श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ रोजच असावा ‘मातृदिन’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
जागतिक मातृदिन दरवर्षी सर्वत्र साजरा होत असतो.. आपण भारतीय उत्सवप्रेमी आहोतच. आपला पारंपरिक मातृदिन म्हणजे बैलपोळ्याचा दिवस अर्थात श्रावण अमावस्या.
आईला कधी वंदन करावे ? आईची आठवण कधी यावी ? याला काही बंधन नाही. प्रत्येक लेकराच्या मनात एक खास कप्पा कायमचा असतो. तो कधीही दुसऱ्या गोष्टींनी भरला जात नाही. जायलाही नको…. !
माझ्या मनात जरा वेगळा विचार आहे. आज समाजात ‘मातां’ची संख्या आणि गुणवत्ता कमी नाही. पण दुर्दैवाने समाजातील मातृत्वभाव मात्र कमी होत चालला आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
समाजातील ‘मातृत्व’भाव वृद्धिंगत झाला तर समाजातील एकूण समस्यांपैकी अर्ध्या समस्या तरी लोप पावल्याशिवाय राहणार नाहीत. विश्वाच्या माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वरांना संत या नात्याने आदराने पाहिले जातेच, परंतु यापेक्षा त्यांचा मोठा आदर आणि सन्मान हा त्यांच्या ‘माऊली’पणात आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
दरवर्षी जागतिक मातृदिन साजरा करत असतांना त्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्यामधील मातृत्वभाव वाढण्यासाठी कटिबद्ध व्हावे अशी मी आपणांस नम्र विनंती करीत आहे.
आईचे शब्दरूप स्मरण…
१. जी रिती होऊनही भरून पावते ती ‘आई’.
२. चार मातीच्या भिंती।
त्यात माझी राहे ‘आई’।।
एवढे पुरेसे होई।
घरासाठी।।
३. काहीही दुखलं, खुपलं तर तोंडात येणारा पहिला शब्द ‘आई’.
४. आपल्या अश्रूंचे मूल्य जाणणारी, मूल्य जपणारी आणि मूल्य वाढवणारी एकच व्यक्ती ती म्हणजे ‘आई’
५. गोष्ट आनंदाची असो वा दुःखाची, सर्वप्रथम आठवते ती ‘आई’.
६. दाही दिशा अंधारून आल्यावर पाठीवरून हात फिरवून ‘बाळ, मी आहे ना’! असे म्हणून धीर देणारी फक्त ‘आई’.
७. अध्यात्माची सर्वात सोपी व्याख्या. ‘आई’
(एकतर समोरच्याची आई व्हा किंवा समोरच्याला आई माना.)
८. वीट नाही कंटाळा नाही
आळस नाही त्रास नाही
इतुकी माया कोठेचि नाही
मातेवेगळी।।
(दासबोध १७. २. २७)
आईच्या पावन स्मृतीस त्रिवार वंदन !!!
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर