डॉ गोपालकृष्ण गावडे
परिचय
शिक्षण : MBBS, DGO, DNB from BJ Medical College Pune
डॉ गोपालकृष्ण गावडे हे पुणे येथील सिंहगड रोड वरील प्रसिद्ध City Fertility Center या टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे डायरेक्टर आणि IVF consultants म्हणून कार्यरत आहेत, तसेच सिंहगड रोड वरील Gurudatta Diagnostic Centre & Annual Heath Check Up Clinic चे डायरेक्टर म्हणून ते कार्यभार बघतात.
डॉ गावडे पुण्यातील अनेक मोठ्या रूग्नालयांमध्ये स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ म्हणून सेवा पुरवतात. सामाजिक बांधिलकी जपत ते सरदार वल्लभाई पटेल cantonment हॉस्पिटल पुणे येथे गेल्या आठ वर्षांपासून मानद सेवा पुरवत आहेत.
आजवर त्यांनी पाच हजारापेक्षा (५,०००) जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी एका सैनिकाला आवश्यक असणारे बॕटल गिअर म्हणजे असॉल्ट रायफल, बुलेटप्रूफ जॅकेट (bullet Proof Jacket), हेल्मेट(helmet), नाईट विजन गोगल्स (Night Vision Goggles) आणि इतर सामुग्री यांच्या साठी लागणारी रक्कम (दोन लाख) सैन्य दलास भेट देतात. तसेच 2019 पासून हे अभियान इतरांनी चालवावे यासाठी जनजागृती सुद्धा डॉक्टर करत असतात.
डॉ गावडेंनी दोन पुस्तके लिहली आहेत.
- असामान्य यश मिळवणारे मन नक्की कसा विचार करते याचा शोध घेणारे स्मार्टर सेल्फिश हे पुस्तक आणि
- वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डॉ गावडेंना आलेल्या हृदयदस्पर्शी अनुभवांचे संकलन असलेले पुस्तक अनुभुति अशा दोन पुस्तकाचे ते लेखक आहेत.
विविधा
☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
तेव्हा मी सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे गावात छोटे हॉस्पिटल चालवत होतो. 2019 साल चालू होते. पानशेत धरणाच्या खाली BSF चा मोठा कँप आहे. तेथील जवानांना मी मोफत वैद्यकीय सेवा देत असे. आधून मधून BSF चे जवान मला दाखवायला येत. असाच एका दुपारी पस्तिशीच्या आसपासचा एक जवान दाखवायला आला.
“डाक्टर साहब, बुखार से शरीर तप रहा है. थंड भी लग रही है.” त्याने त्याच्या उत्तर भारतीय हिंदी टोनमध्ये आपला त्रास सांगितला.
“लघवीको आग हो रही है क्या? आग मतलब जलन.” मी आपल्या गुलाबी हिंदीत त्याला विचारले.
“नही डाक्टर साब”
“घसा दुखता है क्या?”
“ना”
“संडास पतला हो रहा है? पेट दर्द वगैरा?”
“नही. बाकी कुछ भी तखलिफ नही. सिर्फ थंडी-बुखार है.”
“अच्छा, बेड पर लेटो. जरा BP वगैरा जांच कर लेता हुँ.”
तो जवान उठला आणि बुट काढुन एक्झामिनेशन बेड वर झोपला.
मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कप बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला. “इधर क्या हुआ था?”
“गोली लगी थी साहब.”
मी उडालोच, “यह गोली का जखम है?”
“एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था.” त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला.
“बाप रे, फिर बचे कैसे? आप सनी देओल हो क्या?”
“काहे का सनी देओल साहब! इतना खुन बहा था की मुझे मरा समजके छोड दिया था. मेरा नसीब अच्छा था की खुन की बडी नली फटी नही. वक्त पर फस्ट एड मिला. हॉस्पिटल के लिए एअर लिफ्ट मिली इसलिए वक्त पर सर्जरी हो पाई. नही तो उस दिन मै खत्म हुआ था.”
“यह सब कहाँ हुआ था?”
“व्हॕलीमे साहब, कश्मीर व्हॕली में.”
मी त्याला तपासले. आम्ही दोघे परत आपापल्या जागांवर स्थानपन्न झालो. मी त्याला हिमोग्राम, युरीन, डेंगू, मलेरिया, टामफॉईड अशा दोन तीन तपासण्या करायला सांगितल्या. औषधे लिहून दिली. कशी घ्यायची ते समजावून सांगितले. आराम, हायड्रेशन वगैरे काही पथ्य सांगितली. पण त्याची पुर्ण स्टोरी ऐकायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती.
“तो व्हॕलीमे क्या हुआ था उस दिन? यह सब कैसे हुआ था?”
“कुछ नही साहब, हमको इंटिलिजंस मिला की एक गाँवमे एक घरमें टेररिस्ट छुपे है. तो हमने गाँवका कॉर्डन कर लिया. काॕर्डन कर लिया मतलब गाँव को घेर लिया. रात का वक्त था. लाईट भी नही थी. टेररीस्ट किस घर में छुपा है पता नही था. तो हर घर की तलाशी शुरू हुई.
हम चार लोक एक घर में घुसे. एक जेसीओ और हम तीन जवान थे. घर मे पुरा अंधेरा था. जेसीओ साहबने जैसेही टॉर्च लगाया तो कोनेसे ब्रस्ट फायर आया. सामनेवाले तीनोंको गोली लगी और हम गिर पडे. पिछे वाले चौथे जवानने टेररीस्ट के गन के मझल फ्लॕशके ओर अंदाजेसे गोलीयाँ चला कर उसे मार डाला.
जेसिओ साहब और मेरे सबसे अच्छे दोस्तने जगहपरही दम तोड दिया. मै मरते मरते बचा. बस मेरा वक्त नही आया था उस दिन.” मित्राच्या आठवणीने त्याचा आवाज कातर झाला होता. कंसल्टिंगमध्ये काही क्षण शांतता होती.
“आपने नाईट व्हिजन गॉगल्स या बुलेटप्रुफ जॕकेट नही पहने थे?” मी आश्चर्याने विचारले.
“कहाँ साहब? दस-बारा साल पुरानी बात है. तब यह सब चिजें कहा मिलती थी? नाईट व्हिजन गॉगल्स तो आज भी सिर्फ स्पेशल फोर्सेके पास होते है. आज भी बहुत सारे जवानोंके पास पुरानी इंसास राइफल होती है. वह AK के मुकाबले उतनी कारगर नही है.” मी अवाक होऊन ऐकत होतो.
“चलो साहब, निकलता हुँ. खुन जाँच कराके रिपोर्ट दिखाने आता हुँ. तब तक गोली चालू करू न?” तो उठला.
“हाँ हाँ. चालू करीए. व्हायरल ही लग रहा है. ठिक हो जाओंगे. लेकिन आजकल डेंगू और मलेरिया के पेशंट भी मिल रहे है. इसलिए जांच जरूरी है.”
“ठिक है साब.” असे म्हणत तो केबीनच्या बाहेर पडला. मी मात्र विचारांमध्ये गढून गेलो.
आपली सेनादले आज किती खराब परिस्थितीत लढत आहेत! ही परिस्थिती सध्या हळूहळू सुधारते आहे. तरी पण ही परिस्थिती पटकन सुधारण्यासाठी माझ्यासारखे सामान्य नागरीक काही करु शकतो का?
2004 सालापासून सैन्य बुलेटप्रुफ जोकेटची मागणी करत आहे. पण ती अंशतः पुर्ण व्हायला 2016 उलटला. भारताचा शत्रू AK 47रायफल ने लढतो आणि आमचा सैनिक मात्र त्याचा सामना इन्सास सारख्या निकृष्ट रायफलने करतो. आपल्यावर वेळ आली तर अशा विषम परिस्थितीत लढून आपण आपला जीव धोक्यात घालू का? टेररिस्ट असल्याचा संशय असलेल्या आंधाऱ्या खोलीत आपण असे नाईट व्हिजन गॉगल्सशिवाय शिरण्याचे धाडस करण्याचा विचार तरी करू का? आणि ते ही बुलेटप्रुफ जॅकेटशिवाय?
दरम्यान मधल्या सरकारने उद्योजक आणि शेतकऱ्यांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. लाख लाख कोटींचे अनेक घोटाळे झाले. पण सैन्याच्या बुलेटप्रुफ जॕकेट वा आधुनिक रायफल सारख्या मुलभुत गरजा मात्र पुर्ण झाल्या नाहीत.
या काळात कितीतरी जवानांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या असतील. कितीतरी स्रिया विधवा झाल्या आणि कितीतरी मुलं अनाथ झाली असतील. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्यांच्या वाट्याला सहानुभूती आणि बंदुकीच्या तीन फैरींची सलामी सोडल्यास फार काही पडले नसेल.
वायुसेनेला अजूनही सत्तर वर्षांपुर्वीची जुनी मिग 21 विमाने वापरावी लागत आहेत. नेव्हीची एकमेव विमान वाहक नौका आणि बहुतेक लढावू जहाजे सेकंड हँड आहेत. कुणासाठी मी माझा जीव धोक्यात घालतोय हा प्रश्न प्रत्येक सैनिकाला पडत नसेल? कमी पगार, कुटुंबापासूनचा अनेक महिन्यांचा दुरावा, अपुऱ्या साधनसामुग्रीने शत्रूचा सामना, सतत जीवावरचे संकट, अशा परिस्थितीत काम करूनही भारतीय सैनिकांचे मनोबल आणि राष्ट्रभक्ती टिकून आहे. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे.
प्रत्येक जन आपल्या हितांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले हित नक्की कशात आहे हे कळण्याचा स्मार्टनेस सर्वांमध्ये असतोच असे नाही. कुटुंबाचे रक्षण झाले तर कुटुंब आपले रक्षण करते. राष्ट्राच्या सीमांचे रक्षण झाले तरच राष्ट्र आपले रक्षण करते. कुटुंब, समाज वा राष्ट्र यासारख्या संकल्पना जपण्यात घटक जनांचा दुरोगामी स्वार्थ असतो. कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत.
— क्रमशः भाग पहिला
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈