श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 1  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

 बाई आपल्या घर-संसारात, मुला-बाळात, घरच्या काम-काजात गुरफटून गेली असली, तरी मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी माहेरची, विशेषत: आईची, तिच्या मायेची आठवण घमघमाट असते. अगदी आपल्या संसारात ती सुखी असली, रमून गेली असली तरी.

नवी नवी सासुरवाशीण सकाळी जात्यावर दळायला बसते. दळताना आई आठवते. मग ती जात्याला विनवते,

‘जात्या तू ईश्वरा नको मला जड जाऊ। बयाच्या दुधाचा सया पाहयतात अनुभावु।।‘

जात्याला ईश्वरा म्हणताना, आईच्या दुधामुळे बळ आल्याचं अभिमानाने सांगते. हे दूध म्हणजे काही तान्ह असताना प्यालेलं नव्हे. आईने केलेल्या  संस्काराचं दूधसुद्धा. तिला माहीत आहे, ती जरा जारी चुकली तरी तिच्या माहेराचा उद्धार होईल. ‘हेच का तुझ्या आईनं लावलेलं वळण असं म्हंटलं जाईल म्हणूनच आपण कुठे चुकू नये, आणि माहेरच्या लोकांना कुणी नावे ठेवू नयेत, म्हणून ती दक्ष असते.

दळण सरतं. ‘काई सरल गं दळईन। सूप झाडूनी गं उभा केलं। चित्त गं बयाच्या गावा गेलं।।‘

मग इतर काम करताना, स्वैपाक-पाणी करतानाही तिला आई आठवते.

‘काई आगीबिगनीच्या पुढं। का ग जळतं वलतोल।। काई गं बयाबी वाचुईनी। कोण म्हणील काम केलं।।‘

पण कधी तरी त्यांच्या ओव्यातून एखादी सासू अशीही सापडते, जी आपल्या सुनेचं कौतुक करते॰

‘पहाटेच्या पार्‍यामंदी।  कोंबडा आरवला। बाळयाची राणी झोपेची जागी झाली। दुरडी दळण झालं पायली।।‘

पाट मांडून, ताट वाढून वाट पाहणारीही एखादी सासू दिसते. नाही असं नाही. अशा सासूबद्दल सूनही कृतज्ञतेने म्हणते,

‘काई सासूबाई आत्याबाई। तुम्ही ग तुळशीची जशी पानं । काई ग तुमच्या हाताखाली। आम्ही नांदतो सुना छान।‘

जेवतानाही तिला पुन्हा आईची आठवण  होते. ‘काई बारीक गं पिठायाची। तेची गं भाकरी चवघडी। बया गं माझीच्या जेवणाची। याद येतीया घडोघडी।।‘ आईच्या चविष्ट जेवणाची, तिने केलेल्या सुघड ‘चवघडी’ भाकरीची आठवण काढत ती एकेक घास घेते.

नव्या नवेल्या सुनेला तर आईची आठवण पदोपदी येते. आई म्हणजे जशी साखरंच. ‘काई आईला गं म्हणू आई । गोड गं इतकं काही नाही। जशी साखर ती गं बाई। जर्रा गं कडूपणा ठाव नाही।। आई वाचून माया दुसर्‍या कुणाला नाही, हे सांगताना कधी ती म्हणते, ‘काई पुरबीगणाची पोळी । पोळी पोटात गं फुटईली । काई गं बयाच्या वाचूईनी। मया लोकाला गं कुठईली।।‘ कधी ती सांगते, ‘काई वाट नि गं वैला वड। फांद्या गं फुटल्या ठायी ठायी। सारी गं पिरतीमी हिंडलो बाई। बया गं शिवाय माया नाही।।‘

अशा मायेचा मायेशीसुद्धा कधी कधी भांडण होतं बरं का! पण ते भांडण कसं? ‘माय गं लेकीच गं भांडाईन। दूधा गं तुपाची उकईळी। काई गं माझी ती बयाबाई। बया गं मनानं मोकईळी।। विस्तव काढला की उकळणारं दूध, तूप खाली बसतं. तसं प्रसंग संपला की आईचा  रागही ओसरतो. ती मनमोकळी असल्याचं ती सांगते.  तिला नेहमीच वाटत राहतं, ‘काई गं सगळ्या गोतामंदी। जल्म दिल्याली बया थोर।‘ आईला कधी ती तुळस म्हणते, तर बाप म्हणजे चाफा. कधी ती दोघे म्हणजे आपल्या वाटणीला आलेला समिंदर आहे, असं सांगते. समुद्रातून कितीही घ्यावं, तो थोडाच कोरडा पडणार? आई-बापाच्या मायेचाही तसंच आहे. ‘काई वळवाच्या गं पावसानं। नदी वढ्याला गं नाही धर। काई गं बापाजी बयाबाई। माझ्या गं साठयाचं समिंदर।।‘ तर असं मायेचं माहेर.

क्रमश:  पुढील लेखात आम्ही जाऊ म्हयेराला – भाग – 2 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments