सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ रक्षाबंधन – बदलणारे स्वरूप… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
भावना त्याच पण माझ्या नजरेला त्याचे बदलणारे स्वरूप जाणवले.
बालपणीचे रक्षाबंधन म्हणजे मज्जा!महत्वाचे म्हणजे शाळेला सुट्टी.नारळाचे पदार्थ खाणे.घरी येणारे आणि लाड करणारे मामा.आणि मामा घरी आल्यावर आमच्या खोड्यांना उधाण!एक दिवस मोठ्यांच्या शिस्तीतून सुटका.
हळूहळू या सणाचे महत्व लक्षात येऊ लागले.पण त्यातील गंमत होतीच.पण वय वाढले तसा एक वेगळाच जाच सुरु झाला.आणि राखी पौर्णिमा नावाचा निबंध रुपी त्रास उभा राहिला.बरं माझी गंमत अशी व्हायची की मला वाटायचे जसा सण साजरा केला तसे लिहायचे.आणि फजिती व्हायची.एकंदरीतच साहित्य,कल्पना विस्तार,रसग्रहण यातील माझी बालबुद्धी काही मोठी झाली नाही. त्यामुळे संदर्भा सहित स्पष्टीकरण या बाबत पहिल्या पासून मी सलाईन वरच असते.तर ज्यांच्या निबंधाला शाबासकी मिळायची ते जग जिंकल्याच्या आनंदात असायचे.आणि यांनी निबंधात लिहिलेले केव्हा घडले,किंवा यांनी हा सण असा कधी साजरा केला याचा विचार मी करत रहायची.मग एका मैत्रिणीने सांगितले त्यात कल्पना असतात.माहिती असते.काही गाण्याच्या ओळी असतात.मग तो निबंध छान होतो.हे समजले आणि माझा निबंध म्हणजे समालोचन आहे हे समजले.
जसे जसे वय मोठे होत गेले तसे सणाची तयारी.त्यातील अडचणी लक्षात येऊ लागल्या.आणि विविध वाचन,मिळणारी माहिती यातून रक्षाबंधन याचा अर्थ कळू लागला.
अजून एक बाल मनाला पडलेला प्रश्न असा होता की इतकी सुंदर राखी असते मग त्याला बंधन का म्हणायचे?आणि दुसऱ्यावर असे बंधन का टाकायचे?मग त्यात आनंद कसा?आणि भाऊ लहान असेल तर तो बहिणीचे रक्षण कसे करणार? ज्यांना भाऊच नाही त्यांचे काय?
मग वाचनातून, मोठ्या माणसांकडून याची उत्तरे मिळाली..
ते मायेचे,प्रेमाचे बंधन आहे.कोणतीही गोष्ट थोड्या बंधनात असेल तर ती योग्य वाटेने जाते आणि आनंद देते.जसे नदीला काठ,बांध गरजेचे असतात नाहीतर ती विध्वंस करेल.शाळेतील विद्यार्थ्यांना पण शालेय बंधने आवश्यक असतात.वाद्यांवर पण काही बंधने,ताण असेल तरच ती सुरात वाजतात.
या सणातून दोन व्यक्तींमध्ये एक नाते निर्माण होते.असलेले दृढ होते.आणि आपण एकमेकांच्या वेळेला उपयोगी पडायचे आहे याची जाणीव टिकून राहते.जरी हा सण बहीण भाऊ यांचा मानत असले तरी रक्षणकर्ता कोणीही असू शकते.तिथे नाते,वय असा भेदभाव नसतोच.एक मानसिक आधार असतो.
आम्ही आमच्या शाळांमध्ये हा मोठ्या उत्साहात साजरा करतो.त्यामुळे शाळेतील मुलांमध्ये न कळत संस्कार होतात.सैनिक हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील सैनिकांना राखी बांधतो.त्या मुळे आपले खरे रक्षक त्यांना समजतात. आणि शाळेतील झाडांना पण मुले राखी बांधतात.त्या मुळे निसर्ग आपला सोबती,रक्षक आहे व आपण त्याचे जतन,रक्षण केले पाहिजे ही भावना वाढीस लागते. बहुतेक सगळे देवाला राखी बांधतात.आम्ही बहिणी एकमेकींना राखी बांधतो.
तर माझ्या दृष्टीने मज्जा ते व्यापक जबाबदारी, भावना अशी अनेक रुपे रक्षाबंधन याची समोर आलेली आणि अनुभवलेली आहेत.
न बदललेली मात्र एकच गोष्ट अनुभवली आहे,ती म्हणजे आकाशवाणी वर लागणारी हिंदी,मराठी गाणी तेथील गाणी लावणारे बदलले किंवा गायक निवर्तले आहेत.पण प्रसारित होणारी गाणी मात्र त्रिकालाबाधित आहेत.
असे हे बंधन मनापासून स्वीकारु या.आणि कोणाचा तरी मानसिक आधार बनू या.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
३१/८/२०२३
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈