☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले ☆
ह्यापुढे आम्ही पोहोचलो ते एका अतिशय ऐतिहासिक महत्वाच्या जागी तो म्हणजे ‘होळीचा माळ’. इथे गडावरील होळीचा सण साजरा व्हायचा आणि इथेच महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. तिथल्या छत्रपतींच्या भव्य पुतळ्यापुढे नतमस्तक झाल्यावर जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी स्वत:चे अवघे आयुष्य ओवाळून टाकणार्या, जिवाची बाजी लावून परक्या शत्रूचा तसेच घरभेद्यांचाही नि:पात करणार्या, प्रसंगी महाघोर संकटांना शौर्याने तोंड देऊन स्वत:ची, अवघ्या रयतेची, स्वदेशाची आणि स्वधर्माची अस्मिता जपणारे आणि उजळवून टाकणारे ‘श्रीमान योगी’ जिथे राजसिंहासनावर बसले त्याच भूमीवर आपण उभे आहोत ही जाणीव मनाला गहिवर आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणते.
होळीच्या माळावरून चालत पुढे आम्ही बाजारपेठ मध्ये आलो. आता ह्या ठिकाणी घरांची फक्त जोती शिल्लक आहेत. इथे घोड्यांवरून मालाची खरेदी-विक्री चालायची असे म्हणतात. काही इतिहासतज्ञ असेही म्हणतात की ही बाजारपेठ नसून गडावर मुक्कामास असलेल्या सरदारांची / भेटीस आलेल्या खाशांच्या राहण्याची सोय म्हणून बांधलेली घरे आहेत.
बाजारपेठेतून पुढे आल्यावर एका मावशींकडे कोकम सरबत पिण्याचा मोह आवरला नाही. मावशींकडे “तुमचे गाव कोणते? आता धंदा’पाणी’ कसे सुरू आहे?” अशी विचारणा केल्यावर “पायथ्याचं हिरकणवली आमचं गाव. अजून पूर्वीइतके पर्यटक येत नाहीत.” म्हणाल्या. “इथून भवानीकडा किती लांब आहे?” असे विचारण्याचाच अवकाश त्यांनी गडाची सगळी कुंडलीच माझ्यासमोर मांडली. ? “गड पूर्ण बघायला किमान तीन दीस लागतील, गडावर इतकी तळी आहेत, तितकी टाकं आहेत”,
त्याचजोडीला “दारूगोळ्याच्या कोठारावर इंग्रजांचा तोफगोळा पडून मोठा स्फोट झाला आणि पुढे बारा दिवस गड जळत होता”, अशी काही दारुण ऐतिहासिक माहिती बाईंकडून ऐकायला मिळाली. त्यांचा नवरा किंवा घरातील कुणीतरी गाईडचे काम करणारे असावे अशी मला शंका येते न येतेस्तोवरच एक कुरळ्या केसांचा पुरुष तिच्याकडे आला आणि म्हणाला “चल, लवकर पाणी पाज”. हयालाच मी थोड्या वेळापूर्वी पर्यटकांच्या एका चमूला माहिती देताना पहिले होते. सुशिक्षित काय किंवा अशिक्षित काय बायकोच शेवटी नवर्यास पाणी पाजणार!! ?? असो.
इथून पुढे थोडे चालत आम्ही जगदीश्वर मंदिरापाशी आलो. महाराज रोज पूजेसाठी इथे येत असत. त्यामुळे मंदीराच्या बाहेर पादत्राणे उतरवूनच आत जावे. थोड्या भग्नावस्थेतील नंदीचे दर्शन घेऊन गाभार्यात प्रवेश करावा. शंकराच्या पिंडीचे दर्शन घ्यावे आणि आजूबाजूची गर्दी विसरून दोन मिनिटे डोळे मिटून शांत बसावे.
चिरेबंदी मंदिराची रचना भव्य असून एका चिर्यावर संस्कृत श्लोक कोरलेला आहे. हा चिरा भिंतीमधील इतर चिर्यांपेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे असेही म्हणतात की हा चिरा मूळ घडणीतील नसून नंतरच्या काळात बसवण्यात आला असावा.
मंदिराच्या मागील बाजूसच छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. ह्या पवित्र जागी माथा टेकवून सर्व भक्तमंडळी धन्यधन्य होतात. रणजीत देसाईंच्या पुस्तकातील ‘श्रीमान योगी’ इथे समाधीस्थ असले तरी सर्व हिंदूंच्या हृदयसिंहासनावर अजून जागृत राज्य करीत आहेत ह्याची जाणीव होते. महाराजांच्या समाधीमागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. इथूनच थोड्या दूर अंतरावर लिंगाण्याचा सुळका आव्हान देत उभा दिसतो. त्याच्या मागेच राजगड-तोरणा ही दुर्गजोडी अस्पष्ट का होईना पण दिसते. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मात्र स्पष्टपणे दिसते. समाधीच्या डाव्या बाजूस पहिले तर ‘कोकणदिवा’ दृष्टीस पडतो.
“मरावे परी कीर्तीरूपी उरावे”
© श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈