श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ राम आणि सीता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
रामायणातील अनेक महत्त्वाच्या पात्रांबद्दल आपण आजवर चर्चा केली. राम आणि सीता यांच्या जीवन चरित्रावर पण आपण बोललो. पण या दोघांचे पती पत्नी म्हणून सहजीवन कसे होते ते आज पाहू या.
राम आणि सीता हे एकमेकांवर निस्सीम प्रेम असणारे एक असे अलौकिक जोडपे आहे की ज्यांची कीर्ती युगानुयुगे अमर राहील. राम आणि सीता यांना नियतीने एकत्र आणले होते. त्यांनी कधी एकमेकांना पाहिले नव्हते किंवा एकमेकांबद्दल ऐकले देखील नव्हते. विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जातात. रामलक्ष्मण राक्षसांचा नायनाट करतात. अशा वेळी जनक राजाकडून सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण जनकाकडून विश्वामित्रांना येते आणि ते आपल्यासोबत राम लक्ष्मणाला घेऊन जातात.
जनकाने त्या विवाहासाठी एक पण ठेवलेला असतो, तो म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा. जेव्हा तेथे उपस्थित सगळे राजे ते उचलण्यात अयशस्वी होतात, तेव्हा विश्वामित्राच्या आदेशानुसार राम ते शिवधनुष्य उचलतो. ते त्याच्या हातून भंग होते. आणि मग सीता रामाला वरमाला घालते. मात्र विवाहापूर्वी सीता रामलक्ष्मणाला पुष्पवाटिकेत पाहते ,त्याचवेळा हा लावण्यमूर्ती असलेला राम तिच्या मनात भरतो. आणि त्याच्याशीच आपला विवाह व्हावा ही इच्छा तिच्या मनात निर्माण होते. सीता ही भूमीकन्या तर राम हा विष्णूचा अंश. त्यांच्या विवाहाने जणू भूमी आणि आकाश एकत्र येतात.
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,
स्वयंवर झाले सीतेचे.
लग्नानंतर जेव्हा श्रीराम पित्याला दिलेल्या वचनानुसार वनवासाला निघतात, तेव्हा ते सीतेचा निरोप घ्यायला येतात. रामाशिवाय राहायचे ही कल्पना देखील सीता सहन करू शकत नाही. म्हणून राम जेव्हा तिला समजावतात की वनवासातले जीवन अत्यंत कठीण आणि दुःखदायक आहे. तेव्हा तू अयोध्येतच राहा. त्या प्रसंगी क्षणाचाही विचार न करता सीता म्हणते निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.
इतकी ती राममय झाली आहे. राम आणि सीता यांची शरीरे फक्त वेगळी आहेत. आत्मा एकच आहे. ते एकजीव झालेले आहेत. एवढेच नाही तर सीता ही रामाची शक्ती देखील आहे. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. म्हणून तो सीताराम आहे. त्यामुळे श्रीराम आपल्यासोबत वनवासात सीतेला घेऊन जातात. जसा राम हा सर्व बाबतीत आदर्श आहे तशीच सीता सुद्धा. ती आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून, आणि आपल्या दिरांवर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी आहे.
सीतेला रामाच्या पराक्रमावर कधीही न ढळणारा विश्वास आहे. म्हणून वनवासात जेथे हिंस्त्र प्राणी आहेत, राक्षसांची भीती आहे अशा ठिकाणी सुद्धा रामाच्या पराक्रमावर श्रद्धा असणारी सीता त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून निर्धास्त आहे. निर्भय आहे. एवढेच नाही तर वनवासातील हा रामासोबतचा काल तिच्या जीवनातला आनंददायक आणि सुखकारक असा काल आहे कारण या काळात आपल्या प्रिय राघवाबरोबर तिला राहायला मिळते. त्यापुढे राजप्रासादातील आणि स्वर्गातील सुखे देखील तिला तुच्छ आहेत.
रामाच्या पराक्रमावर तिचा किती विश्वास असावा, आणि रामावर तिचे किती प्रेम असावे याची साक्ष देणारा एक प्रसंग रामायणात आहे. रावण तिला पळवून घेऊन जाताना आपल्या शौर्याचे वर्णन तिच्यापुढे करतो. तो म्हणतो की मी देवांना सुद्धा बंदी बनवले आहे. तेव्हा सीतेने त्याला दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, ‘ तू कसला शूर आणि पराक्रमी ? तू तर सिंहीणीचे हरण केले आहेस. एखाद्या कोल्ह्याप्रमाणे . माझे पती राम म्हणजे नरसिंह आहेत. आणि कोल्हा कधीही सिंहाची बरोबरी करू शकत नाही. ‘ किती सुंदर आणि बाणेदार उत्तर आहे. तेही रावणासारख्या महापराक्रमी पुरुषाला न घाबरता धिटाईने दिलेले.
आता तिला रावणाने पळवून नेल्यानंतर रामाची काय अवस्था होते ? तर तो प्रचंड शोकविव्हल होतो. सीतेचा विरह त्याला सहन होत नाही. जणू रामाची शक्तीच हरवते. असे त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असते. रावणाच्या लंकेत काही काळ काढला म्हणून ती अपवित्र झाली असे लोकांनी म्हणू नये म्हणून सीता अग्निपरीक्षा देते. तिच्या मनात एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. म्हणून तर अमर अशा पाच पतिव्रतांमध्ये सीतेचे नाव घेतले जाते. अर्थात रामाच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही शंका नसते. ती पवित्र आहे हे राम जाणून होता. लोकांना असे वाटते की राम जर आदर्श पती असेल तर त्याने सीतेचा त्याग का केला ?
त्याचे उत्तर असे देता येईल की रामायण काळात राजघराण्यातील व्यक्तींबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आपली मते व्यक्त करण्याची लोकांना मुभा होती. आताही आपण जी रामायण मालिका पाहतो आहोत, त्यातही दशरथ, कैकयी, भरत इ बद्दल चर्चा करताना लोकांना वेळोवेळी दाखवले आहे. अशाच पद्धतीने सीता परत आल्यानंतर नगरवासी तिच्याबद्दल चर्चा करत होते. रामाच्या कानावर ही वार्ता येते. कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रामाने सीतेचा त्याग केलेला नाही तर अयोध्यानगरीतील अनेक पौरजनांच्या मनात ही शंका होती.
या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी राम हा केवळ पती नव्हता. तो राजा देखील होता. या प्रसंगाच्या निमित्ताने त्याचा पतिधर्म आणि राजधर्म यात संघर्ष निर्माण झाला आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की राम कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. रामायणातले अनेक प्रसंग त्याची साक्ष देतात. तो आधी प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यकठोर राजा आहे आणि बाकीच्या सगळ्या भूमिका नंतर. जेव्हा कुटुंब आणि राष्ट्र यांच्यात निर्णय घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कुटुंबाच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रभावनेला परमोच्च महत्व दिले पाहिजे. ‘ ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत ‘ रामाने तेच केले. आपल्या राज्यासाठी त्याने हा सर्वोच्च त्याग केला. रामाने पत्नीचा नव्हे तर राजाने राणीचा त्याग केला आहे. रामाच्या मनात पत्नी म्हणून सीतेचे स्थान कायमच आहे. रामाच्या या स्वभावाची सीतेला देखील कल्पना होती. म्हणून तिला आपल्यावर हा झालेला अन्याय आहे अशी तिची तक्रार नव्हती.
रामाने तिचा त्याग केला असता तर त्याला दुसरे लग्न करता आले असते. यज्ञाच्या वेळी दुसरी पत्नी करता येते असे रामाला सांगितले गेल्यावर सुद्धा राम त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की रामाच्या हृदयसिंहासनावर एकाच व्यक्ती पत्नी म्हणून विराजमान आहे. आणि ती म्हणजे फक्त सीता. म्हणून दुसरे लग्न न करता सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून यज्ञाला बसतो. इतके प्रेम रामाचे सीतेवर आहे. त्यामुळे तो जेव्हा राजाच्या भूमिकेत होता, तेव्हा राजाचे कर्तव्य त्याने पार पडले. आणि पतीच्या भूमिकेत होता, तेव्हा एका सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार त्याच्या मनात नव्हता. म्हणून तो आदर्श पती सुद्धा आहेच. राम आणि सीता यांचे सहजीवन आदर्श सहजीवनाचा एक सुंदर नमुना आहे. आणि राम सीता ही एक अलौकिक प्रेमकथा सुद्धा.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈