवाय लाज,संकोच हे जन्मजात स्वभावधर्म साथीला असतातच.

यामुळे कॅन्सर प्रतिबंधात्मक चाचण्यांसाठी सहजासहजी तयार होणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी असते. पण वेळेवर सावध होऊन तपासणीला गेलेल्या,आजाराचे अगदी प्राथमिक स्थितीत निदान झाल्याने पूर्ण बऱ्या झालेल्या मैत्रिणी पाहिल्या की खूप समाधान मिळते. पण समजून-उमजून तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या मैत्रिणी पाहिल्या की वाईट वाटते. हे म्हणजे तोंडावर पांघरूण घेऊन ‘मी झोपलोय’असं म्हणण्यासारखं झालं.

अहो, भाजीची एक जुडी घ्यायची तर आपण ५-६ जुड्या खालीवर करून बघतो. मग आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण किती जागरूक असायला हवे हे लक्षात येतंय ना ? आयुष्यातील प्रत्येक बाबतीत आपण चोखंदळ असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलीच हवी असते. आपल्याला अनमोल असे शरीर लाभलेले आहे. मग त्याचे स्वास्थ्य शेवटपर्यंत चांगलेच राहायला हवे ना ! त्यासाठी कोणतेही आजारपण,दुखणे झाले तरी ते वेळेवर लक्षात येऊन त्यावर लगेच उपचार झाले पाहिजेत हे पाहणे हे आपलेच काम आहे.

त्यासाठी दरवर्षी आरोग्यविषयक सर्व तपासण्या करायला हव्यात.  विशेषत: पॅप स्मिअर,मॅमोग्राफी,काही पॅथॉलॉजी तपासण्या करून घेणे खूप आवश्यक आहे. यातून संभाव्य धोक्याची पूर्वसूचनाही वेळेवरच कळू शकते. त्यावरील उपचारांनी आजाराला वेळेवरच रोखता येते. यातून एक लक्षात येते की आज-काल कॅन्सर हा दुर्धर आजार राहिलेला नाही. त्यावर चांगले प्रगत उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणूनच सर्वांनी जागरूकपणे नियमित कालावधीनी तपासण्या करून घ्यायला हव्यात.

एकूणच कॅन्सर बाबत जागरूक कसे रहावे याबद्दल समजून घेतल्यावर प्रतिबंधात्मक चाचण्यांची उपयुक्तता आणि गरज,सकारात्मक विचारधारा,जीवनातील डोळस वाटचाल यांचे महत्त्व लक्षात आले असेलच. त्यासाठी आपल्या शरीरातील लहान-सहान बदल सुद्धा वेळेवर लक्षात घेतले पाहिजेत.  त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे. घरातल्या अनुवंशिक आजारांची,जवळच्या नातलगांच्या मोठ्या आजारपणाची नोंद ठेवायला हवी. एकूणच नेहमी जागरूक राहायला हवे. कारण शेवटी आपले आरोग्य हे आपल्याच हाती असते. यासाठीच हे कळकळीचे आवाहन—–

 

इकडे जरा द्या तुम्ही ध्यान

कॅन्सर जरी रोग महान

वेळेवर करता त्याचे निदान

मनुजा मिळते जीवनदान !!

 

उत्तम आरोग्याचा आदर्शमंत्र

रोगा आधीच त्यासाठीची तपासणी

आपण सारे मिळून करू या आरोग्य मंत्राची अंमलबजावणी !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुजाता बोधनकर

अभ्यासपूर्ण लेख , सगळ्यांनी लक्षात घ्याव्या अशा गोष्टींचा नीट ऊहापोह केला आहे. वाचनीय व आचरणीय लेख. अभिनंदन ज्योत्स्ना.