सौ. सुचित्रा पवार
विविधा
☆ लाडकी बाहुली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात इयत्ता सातवीत असलेली शांताबाई शेळकेंची ही कविता मला खूप खूप आवडायची. नुसती आवडायचीच नाही तर एक अनामिक हुरहूरही लावून जायची.
लहान मुलांचे एक वेगळेच भावविश्व असते. या भावविश्वात त्यांनी काय काय जपलेले असते!काही समज, भुतांच्या गोष्टी, राजाराणी, परीच्या, राक्षसाच्या गोष्टी, त्यांची खेळणी अन कल्पनाविश्वे !आपण त्यांच्या भावविश्वात डोकावले तर बरेच काही उमगत जाते.
खेळणी त्यांची जिवलग असतात विशेषतः बाहुले, टेडी, बाहुल्या. बाहुलीविना कुठल्याच मुलीचं बाल्य नसेल;अगदी विकतची सुंदर आखीव रेखीव नसेल पण कापडाच्या चिंध्याची घरात शिवलेली का असेना!पण बाहुली असतेच. आपल्या दृष्टीने निर्जीव असलेली खेळणी लहान मुलांना मात्र सजीव असतात. ते त्यांच्याशी बोलतात, भांडतात, परत जवळ घेतात, न्हाऊ माखू घालतात, त्याला सतत आपल्या जवळ ठेवतात, ते जिथं जातील, सोबत घेऊन जातात.
अशीच एक सुंदरशी बाहुली कवयीत्रीला पण लहानपणी आवडायची. दुसऱ्या पण बाहुल्या होत्या तिच्याकडे पण ही खास होती कारण ती अतिशय सुंदर आणि आकर्षक देखील होती.
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख
अशी ती लाखात एक होती. पुढे कवयित्री तिच्या सुंदर रूपाचे वर्णन करते.
किती गोरे गोरे गाल गुलाबी फुलले
हसते नाचते केस सुंदर कुरळे
टपोऱ्या गुलांबाप्रमाणे गोबरे गाल, सुंदर कुरळे केस, अंगातला रेशमी लाल झगा अन केसांवर बांधलेली लाल फित अर्थात रिबन यामुळं ती अजूनच देखणी दिसायची. कवयित्री पुढे म्हणते की तिच्याजवळ खूप बाहुल्या होत्या पण तीच माझी अतिशय आवडती बाहुली होती.
एके दिवशी अघटित घडलं बाहुलीचं. बाहुलीला घेऊन कवयित्री माळावर खेळायला गेली असता लपंडाव रंगात आला आणि लपलेली बाहुली काही केल्या मिळेना. उशीर झाल्याने हिरमुसली होऊन ती माघारी घरी आली पण बाहुलीशिवाय तिला चैनच पडेना. ते माळरान आणि बाहुली डोळ्यांपुढं नाचू लागली. मन तिला शोधण्यासाठी धावू लागलं पण शरीराने जाता येईना कारण संततधार पावसाला सुरुवात झाली.
पाऊस उघडल्यावर मात्र ती धावतच बाहुलीच्या शोधात पळाली. पावसाने सारे रान चिंबले होते आणि ओल्याचिंब गवतावर ती दिसली!
पण हाय !तिची दशा दशा झाली होती.
कुणी गाय तुडवूनी गेली होती तिजला
पाहुनी दशा ती रडूच आले मजला
माळरानावर चरता करता कुण्या गायीने बहुलीला तुडवले होते. तिचे कुरळे सुंदर केस विस्कटून गेले होते. गोरा गोरा रंग फिका झाला होता. ते भयाण दृश्य पाहून कवयित्रीला रडू आले, मैत्रिणीही चिडवू लागल्या “शी ! काय पण ध्यान!” पण तरीही कवयित्रीने तिला तसेच उचलून हृदयाशी घेतले कारण ती बाहुली तिची लाडकी तर होतीच पण तिच्याशी तिचा अतूट स्नेह, भावना जुळलेल्या होत्या म्हणूनच ती कशीपण असली तरी तिला अतिशय प्रियच होती.
पण आवडली तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी माझी म्हणुनी
खूपच मनाला भिडणारी ही कविता एक संदेशही नकळत देऊन जाते की जीवापाड जपलेली खेळणी असो, माणसे असो की नाती कोणत्याही परिस्थितीत आपण त्यांना दुरावू देवू नये. सर्वसामान्यपणे मुलं खेळणं खराब झाले की फेकतात, मोडतोड करतात पण कवयित्रीने मात्र असे केले नाही कारण ती बाहुली तिच्या बालविश्वातली सजीवच गोष्ट होती. तिचे भावबंध त्या बाहुलीशी एकरूप झाले होते.
कधी कधी वाटते, लहानपणी खेळण्यांशी खेळुनसुद्धा आपली खेळणी जपून ठेवणारी माणसे पुढे नातीसुद्धा जपत असतील का?
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
निखळ, निरागस प्रेम व्यक्त करणारी, स्नेहभाव जपणूक करणारी कविता. मला अजूनही खूप आवडते