सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ 🐱 रागावलेले प्राणी 🐜 ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज एक मुंगीची इमेज बघितली आपल्या गुगल बाबांची कृपा! आणि ती इमेज बघून एकदम घाबरलेच. आपली साधी घरात वावरणारी वेळेला आपल्या कपड्यांवर,अंगावर फिरणारी हीच ती मुंगी का? असा प्रश्न पडावा आणि भीती वाटावी असा तिचा चेहरा दिसत होता. एक विचार असा आला की देव मुंगी ( आपली गुदगुल्या करणारी काळी मुंगी ) आपल्याला चावत नाही. आपणच बरेचदा तिला त्रास देतो. म्हणूनच या लाल मुंग्यांना राग येत असावा आणि स्वत:ला मिळणारी वागणूक आणि काळ्या मुंगीला मिळणारी वागणूक हे दोन्ही मिळून ती एवढी रागीट चेहेऱ्याने आपल्याला कडकडून चावत असावी. 🐜

असेच सकाळी सकाळी म्हणजे साखर झोपेत असताना कोंबडा इतका कर्कश्श का ओरडत असावा? आमच्या शेजारच्या घरातील कोंबडा तर घड्याळाच्या दर तासाला नियमित पडणाऱ्या ठोक्या प्रमाणे दर तासाला आरवतो. बहुतेक दिवसभर त्याला माणसांच्या आवाजाचा जो त्रास होतो त्याचे उट्टे काढत असावा. 🐔

तीच गोष्ट कुत्र्यांची. कितीही लक्ष ठेवा आपला डोळा चुकवून आपण कंबर मोडून स्वच्छ  केलेल्या दरवाजावर व त्या समोरील स्वच्छतेवर घाण करून जाणार. अनेक उपाय केले पण कुत्र्यांना आमच्या घरा समोरची जागा फारच आवडली होती. जणू मला चिडवायचे ठरवूनच टाकले होते. मग मी गुगल साहेबांची मदत घेऊन उपाय शोधले आणि उग्र वासाच्या फिनाईलची मदत घेतली. त्याचा कुत्र्यांना एवढा राग आला की त्यांनी रात्रभर निरनिराळ्या आवाजात ( प्रत्येक कुत्र्याचा आवाज वेगळाच असतो म्हणा ) ओरडून माझ्या झोपेवर घाला घातला. असेही वाचनात आले होते की, लाल व निळ्या रंगाचे पाणी भरून बाटलीत ठेवले तर कुत्री, मांजरे यांचा त्रास होत नाही. मग मी पण तो उपाय केला. पण बाटल्या गायब होऊ लागल्या. शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी त्यातील एक बाटली चक्क कुत्र्याच्याच तोंडात बघितली. आणि या रंगीत पाण्याच्या बाटल्या कोण पळवत आहे याचे उत्तर मिळाले.🐶

आमच्या काकांच्या घरी एक लाडाची मांजर होती. कोणी आणले नव्हते. तीच आपणहून आली होती. आणि बळेच सगळ्यांच्या पायात येऊन लाड करून घ्यायची. आम्ही कॅरम खेळायला बसल्यावर तिला खूप राग यायचा. ती त्या बोर्ड वर बराच वेळ बसायची. सोंगट्यांचे बराच वेळ निरीक्षण करायची आणि रागाने आपण स्वतःच सर्व सोंगट्या बिळात पंजाने ढकलून द्यायची. ती इतकी शहाणी होती की एखादा पदार्थ आवडला नाही तर पळून जायची. आणि जबरदस्तीने दिला तर जीभ बाहेर काढून उलटी आल्या सारखे करायची आणि तो पदार्थ देणाऱ्याला पंजाचा प्रसाद द्यायची. 🐱

अशीच एकदा आपण जिला गरीब समजतो अशा शेळीची गंमत कसली, रागच बघितला होता. एका शेळीला एक व्रात्य मुलगा शेपटीला हात लावून,ओढून सारखा त्रास देत होता. चार पाच वेळा ती पुढे पळाली. नंतर मात्र ती त्या मुलाकडे वळली आणि त्याला आपल्या छोट्या शिंगाने मारले. जणू तिने अन्यायाचा प्रतिकार करा हीच शिकवण दिली. 🦙

अशा काही थोड्या गमती,काही राग सहज ओरडणाऱ्या कोंबड्या मुळे आठवले. तशा प्राण्यांच्या बऱ्याच आठवणी,अनुभव व गमती जमती आहेत. त्या पुन्हा केव्हातरी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments